नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तयारीच्या नावाखाली सुरू असलेल्या संभाव्य झाडतोडीच्या हालचालींवर ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी कडाडून टीका केली आहे. पर्यावरण आणि निसर्ग संवर्धनासाठी नेहमीच पुढाकार घेणारे शिंदे यांनी यावेळी अत्यंत कठोर शब्दांत शासनावर नाराजी व्यक्त केली. “१०० जणांचं बलिदान देऊ, पण नाशिकमध्ये एकही झाड तोडू देणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
शिंदे म्हणाले, “माणसं पेटून उठतील, मी फक्त निमित्त असेन. कुंभमेळ्यासाठी झाडे तोडणे हा दुर्दैवी निर्णय आहे आणि या विराेधात मोठ्या प्रमाणावर आवाज उठवावा लागेल.” त्यांनी सरकारच्या ‘झाड तोडून दहा झाडे लावू’ या घोषणेवरही तीव्र टीका केली. “हे विधान फालतू आहे. सरकार आपलं असूनही बेजबाबदारपणे वागत आहे,” असा आरोप त्यांनी केला.
नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या निमित्ताने नवे प्रकल्प, रस्ते रुंदीकरण आणि सुविधा उभारणीच्या कामांना गती दिली जात आहे. या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार असल्याच्या चर्चांमुळे पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर सयाजी शिंदे यांची भूमिका हे आंदोलन अधिक तीव्र होण्याचे संकेत देत आहे.
शिंदे पुढे म्हणाले, “खरं तर माझ्या तोंडात शिव्या येतात,” असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला. झाडे ही शहराची फुफ्फुसे असून, त्यांचे रक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पर्यावरणवादी संघटना, स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते यापूर्वीच झाडतोडीला विरोध करत आहेत. शिंदे यांच्या वक्तव्यांनंतर आता हा विषय अधिक गाजण्याची शक्यता आहे. निसर्ग संवर्धन आणि विकास यांच्या समतोलाच्या चर्चा पुन्हा एकदा केंद्रस्थानी येताना दिसत आहे.


Leave a Reply