उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी रुग्णवाहिका राखीव; विलंबामुळे महिलेचा मृत्यू, संतापजनक घटना

अंबरनाथ | हृदयविकाराचा झटका आल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका महिलेला दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यासाठी रुग्णवाहिका न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी अंबरनाथ येथे घडली. विशेष म्हणजे, संबंधित रुग्णालयाची रुग्णवाहिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय कार्यक्रमासाठी राखीव ठेवण्यात आली होती, अशी माहिती स्थानिक सूत्रांनी दिली आहे.

६० वर्षीय मीना सूर्यवंशी यांना रविवारी दुपारी अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तातडीने अंबरनाथ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारांनंतर डॉक्टरांनी अधिक चांगल्या उपचारांसाठी त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. मात्र, रुग्णालयातील एकमेव रुग्णवाहिका शिंदे यांच्या कार्यक्रमासाठी तैनात असल्याने ती उपलब्ध झाली नाही.

दरम्यान, सूर्यवंशी यांच्या नातेवाईकांनी रुग्णवाहिकेसाठी धावपळ केली, पण तोपर्यंत उशीर झाला आणि सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. “रुग्णवाहिका वेळेवर मिळाली असती, तर त्यांचा जीव वाचू शकला असता,” असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने मात्र हे आरोप फेटाळले असून, आवश्यक ती कार्यपद्धती पाळली गेल्याचे म्हटले आहे. परंतु या घटनेने राज्यातील शासकीय व्यवस्थेच्या प्राधान्यक्रमावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप पसरला असून, नागरिकांनी “शासकीय प्रोटोकॉलपेक्षा नागरिकांचा जीव अधिक महत्त्वाचा आहे” अशी मागणी केली आहे. शासनाने या घटनेची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जनतेची मागणी होत आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *