हवामान बदलाचा परिणाम: हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९% वाढ, पुराचा धोका वाढला

नवी दिल्ली : हवामान बदलामुळे हिमालयातील जलसाठ्यांमध्ये गेल्या १४ वर्षांत तब्बल ९.२४ टक्क्यांनी वाढ झाल्याचे केंद्रीय जल आयोगाच्या नव्या अहवालात स्पष्ट झाले आहे. हिमालयीन प्रदेशातील जलसाठ्यांच्या वाढत्या प्रमाणामुळे पुराचा धोका अधिक वाढल्याची गंभीर नोंद या अहवालात घेण्यात आली आहे.

केंद्रीय जल आयोगाने ऑगस्ट महिन्याचा मासिक अहवाल सादर करताना सांगितले की, २०११ साली हिमालयीन भागातील जलसाठ्यांचे एकूण क्षेत्रफळ ४.३० लाख हेक्टर इतके होते. २०२५ पर्यंत हे क्षेत्रफळ ४.७१ लाख हेक्टरपर्यंत वाढले असून, ही वाढ चिंताजनक असल्याचे आयोगाने नमूद केले आहे.

अहवालानुसार, भारतातील ग्लेशियर लेक (हिमनदी तलाव) मधील पाण्याचे क्षेत्रफळही झपाट्याने वाढले आहे. २०११ मध्ये या तलावांचे क्षेत्रफळ १,९५९ हेक्टर होते, जे २०२५ मध्ये २,४०५ हेक्टरपर्यंत पोहोचले आहे. म्हणजेच सुमारे २२.७६ टक्के वाढ झाली आहे. या वाढीमुळे हिमालयीन प्रदेशात ग्लेशियर फुटून पूर येण्याचा धोका पूर्वीपेक्षा अधिक वाढल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

केंद्रीय जल आयोगाने पुढे म्हटले आहे की, ग्लेशियर लेकची संख्या आणि क्षेत्रफळ दोन्ही वाढल्यामुळे भविष्यात होणाऱ्या संभाव्य आपत्तींचा अंदाज लावणे कठीण झाले आहे. त्यामुळे या तलावांवर सतत लक्ष ठेवणे आणि वैज्ञानिक निरीक्षण वाढवणे अत्यावश्यक आहे.

राज्यनिहाय आकडेवारीनुसार, क्षेत्रफळ वाढलेल्या ग्लेशियर लेकमध्ये लडाखमध्ये १३३, जम्मू-काश्मीरमध्ये ५०, हिमाचल प्रदेशात १३, उत्तराखंडमध्ये ७, सिक्कीममध्ये ४४, तर अरुणाचल प्रदेशात १८१ तलावांमध्ये वाढ झाली आहे.

तज्ज्ञांच्या मते, या वाढीमुळे हिमालयीन परिसंस्थेतील बदल वेगाने घडत असून, त्यामुळे खालील प्रदेशांमध्ये जलस्रोतांचे स्वरूप आणि नदीप्रवाहाच्या पद्धतीतही मोठे बदल दिसू शकतात. त्यामुळे हिमालयीन भागात हवामान निरीक्षण, जलस्रोत व्यवस्थापन आणि आपत्ती प्रतिबंध यावर अधिक भर देणे काळाची गरज बनली आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *