ठाकरे गटाच्या मुखपत्र ‘दैनिक सामना’तून शनिवारी प्रकाशित झालेल्या अग्रलेखाने राज्यातील सत्ता समीकरणात नवी खळबळ उडवली आहे. लेखात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तीव्र टीका करताना भाजप–शिंदे गटातील वाढत्या नाराजीचा मुद्दा ठळकपणे मांडला आहे. ‘शिंदेंनी जे पेरले तेच आता उगवत आहे’ या शीर्षकातून भाजप ‘ऑपरेशन लोटस’च्या नव्या आवृत्तीने शिंदे गटातील किमान 35 आमदार हिरावून घेण्याची तयारी करत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
अग्रलेखानुसार, भाजपला आता शिंदे नकोसे झाले असून त्यांना जागा दाखवण्याची प्रक्रिया सुरु आहे. भाजपनेच शिंदे यांच्या पाठिशी राहून शिवसेना फोडली, पण आता त्यांच्याच गटावर ‘ऑपरेशन’ सुरू झाले आहे, असा आरोप ‘सामना’ने केला. रवींद्र चव्हाण यांनी पैशांच्या जोरावर शिंदे गटातील पदाधिकारी फोडत असल्याच्या शिंदेंच्या तक्रारीवर अमित शहा हसले, असा संवादही लेखात रंगवण्यात आला आहे. शहा यांनी शिंदेंना उद्देशून ‘‘तुमचा पक्ष भाजपने बनवला, त्यामुळे फुटाफुटीची चिंता करू नका’’ असे सांगितल्याचा उल्लेख अग्रलेखात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने शिंदे गटातील अनेक कार्यकर्ते खेचल्याचा उल्लेख करीत ‘सामना’ने युतीतील विश्वासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘‘ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी’’ या म्हणीचा आधार घेत ठाण्यातील चव्हाण आणि शिंदे यांच्यातील संघर्ष अधोरेखित करण्यात आला आहे.शिंदे गटाने मात्र या दाव्यांना नकार देत दिल्ली भेट यशस्वी झाल्याचे सांगितले असले, तरी ‘सामना’चा लेख भाजप–शिंदे युतीतील तणाव पुन्हा एकदा उफाळून आल्याचे चित्र रंगवत आहे.


Leave a Reply