मुंबई : राज्यातील विद्यापीठांमधील प्राध्यापक भरती प्रक्रियेला झालेल्या विलंबामुळे विद्यापीठांचे राष्ट्रीय मानांकन (रँकिंग) nacc आणखी खाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, प्राध्यापकांची रिक्त पदे तातडीने भरली नाहीत, तर शिक्षणाच्या गुणवत्तेवर तसेच संशोधनाच्या दर्जावर परिणाम होऊ शकतो.
राज्यातील विद्यापीठांचे राष्ट्रीय रँकिंग गेल्या काही वर्षांत घसरले आहे. या घसरणीमागील एक प्रमुख कारण म्हणजे प्राध्यापकांची मोठ्या प्रमाणावर असलेली रिक्त पदे. सध्या राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये जवळपास ९ ते ९.५ हजार प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. तसेच, अनुदानित महाविद्यालयांमधील सुमारे ३५ हजार पदे रिक्त आहेत.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विद्यापीठांना आणि महाविद्यालयांना लवकरात लवकर प्राध्यापक भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. काही विद्यापीठांनी भरतीसाठी जाहिराती जाहीर केल्या असून, सरकारकडून त्यांना मुदतवाढ दिली जाणार आहे. लवकरच नव्या मुदतीनंतर मुलाखती घेऊन नियुक्त्या पूर्ण करण्यात येतील, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
तथापि, वित्त विभागाकडून मंजुरी न मिळाल्याने या भरती प्रक्रियेला अडथळे येत असल्याचेही त्यांनी मान्य केले. “येत्या जूनपूर्वी प्राध्यापक भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कारण, या भरतीवरच राज्यातील उच्च शिक्षण संस्थांचे रँकिंग आणि मानांकन अवलंबून आहे,” असे पाटील म्हणाले.


Leave a Reply