दोन भावांच्या वैरातून धाराशिवचे नुकसान; सरनाईकांचा निंबाळकर–पाटील घराण्यावर हल्लाबोल

धाराशिव जिल्ह्यातील राजकारणात सध्या तापलेले वातावरण कायम असून, दोन प्रमुख राजकीय घराण्यांतील संघर्षामुळे जिल्ह्याचा विकास थांबल्याचा आरोप राज्याचे पालकमंत्री तथा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केला. उमरगा येथे शिवसेना उमेदवार किरण गायकवाड यांच्या प्रचारसभेत बोलताना सरनाईक यांनी खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.

निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचत असताना राजकीय आरोप–प्रत्यारोपांना उधाण आले आहे. महायुती सरकारने जिल्ह्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला, मात्र या निधीतून विकास कार्य न करता एक जण पाण्यात उतरून रील तयार करतो आणि दुसरा समाजमाध्यमांवर स्वत:ची पाठ थोपटतो, अशी टीका सरनाईक यांनी केली. दोन भावांच्या या भांडणात जिल्ह्याचे नुकसान होत असल्याचे त्यांनी स्पष्ट म्हटले.

दरम्यान, जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये महायुतीतील संघर्ष उफाळून आला आहे. आठ पैकी पाच ठिकाणी भाजपने स्वतंत्र उमेदवार उभे केल्याने स्थानिक राजकारणात गोंधळ निर्माण झाला आहे. दोन ठिकाणी काँग्रेससोबत तर एका ठिकाणी शिंदे गटासोबत भाजप लढत आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शब्दयुद्ध चांगलेच तीव्र झाले आहे.

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी त्यांच्या समर्थकांमार्फत भाजप आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्या कुटुंबीयांच्या गाड्यांचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला. त्यावर प्रतिक्रिया देताना पाटील यांनी “मी तीर गावचा आणि बारा गावचा पाटील असल्याने माझ्याकडे गाड्या असणारच. विरोधकांकडे मुद्दे नसल्याने ते अशा गोष्टीवर चर्चा करतात,” असा पलटवार केला. धाराशिव जिल्ह्यातील राजकीय वातावरण त्यामुळे अधिकच तापले असून, निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही गटांतील आरोप–प्रत्यारोपांनी रंगत वाढली आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *