28 पानी सुसाइड नोट लिहून अभियंत्याची आत्महत्या; ओलाच्या सीईओवर गंभीर आरोप

बंगळुरूमध्ये ओला इलेक्ट्रिक (ओला इलेक्ट्रिक) कंपनीतील एका अभियंत्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या कर्मचाऱ्याने लिहिलेल्या तब्बल 28 पानी सुसाइड नोटने संपूर्ण ओला व्यवस्थापन हादरले आहे. या पत्रात कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश अग्रवाल, तसेच वरिष्ठ अधिकारी सुब्रत कुमार दास आणि इतरांवर मानसिक छळ, वेतन थकवणे आणि कामाचा अत्याधिक दबाव आणल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

मृत अभियंता अरविंद (पूर्ण नाव गोपनीय) हे 38 वर्षांचे असून, ओला इलेक्ट्रिकमध्ये होमोलॉगेशन इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. ते 2022 पासून कंपनीत नोकरी करत होते. 28 सप्टेंबर रोजी चिक्कलसंद्रा (बंगळुरू) येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी विष प्राशन करून जीवन संपवलं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

घटनेनंतर दोन दिवसांनी त्यांच्या कुटुंबीयांना 28 पानी सुसाइड नोट मिळाली. त्यात अरविंद यांनी वरिष्ठांकडून होणाऱ्या मानसिक त्रासाचे आणि पगार नाकारणाऱ्या धोरणांचे सविस्तर वर्णन केले आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी त्यांच्या खात्यात 17 लाख 46 हजार रुपये जमा झाले, ज्यावरून कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला आहे.

या प्रकरणाची चौकशी सुरू असून, बंगळुरू पोलिसांनी CEO भाविश अग्रवाल, सुब्रत कुमार दास आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात भारतीय दंड संहितेअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मृताच्या कुटुंबीयांनी या घटनेत योग्य न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे.

घटनेवर प्रतिक्रिया देताना ओला इलेक्ट्रिकने निवेदन जारी केले आहे. कंपनीने म्हटलं आहे, “अरविंद यांच्या मृत्यूने आम्हाला तीव्र दुःख झालं आहे. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात कधीही औपचारिक तक्रार केली नव्हती. आम्ही या प्रकरणात अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करू.” तसेच, कंपनीने दाखल झालेल्या FIR वर कर्नाटक हायकोर्टात आव्हान देण्याची तयारी असल्याचेही स्पष्ट केले आहे.

 

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *