उद्धव ठाकरेंचा शिंदे–भाजप तणावावर घणाघात; “बाबा मला मारतो म्हणून दिल्लीत गेले”

राज्यात सध्या सत्ताधारी महायुतीत सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाने तणाव तीव्र झाला आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यातील संघर्ष चिघळत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान शिंदेंनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची थेट तक्रार केल्याची चर्चा रंगली आहे. या घडामोडींवर आता विरोधकांनी जोरदार निशाणा साधला असून उद्धव ठाकरेंनीही कडक शब्दांत टीका केली.

मुंबईतील एका कार्यक्रमात उपस्थित राहून, नाव न घेता उद्धव ठाकरेंनी शिंदेंना चिमटा काढला. “मी कार्यक्रमाची साईज नाही, कामाची साईज बघतो. आयुष्यात योग्य शिक्षण आणि चांगले शिक्षक मिळाले नाहीत, तर काय होतं हे आपल्याला दिसत आहे. दिवटी म्हणजे मशाल आणि दिवटा म्हणजे काहीतरी वेगळंच… अशा दिवट्यांना मशालीचं महत्त्व कळणं शक्यच नाही,” असे ते म्हणाले.

तसेच महायुतीतील अंतर्गत संघर्षाचा संदर्भ देताना उद्धव ठाकरेंनी उपरोधिक टीका करत म्हटले, “आज पेपरमध्ये वाचलं—‘बाबा मला मारतो म्हणून कोणीतरी दिल्लीत गेलं’. आपल्या लोकांनीच नाड्या आवळायला सुरुवात केली आहे. ही लाचारी का? योग्य वयात शिक्षण मिळालं असतं, तर आज हा प्रसंग उद्भडलाच नसता.”

गेल्या चार वर्षांपासून मुंबईसह राज्यातील महापालिकांच्या निवडणुका न झाल्याबद्दलही त्यांनी सरकारवर टीका केली. “महापालिकेत बाप कोण आहे हेच कळत नाही. आमदार फोडणे, पक्ष फोडणे हेच त्यांचं काम. सामान्य जनतेकडे बघायला वेळ नाही,” असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. यावेळी त्यांनी आमदारांना आमदारकीचा निधी केवळ शिक्षणासाठी वापरण्याचे आवाहनही केले.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *