जळगाव – माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या जळगाव येथील घरातील चोरी प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, चोरी गेलेले काही मौल्यवान दागिने व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र, खडसे यांनी सुरुवातीला उल्लेख केलेल्या सीडी व पेन ड्राईव्हबाबत अद्याप काहीही धागादोरा लागलेला नाही.
जळगाव पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी चोरीनंतर उल्हासनगर येथे चिराग सय्यद नावाच्या व्यक्तीकडे मुद्देमाल सुपूर्द केला होता. सय्यदने हा मुद्देमाल कैलास खंडेलवाल नावाच्या सराफ व्यापाऱ्याकडे दिला होता. या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, प्रत्यक्ष घरफोडी करणारे मुख्य तीन आरोपी एजाज अहमद, मोहम्मद बिलाल आणि बाबा हे अद्याप फरार असून ते सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली.
या घरफोडीत सुमारे १० ते १२ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. त्यात ६८ ग्रॅम सोने, सुमारे ७ किलो ७०० ग्रॅम चांदी आणि ३५ हजार रुपयांची रोकडचा समावेश होता. सोन्याच्या वस्तूंमध्ये कानातले, अंगठ्या, डायमंडचे दागिने, तर चांदीच्या वस्तूंमध्ये गदा, त्रिशूल, तलवार आणि रथ यांचा समावेश होता.
खडसे यांनी चोरीनंतर काही महत्त्वाच्या कागदपत्रे, सीडी आणि पेन ड्राईव्ह चोरी झाल्याचा दावा केला होता. मात्र, पोलीस अधीक्षक रेड्डी यांनी स्पष्ट केले की एफआयआर किंवा पुरवणी जबाबात अशा कोणत्याही वस्तूंचा उल्लेख नाही आणि अटक आरोपींकडूनही असे काही आढळलेले नाही. अद्याप फरार आरोपींचा शोध सुरु असून, पोलिसांकडून तपास वेगाने सुरू आहे.


Leave a Reply