महाराष्ट्रातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची अखेर घोषणा होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून आज (मंगळवार) दुपारी ४ वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचा कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर करणार आहेत.
गेल्या अनेक महिन्यांपासून या निवडणुका रखडल्या होत्या. प्रभाग रचना आणि इतर मागासवर्गीय (OBC) आरक्षणाचा मुद्दा न्यायालयीन प्रक्रियेमुळे अडकल्याने निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या. मात्र, आता सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यांत पार पडणार आहेत. पहिल्या टप्प्यात 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठी निवडणुका घेण्यात येतील. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.
या निवडणुकांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. सर्व प्रमुख पक्ष — भाजप, शिंदे गट, अजित पवार गट, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि काँग्रेस — स्थानिक पातळीवर मोर्चेबांधणीला लागले आहेत. स्थानिक पातळीवरील सत्ता मिळवण्यासाठी ही निवडणूक प्रत्येक पक्षासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे.


Leave a Reply