बुलढाणा : बुलढाणा नगरपरिषद निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला असून भाजप व शिवसेना (शिंदे गट) समर्थकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार संजय गायकवाड यांनी भाजप जिल्हाध्यक्ष विजय शिंदे यांच्यावर केलेली टीका चर्चेचा विषय ठरली आहे.
गायकवाड म्हणाले की, बुलढाण्यातील लढत ही भाजप-शिवसेनेतील नसून “उपऱ्या गटाच्या” नेत्यांविरुद्ध ओरिजनल भाजप आणि शिवसेना गटाची आहे. “ज्या घरातून भाजप सुरू झाला, त्याच घरातील लोकांना उमेदवारी नाकारली गेली. त्यामुळे हा संघर्ष मूळ भाजपचा आणि बाहेरून आलेल्या गटाचा आहे,” अशी टीका त्यांनी केली.
आपल्या पत्नीला उमेदवारी का दिली यावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, “ती दोन वेळा नगराध्यक्ष राहिलेली आहे. वीस वर्ष नगरसेवक आणि मी २८ वर्षे जनतेमध्ये काम करत आलो. जनता आमच्या कुटुंबातील व्यक्तीलाच पसंती देते.”
यानंतर त्यांनी विजय शिंदे यांच्यावर वैयक्तिक स्तरावर हल्ला चढवत आरोप केला की, “त्यांनी सगळी सत्ता डान्सबारमध्ये बायकांसोबत नाचून गमावली. कार्यकर्त्यांकडे, जनतेकडे पाहायला वेळ नव्हता. स्वतःचा परिवारही सांभाळू शकले नाहीत.” इतकेच नव्हे तर, गायकवाड यांनी शिंदे यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप करत, “एकेकाळी त्यांच्या घरातील लोकांनी महिलांवर अत्याचार केले. हे महिलांचे रक्षण करणार?” असा सवाल उपस्थित केला.
शिंदे हे काँग्रेसचे “डमी उमेदवार” असल्याचा आरोपही गायकवाड यांनी केला. “हा काँग्रेसला मदत करण्यासाठी उभा आहे, जिंकण्यासाठी नाही,” असा दावा त्यांनी केला. बुलढाण्यात महायुतीतील अंतर्गत संघर्ष तापत चालला असून या वक्तव्यांमुळे आगामी निवडणुकीची राजकीय समीकरणे आणखी गुंतागुंतीची होण्याची शक्यता आहे.


Leave a Reply