कोस्टल रोडवर अंधारामुळे प्रवाशांना त्रास; अपघाताचा धोका वाढला!

मुंबई : कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला झाल्यानंतर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, अनियंत्रित वेगमर्यादा आणि रस्त्यावरच्या दिव्यांचा अंधार यामुळे अपघातांचा धोका वाढत आहे. रात्रीच्या वेळी अनेक वाहनचालकांना अंधारात प्रवास करावा लागत असून, यामुळे गंभीर दुर्घटनांचा संभव निर्माण झाला आहे.

वाहनचालकांनी सोशल मीडियावरून या समस्येबाबत तक्रारी नोंदवल्या आहेत. वांद्रे-सी लिंकदरम्यानच्या परिसरात खांबांवरील दिवे बंद असल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. १५ हजार कोटी रुपयांच्या खर्चाने उभारलेल्या या कोस्टल रोडवर प्रवाशांच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुंबईकरांनी “विजेचे खांब बसवण्यासाठी पुन्हा आपल्या खिशातून पैसे द्यायचे का?” असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.

कोस्टल रोड सुरू झाल्यापासून आतापर्यंत आठ हजारांहून अधिक वाहनांनी वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याची नोंद झाली आहे. बोरीवलीहून दक्षिण मुंबईकडे ९७९ तर दक्षिण मुंबईहून बोरीवलीकडे ८७५ वाहनांनी नियमभंग केला असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, कोस्टल रोडवरील टनेलमध्येही प्रकाशयोजना अपुरी असल्याने अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

फक्त वाहनचालक नव्हे, तर पादचारी भुयारी मार्ग (PUP) देखील अंधारात बुडाले आहेत. प्रोमेनेडवरील भुयारी मार्गातून जाणाऱ्या नागरिकांना मोबाईल लाइटचा वापर करून प्रवास करावा लागत आहे.

ऑक्टोबर महिन्यात कोस्टल रोडवरील एका वाहनाने वेगमर्यादा ओलांडल्याने नियंत्रण सुटून कार समुद्रात कोसळली होती. या अपघातात लोखंडी संरक्षक कड्यांचे मोठे नुकसान झाले. या संदर्भात मुंबई महानगरपालिकेने संबंधित कंत्राटदाराला दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपयांची नुकसानभरपाई वसुलीची नोटीस पाठवली आहे. मुंबईतील नागरिकांनी कोस्टल रोडवरील प्रकाशयोजना तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *