भारतीय जाहिरात क्षेत्रातील दिग्गज आणि सर्जनशीलतेचे प्रतीक असलेले पियुष पांडे यांचे शुक्रवारी निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून संसर्गामुळे त्रस्त असलेल्या पांडे यांचे निधन झाले असून, त्यांच्या अंत्यसंस्काराची प्रक्रिया शनिवारी पार पडणार आहे.
भारतीय जाहिरात क्षेत्रातील “आवाज”
पियुष पांडे यांनी जवळपास चार दशकं भारतीय जाहिरातविश्वात आपली अमिट छाप सोडली. ते ओगिल्वी या नामांकित जाहिरात कंपनीचे मुख्य क्रिएटिव्ह अधिकारी आणि कार्यकारी अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांनी १९८२ साली ओगिल्वीत प्रवेश केला आणि सूर्यप्रकाश डिटर्जंट साठी पहिली जाहिरात लिहिली. यानंतर त्यांनी फेविकॉल , कॅडबरी, एशियन पेंट्स, लुना मोपेड, फॉर्च्युन तेल यांसारख्या ब्रँडसाठी अशा जाहिराती तयार केल्या, ज्या भारतीय जनमानसाचा भाग बनल्या. त्यांच्या जाहिरातींमध्ये भारतीय संस्कृतीचा सुगंध, साधेपणा आणि हृदयाला भिडणारा विनोद दिसून येत असे. त्यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना २०१६ साली पद्मश्री पुरस्काराने गौरविले.
बहुगुणी व्यक्तिमत्व
जाहिरातींपलीकडेही पियुष पांडे बहुआयामी होते. त्यांनी २०१३ साली जॉन अब्राहम अभिनित ‘मद्रास कॅफे’ या चित्रपटात अभिनय केला. तसेच आयसीआयसीआय बँकेच्या ‘मॅजिक पेन्सिल प्रोजेक्ट ’ मध्येही ते झळकले. त्यांनी “मिले सुर मेरा तुम्हारा” हे राष्ट्रीय एकात्मतेचं गीत लिहिलं होतं, जे आजही देशाच्या एकतेचं प्रतीक मानलं जातं. तसेच त्यांनी ‘भोपाल एक्सप्रेस’ या चित्रपटाच्या पटकथेतही सहलेखन केलं होतं.
पियुष पांडे यांच्या निधनानंतर जाहिरात, व्यवसाय आणि राजकीय क्षेत्रातून दुःख व्यक्त करण्यात आले. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, “भारतीय जाहिरात विश्वातील एका युगपुरुषाचा अंत झाला आहे. त्यांच्या सर्जनशीलतेने संवादाचा चेहराच बदलला. त्यांच्या कुटुंबीयांना आणि सहकाऱ्यांना मनापासून संवेदना.”
कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक यांनी लिहिले, “पियुष पांडे यांनी 2003 मध्ये आमच्या बँकेचा ‘कॉमन सेन्स’ हा प्रसिद्ध कॅम्पेन तयार केला. त्यांची विचारसरणी अप्रतिम आणि व्यक्तिमत्व नम्र होते.” लेखक सुहेल सेठ म्हणाले, “भारताने केवळ एक महान जाहिराततज्ज्ञ नव्हे, तर एक देशभक्त आणि सज्जन व्यक्ती गमावली आहे. आता ‘मिले सुर मेरा तुम्हारा’ स्वर्गात गुंजेल.”
पियुष पांडे यांनी भारतीय जाहिरातींना भारतीयतेचा आत्मा दिला. त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील.


Leave a Reply