देशातील पहिल्या शिक्षिका आणि मुख्याध्यापिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानार्थ ऑक्सफर्ड विद्यापीठाने गेल्या दोन वर्षांपासून सावित्रीबाई फुले यांच्या नावाने शिष्यवृत्ती सुरू केली आहे. भारतातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. ऑक्सफर्डमधील सोमरविले महाविद्यालय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे, ज्यामध्ये शिक्षण शुल्क, जेवण, आणि इतर आवश्यक सुविधा मोफत दिल्या जातात.
महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाच्या माध्यमातून समताधिष्ठित समाजनिर्मितीचा पाया रचला. १८४८ मध्ये पुण्यातील भिडे वाड्यात देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली, जिथे सावित्रीबाई पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांना समाजाच्या विरोधाचा सामना करावा लागला; चिखल, शेण, दगडांचा मारा सहन करावा लागला. तरीही त्यांनी आणि महात्मा फुल्यांनी शिक्षणाची चळवळ सुरू ठेवली.
सावित्रीबाईंनी “नेटिव्ह फिमेल स्कूल्स इन पुणे” आणि “दी सोसायटी फॉर प्रमोटिंग एज्युकेशन ऑफ महार्स, या संस्थांच्या माध्यमातून सर्वांसाठी शिक्षणाच्या दारे खुली केली. त्यांनी शिक्षणाबरोबरच शोषण विरहित समाज निर्मितीसाठी महात्मा फुल्यांसोबत काम केले. जातीभेद, अनिष्ट परंपरा आणि शेतकऱ्यांच्या शोषणाविरोधात त्यांनी लढा दिला.प्लेगसारख्या संकटात सावित्रीबाईंनी लोकांसाठी अन्नछत्र सुरू केले आणि त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत समाजासाठी झटत राहिल्या. त्यांच्या या महान कार्याचा सन्मान करत ऑक्सफर्ड विद्यापीठाने २०२३ पासून त्यांच्या नावाने शिष्यवृत्ती सुरू केली.
ही शिष्यवृत्ती एससी, एसटी, ओबीसी, आदिवासी, आणि अल्प प्रतिनिधित्व मिळालेल्या विद्यार्थ्यांना दिली जाते, ज्यांना शाश्वत विकासावर आधारित पदव्युत्तर शिक्षण घेण्याची संधी मिळते. पहिली शिष्यवृत्ती निहारिका सिंग या विद्यार्थिनीला देण्यात आली आहे. ती पर्यावरण आणि सामाजिक विकास या विषयांवर जागतिक स्तरावर अभ्यास करत आहे. सावित्रीबाईंनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि मागास वर्गाच्या कल्याणासाठी आयुष्यभर कार्य केले. त्यामुळे त्यांच्या नावाने ही शिष्यवृत्ती दिली जाणे अत्यंत उचित आहे. सोमरविले महाविद्यालयाच्या इतिहासात सावित्रीबाईंच्या नावाने शिष्यवृत्ती सुरू करणे गौरवाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. जग बदलण्याची इच्छा असलेल्या बुद्धिमान, परंतु अल्प प्रतिनिधित्व मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती प्रेरणादायी ठरेल.

क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या स्मृतीला अभिवादन; ऑक्सफर्ड विद्यापीठाने सुरू केली शिष्यवृत्ती
•
Please follow and like us:
Leave a Reply