डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६९व्या महापरिनिर्वाणदिनी, ‘राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती’ व ‘तालविहार संगीत संस्था’तर्फे दरवर्षी आयोजित केली जाणारी ‘भीमांजली’ ही शास्त्रीय संगीताद्वारे वाहिली जाणारी अभूतपूर्व आदरांजली यावर्षी दहाव्या वर्षात पदार्पण करत आहे. ६ डिसेंबर रोजी श्री रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, दादर येथे पहाटे ६ वाजता कार्यक्रम पार पडणार आहे.
बाबासाहेबांना संगीताची विलक्षण आवड होती. व्हायोलिन, फिडल, तबला यांसारख्या वाद्यांचे त्यांनी घेतलेले धडे, तसेच त्यांच्या संग्रहातील एलपी रेकॉर्ड्स – हे सर्व आता नागपूर येथील शांतीवन स्मृती संग्रहालयात जपले गेले आहे. संगीतावरील त्यांची ही आसक्ती लक्षात घेऊन पहाटेच्या शांत आणि ध्यानमय वातावरणात ‘बुद्धं शरणं गच्छामि’च्या स्वरातून त्यांना वंदन करण्याची ही परंपरा सुरू झाली.
२०१६ साली पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीवादनातून ‘भीमांजली’ची सुरुवात झाली आणि त्यानंतर दरवर्षी देश-विदेशातील ख्यातनाम वादक या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. पखवाज, व्हायोलिन, सारंगी, सितार, बासरी, संतूर अशा विविध वाद्यांची सुरेल मैफल बाबासाहेबांना अनन्यसाधारण आदरांजली वाहते.
यापूर्वी पंडित भवानी शंकर, पंडित अतुलकुमार उपाध्ये, उस्ताद दिलशान खान, उस्ताद शाहिद परवेज, फ्लूट सिस्टर्स – सुचिस्मिता व देबूप्रिया चॅटर्जी, पंडित राकेश चौरसिया, पद्मभूषण डॉ. एन. राजम, विदुषी कला रामनाथ अशा दिग्गज कलाकारांनी ‘भीमांजली’मध्ये सहभाग नोंदवला आहे. या सर्वांना अखंड साथ देत आले आहेत जगप्रसिद्ध तबलावादक पंडित मुकेश जाधव.
यावर्षीचे मान्यवर कलाकार
या दहाव्या वर्षातही कार्यक्रमाची सुरुवात जागतिक कीर्तीचे खालील कलाकार करतील:
उस्ताद सुजात हुसेन खान – सितार
पंडित राजेंद्र प्रसन्ना – बासरी
पंडित अतुल कुमार उपाध्याय – व्हायोलिन
पंडित मुकेश जाधव – तबला
पंडित श्रीधर पार्थसारथी – मृदंगम
या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील वरिष्ठ सनदी अधिकारी, न्यायव्यवस्था, पत्रकार, लेखक, कवी, नाट्य-चित्रपट कलाकार, उद्योजक, समाजसेवक, राजकीय पदाधिकारी, विविध क्षेत्रातील व्यावसायिक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. पहाटेच्या नीरव शांततेत शास्त्रीय संगीताच्या दिव्य सुरांनी बाबासाहेबांना आदरांजली वाहणारी आणि सलग दहा वर्षे अबाधितपणे सुरू असलेली ही परंपरा देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही अनोखी व अभिमानास्पद ठरली आहे.


Leave a Reply