तामिळनाडू : तामिळनाडू भाजपात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या अंतर्गत कलहाला आता अधिक हवा मिळाली आहे. एप्रिल महिन्यात पक्षाने के. अन्नामलाई यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवून त्यांच्या जागी नैनार नागेंद्रन यांची नियुक्ती केली होती. या निर्णयानंतर भाजपातील नाराजी आणि गटबाजी वाढल्याचं चित्र आहे.
अन्नामलाई हे तामिळनाडूमधील भाजपाचे तरुण आणि लोकप्रिय नेते मानले जातात. यानंतर त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याच्या चर्चांना जोर आला होता. मात्र, कोयंबतूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर माध्यमांशी बोलताना त्यांनी या सर्व चर्चांवर पडदा टाकला. “मी नवीन पक्ष कसा काढू शकतो? मला माझी पोहोच चांगली माहिती आहे,” असं अन्नामलाई म्हणाले. त्यामुळे सध्या तरी त्यांनी नव्या पक्षाच्या शक्यतेला फेटाळून लावलं आहे.
याच वेळी अन्नामलाई यांनी पक्षात राहणं की बाहेर पडणं हा स्वतःचा निर्णय असल्याचं स्पष्ट केलं. “जर मला वाटलं, तर मी पक्षात राहीन. जर वाटलं, तर मी पक्ष सोडेन. कुणीही जबरदस्तीने कोणालाही बंदूक दाखवून पक्षात थांबवू शकत नाही,” असं ते म्हणाले.
दरम्यान, भाजप आणि एआयएडीएमके युतीतील तणाव ही या घडामोडींची पार्श्वभूमी मानली जात आहे. एआयएडीएमकेचे सरचिटणीस इडाप्पडी पलानीस्वामी यांनी अन्नामलाईंच्या हटवणुकीची अट घातल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
अन्नामलाई यांच्या वक्तव्यानंतर तामिळनाडू भाजपात पुन्हा एकदा अस्वस्थता वाढल्याचं दिसून येत असून, या घडामोडींमुळे केंद्रीय नेतृत्वाची डोकेदुखी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


Leave a Reply