धाराशिव : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होत असतानाच उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा दौऱ्यातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला घेरलं आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटी दरम्यान ठाकरे म्हणाले, “जूनची कर्जमाफी आम्हाला मान्य नाही. जोपर्यंत कर्जमुक्ती नाही, तोपर्यंत सरकारला मत देऊ नका. प्रत्येक गावात असा बोर्ड लावा,” असं आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केलं.
ठाकरे म्हणाले, “सरकार म्हणतं इतिहासातील सर्वात मोठी मदत केली, पण ही इतिहासातील सर्वात मोठी थाप आहे. शेतकऱ्यांच्या पॅकेजला खेकड्याने भोक पाडलं का? अजून मदत मिळालीच नाही.” त्यांनी विमा कंपन्यांवरही टीका करताना इशारा दिला की, “शेतकऱ्यांची रक्कम तत्काळ द्या, नाहीतर हे शेतकरी थेट तुमच्या ऑफिसवर येतील.”
यावेळी ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावर जोरदार टीका करत, “हे सरकार दगाबाज आहे. शेतकऱ्यांशी दगाबाजी केली जातेय. निवडणुकीच्या तोंडावर हिंदू-मुस्लिम आणि मराठी-अमराठीच्या मुद्द्यावर लक्ष वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असे आरोप केले.
दरम्यान, भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर पलटवार केला. “ठाकरे यांचा मराठवाडा दौरा हा शेतकऱ्यांसाठी नसून केवळ राजकारणासाठी आहे. फडणवीस यांच्या काळात शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होत होते, पण उद्धव ठाकरे यांच्या काळात फक्त घोषणा झाल्या. आमचं राजकारण कृतीतून आहे, नौटंकीतून नाही,” असं दरेकर म्हणाले. मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागातील ठाकरे यांचा हा दौरा राजकीयदृष्ट्या तापलेला असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून दोन्ही गट आमनेसामने आले आहेत.


Leave a Reply