मतचोरी आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात विरोधी पक्ष एकजुट दाखवत असतानाच महाविकास आघाडीत मात्र अंतर्गत मतभेद उफाळून आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येताच काँग्रेसने स्वतंत्र भूमिका घेण्याचे संकेत दिल्याने आघाडीत तणाव निर्माण झाला आहे. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप यांच्या वक्तव्यानंतर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मनसेसंबंधी भूमिकेने वातावरण आणखी तापवले आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेत्यांना चांगलेच सुनावले. राऊत म्हणाले, “मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आमच्याकडून मित्र पक्षांना अडचणीत आणणारी भूमिका घेतली जाणार नाही. मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी इतिहास समजून घेतला पाहिजे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सर्व पक्ष एकत्र आले होते, तसेच आज मुंबई वाचवण्यासाठीही एकत्र येणे गरजेचे आहे.”
राऊत यांनी काँग्रेसवर टीका करताना स्पष्ट केले की, “आम्हाला भाजपचा पराभव करायचा आहे आणि अदानीच्या घशात मुंबई जाण्यापासून वाचवायची आहे. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी महापौरपदावरून वाद घालण्याऐवजी मोठ्या लढाईकडे लक्ष द्यावे.” त्यांनी आणखी स्पष्ट केले की, “आम्हाला राहुल गांधी यांनाच पंतप्रधान बनवायचे आहे. इंडिया ब्लॉकचा उद्देशही तोच आहे.”
मनसेसाठी काँग्रेसची साथ सोडणार का, असा सवाल विचारल्यावर राऊत म्हणाले की, “अशा कोणत्याही चर्चेला स्थान नाही. महाविकास आघाडीत किंवा इंडिया ब्लॉकमध्ये हा विषयच आलेला नाही.”
महापालिका निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे आघाडीतील हे मतभेद उघड होत असून, आगामी राजकीय समीकरणांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.


Leave a Reply