रायपूर येथे रविवारी झालेल्या 60व्या अखिल भारतीय डीजीपी-आणि आयजीपी परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील पोलिस दलाच्या कामकाजाबाबत सार्वजनिक प्रतिमा बदलण्याची तातडीची गरज असल्याचे स्पष्ट केले. बदलत्या सामाजिक वातावरणात युवकांमध्ये पोलिसांविषयी विश्वास दृढ करण्यासाठी व्यावसायिकता, संवेदनशीलता आणि तत्परता वाढवणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
‘विकसित भारत : सुरक्षा आयाम’ या विषयावर होणाऱ्या परिषदेत पंतप्रधानांनी विविध सुरक्षा संवेदनशील मुद्द्यांवर भाष्य केले. डाव्या विचारसरणीच्या उग्रवादातून मुक्त झालेल्या भागांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. बंदी घालण्यात आलेल्या संघटनांवर नियमित पाळत ठेवण्यासाठी यंत्रणा मजबूत करण्याचेही त्यांनी सुचवले. समुद्रकिनारी सुरक्षेसाठी अभिनव मॉडेल्स स्वीकारण्याची गरजही त्यांनी प्रतिपादन केली.
देशातील वाढत्या नैसर्गिक आपत्तींचा संदर्भ घेत त्यांनी पोलिस दलाने चक्रीवादळे, पूर आणि अन्य आपत्कालीन परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी अधिक सक्षम यंत्रणा उभारण्याचे आवाहन केले. सध्या सुरू असलेल्या ‘दितवा’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनातील समन्वय वाढवण्यावर त्यांनी भर दिला.
मादक द्रव्यांच्या वाढत्या समस्येकडे लक्ष वेधताना त्यांनी या समस्येचा सामना करण्यासाठी संपूर्ण शासनव्यवस्थेचा सहभाग आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. अंमलबजावणी, पुनर्वसन आणि समुदायस्तरावर हस्तक्षेप या तीनही पातळ्यांवर एकत्रित कारवाईची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
शहरी पोलिसिंग बळकट करणे, पर्यटन पोलिसांना सक्रिय करणे, तसेच नव्या ‘भारतीय दंड संहितांच्या’ जनजागृतीत वाढ करणे यांचाही त्यांनी उल्लेख केला. NATGRID अंतर्गत एकत्रित करण्यात आलेल्या डेटाबेसचा अधिक प्रभावी वापर करण्यासोबत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) साहाय्याने उपयोगी माहिती निर्माण करण्याच्या दिशेने प्रयत्न करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. परिषदेत विविध राज्यांतील पोलिस दलांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


Leave a Reply