मुंबई : पवईतील आर.ए. स्टुडिओमध्ये घडलेल्या रोहित आर्य ओलीसनाट्य प्रकरणात पोलिस तपासाचा फास अधिक घट्ट होत चालला आहे. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणातील सर्व धागेदोरे शोधण्यास सुरुवात केली असून, आता आमदार दीपक केसरकर यांचीदेखील चौकशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या घटनेदरम्यान रोहित आर्यने माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी बोलायची मागणी केली होती. पोलिसांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असला, तरी केसरकर यांनी त्याच्याशी संवाद साधण्यास नकार दिल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. मात्र वारंवार त्यांचे नाव पुढे येत असल्याने आता त्यांच्या भूमिकेचीही तपासात नोंद होणार आहे.
दरम्यान, पोलिसांनी आर.ए. स्टुडिओला गेल्या चार ते पाच दिवसांत भेट देणाऱ्या मराठी सिनेकलाकारांचीही चौकशी सुरू केली आहे. अभिनेते गिरीश ओक यांनी स्टुडिओला भेट दिल्याचे समोर आले असून, अभिनेत्री रुचिता जाधवसह आणखी काही कलाकारांनाही रोहितने संपर्क साधला होता. या सर्वांच्या जबाबांची नोंद घेतली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी स्टुडिओत शिरून रोहितवर गोळी झाडली होती, ज्यात त्याचा मृत्यू झाला. सध्या गुन्हे शाखेकडे तपास वर्ग करण्यात आला असून, स्टुडिओ मालक, प्रत्यक्षदर्शी आणि मुलांच्या पालकांचेही जबाब नोंदवले जात आहेत.
रोहित आर्यच्या या प्रकरणाने केवळ पोलिस तपासावरच नाही, तर राजकीय आणि कलाविश्वातील संबंधांवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. केसरकर यांची चौकशी झाल्यास, तपासाची दिशा सत्तेच्या गलियार्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही.


Leave a Reply