बॉलीवूडचा ‘ही-मॅन’ काळाच्या पडद्याआड; धर्मेंद्र यांच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

धर्मेंद्र यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. सोमवारी सकाळी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिव देहाला विले पार्ले येथील स्मशानभूमीत अखेरची श्रद्धांजली अर्पण करण्यात आली असून, या वेळी बच्चन कुटुंबासह अनेक दिग्गज कलाकारांनी उपस्थित राहून अंतिम निरोप दिला.

धर्मेंद्र यांच्या निधनाची माहिती समोर आल्यानंतर अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन हे सर्वात आधी स्मशानभूमीत पोहोचले. त्यांच्या पाठोपाठ संजय दत्त, आमिर खान आणि इतर अनेक कलाकारांनीही हजेरी लावली. पार्थिव शरीर घेऊन जाणारी अ‍ॅम्ब्युलन्स धर्मेंद्र यांच्या मुंबईतील घरातून निघताना अनेकांनी पाहिली. या दृश्याने चाहत्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

धर्मेंद्र हे मागील काही महिन्यांपासून प्रकृती समस्यांनी त्रस्त होते आणि अलीकडेच मुंबईतील हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. चित्रपट निर्माते करण जोहर यांनीही सोशल मीडियावर श्रद्धांजली व्यक्त करताना लिहिले, “एक युग संपले… धर्मेंद्रसारखा मेगास्टार पुन्हा होणार नाही.”

धर्मेंद्र यांनी सहा दशकांहून अधिक काळ हिंदी सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवले. शोले, धर्मवीर, चुपके-चुपके, ड्रीम गर्ल, मेरा गांव मेरा देश अशा असंख्य हिट चित्रपटांमुळे ते ‘ही-मॅन’ म्हणून लोकप्रिय झाले. त्यांची शेवटची झलक ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ या चित्रपटात दिसली होती. तसेच ते लवकरच रिलीज होणाऱ्या ‘इक्कीस’ या चित्रपटातही झळकणार होते, जो आता त्यांचा शेवटचा प्रकल्प ठरणार आहे.

धर्मेंद्र यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एक तेजस्वी अध्याय संपला आहे. त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांची साधी, मनमिळाऊ प्रतिमा आणि अपार अभिनयकौशल्यामुळे ते सदैव चाहत्यांच्या हृदयात जिवंत राहतील.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *