शरद पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची अचानक भेट; पार्थ पवार जमीन प्रकरणावर चर्चा?

पुण्यातील कथित बहुशे कोटींच्या जमीन गैरव्यवहाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी सकाळी अचानक भेट झाली. ही भेट सुमारे 15 मिनिटे चालली असून, त्यानंतर पवार हे मंत्रालयाजवळील वाय. बी. चव्हाण केंद्रात आपल्या कार्यालयात रवाना झाले.

सदर भेटीत मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) निवडणुकीसह विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. आगामी एमसीए निवडणुकीत काही उमेदवारांना माघार घ्यावी, असा सल्ला पवार यांनी आपल्या पॅनेलला दिल्याचे कळते. फडणवीस यांनी स्वतःचा पॅनेल जाहीर केला नसला तरी, त्यांचा पाठिंबा कोणत्या गटाला मिळतो हे निर्णायक ठरणार आहे.

दरम्यान, पुण्यातील 40 एकर जमीन विक्री प्रकरणात अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या कंपनीचं नाव समोर आलं आहे. या प्रकरणी शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “मुख्यमंत्र्यांनी स्वतः या प्रकरणाचं गांभीर्य मान्य केलं आहे. त्यामुळे सखोल चौकशी होऊन सत्य जनतेसमोर यावं.”

अजित पवार यांनी मात्र आपल्या मुलाचं समर्थन करत, “नोंदणी प्रक्रियेत झालेली चूक ही उपनोंदणी अधिकाऱ्याची आहे,” असं सांगितलं. महसूल विभागाने संबंधित अधिकारी रवींद्र तारू यांना निलंबित केलं असून, पोलिसांनी पार्थ पवार यांचे सहकारी दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांच्यासह अनेकांवर गुन्हे दाखल केले आहेत.

राजकीय वर्तुळात मात्र फडणवीस–पवार भेटीमागे फक्त क्रिकेट नाही, तर आगामी राजकीय घडामोडींची पार्श्वभूमी असल्याची चर्चा सुरू आहे.

 

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *