स्वातंत्र्यपूर्व काळात साहित्य, नाट्य आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात तीन महत्वाच्या संस्था स्थापन झाल्या..
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद
अशी त्यांची नावं..
चार – दोन वर्षांच्या फरकानं या संस्था स्थापन झाल्या.. आनंदाची गोष्ट अशी की त्या आजही आपआपल्या क्षेत्रात भरीव काम करताना दिसताहेत.. साहित्य परिषद आणि नाट्य परिषदेनं शंभरी गाठली आणि पत्रकार परिषद आणखी 13 वर्षांनी शंभर वर्षांची होणार आहे..
एखादी संस्था अखंडपणे काम करीत शंभरी गाठते ही बाब वाटते तेवढी सोपी नसते.. म्हणूनच कोणाचे कितीही मतभेद असले तरी शंभरी गाठलेल्या या संस्था जपल्या पाहिजेत..कारण शंभर वर्षाचा कालखंड छोटा नसतो.. पत्रकारांना संघटीत करून त्यांच्या प्रश्नांकडे व्यवस्थेचे लक्ष वेधण्यासाठी एखादी संघटना असली पाहिजे असा विचार 1930 पासूनच तत्कालीन पत्रकारांच्या मनात होता.. त्याला मूर्तरूप आले, 3 डिसेंबर 1939 रोजी
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची मुंबईत स्थापना झाली .. काकासाहेब लिमये परिषदेचे पहिले अध्यक्ष होते.. बेळगावला 1950 मध्ये परिषदेचं दहावं अधिवेशन झालं तेव्हा परिषदेचे आणि अधिवेशनाचे अध्यक्ष आचार्य प्रल्हाद केशव अत्रे होते..त्यानंतरही मराठीतील अनेक दिग्गज मान्यवर संपादकांनी परिषदेचं अध्यक्षपद भूषविलेलं आहे..

जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात पत्रकारांचा आवाज बुलंद करणारे एस एम देशमुख, सोबत महाराष्ट्र रिसर्च सेंटरचे महेश म्हात्रे, मुंबई मराठी पत्रकार संघाचे संदीप चव्हाण, शैलेंद्र शिर्के आणि राज्यातील अकरा महत्त्वाच्या पत्रकार संघटनांचे प्रतिनिधी
परिषद स्थापन झाली तेव्हा संस्थेचं नाव
“मराठी पत्रकार परिषद” एवढंच होतं.. 1972 मध्ये वसंतराव काणे अध्यक्ष असताना संस्थेचा नामविस्तार होत, संस्थेचं नामकरण अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद असं केलं गेलं..
परिषद स्थापन झाल्यानंतर जिल्हा पातळीवर जिल्हा पत्रकार संघ स्थापन झाले.. हे संघ परिषदेशी जोडले गेले म्हणजे संलग्न झाले.. तालुका संघ जिल्हा संघांना आणि जिल्हा संघ परिषदेला जोडले गेले.. त्यातून परिषदेचं एक भक्कम नेटवर्क महाराष्ट्रभर उभं राहिलं.. राज्यातील हजारो पत्रकार परिषदेशी जोडले गेले.. आज 36 जिल्हे आणि 354 तालुकयात परिषदेच्या शाखा आहेत.. दिल्ली, पणजी, विजापूर, इंदोर, हैदराबाद, बेळगाव, बिदर आदि शेजारच्या राज्यातही परिषदेच्या शाखा असून 11,000 पेक्षा जास्त मराठी पत्रकार परिषदेच्या झेंड्याखाली एकवटले म्हणूनच कर्जत येथील कार्यक्रमात खासदार संजय राऊत म्हणाले होते,
“शिवसेनेपेक्षा ही परिषदेचं नेटवर्क उत्तम आहे..
मुद्दा असा की, परिषदेचं अस्तित्व नाही असा एकही तालुका, जिल्हा किंवा शहर महाराष्ट्रात नाही.. कोणाचं कितीही पोट दुखलं तरी एक गोष्ट पोटदुखयांना देखील मान्य करावी लागेल की,
परिषदेनं पत्रकारांच्या हक्काची राज्यव्यापी चळवळ उभी केलेली आहे.. चौथ्या स्तंभाचं स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी जे जे शक्य आहे ते ते परिषदेनं गेल्या 86 वर्षात केलेलं आहे.. बिहार प्रेस बिल आलं तेव्हा परिषदेनं सर्वप्रथम त्याला विरोध केला.. परिषदेचे 80 पदाधिकारी, सदस्य पंधरा दिवस हर्सूलच्या तुरूंगात होते..नंतरही माध्यम स्वातंत्र्यावर जेव्हा जेव्हा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला तेव्हा तेव्हा पहिला आवाज परिषदेनं उठविला..वृत्तपत्र स्वातंत्र्य रक्षणाबरोबरच पत्रकारांच्या हक्काचे अनेक विषय परिषदेनं मार्गी लावले..
पत्रकार संरक्षण कायदा,
पत्रकार पेन्शन योजना,
पत्रकार आरोग्य योजना
अधिस्वीकृतीचे प्रश्न
साप्ताहिकं आणि छोट्या दैनिकाचे प्रश्न
परिषदेनं हाती घेतले.. मार्गी ही लावले…
आर्थिक मदतीसाठी कायम सरकारच्या दयेवर अवलंबून न राहता, परिषदेनं स्वत:चा निधी उभारून गरजू पत्रकारांना आर्थिक मदत केलेली आहे, आजही परिषदेचं हे काम सुरू आहे. कोरोना पासून आतापर्यत गरजू, आजारी पत्रकारांना 80 लाख रूपयांपेक्षा जास्त मदत परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली आहे..
परिषद आपल्या वेळेला धावून येते,
परिषदेला हाक दिली की परिषद नक्की ओ देते हा विश्वास पत्रकारांच्या मनात निर्माण करण्याचं काम परिषदेनं केलं आहे.. याचा आनंद आम्हाला आहे..

जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात पत्रकारांचा आवाज बुलंद करणारे एस एम देशमुख, सोबत महाराष्ट्र रिसर्च सेंटरचे महेश म्हात्रे, मुंबई मराठी पत्रकार संघाचे संदीप चव्हाण, शैलेंद्र शिर्के आणि राज्यातील अकरा महत्त्वाच्या पत्रकार संघटनांचे प्रतिनिधी
दर दोन वर्षांनी परिषदेची अधिवेशन होतात, निवडणुका होतात.. दरवर्षी उत्कृष्ट काम करणारया तालुका आणि जिल्हा संघांचा गौरव केला जातो आणि दरवर्षी पत्रकारितेत उत्तम कार्य करणारया पत्रकारांचा सन्मानही केला जातो..
परिषदेचं हे काम पाहूनच मुंबईतील एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री मा. नितीन गडकरी यांनी “पत्रकारिता आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद शतायुषी झाली पाहिजे” अशी भावना व्यक्त केली होती..
मात्र काही नतद्रष्टांना देशातील सर्वात जुन्या पत्रकार संघटनेचं मोठेपण कायम डोळ्यात खुपत असते.. ते परिषदेवर सातत्यानं वार करीत राहतात, अधिस्विकृती समितीवर परिषदेचे पाच सदस्य आहेत, हे पाच जण काहींच्या डोळ्यात खुपतात यांची संख्या कमी करून ती तीनवर आणली पाहिजे अशी भूमिका काही जण घेतात.. व्यक्तीगत राग लोभातून असं करून आपण पत्रकारांच्या एका मोठया चळवळीला नख लावण्याचं पाप करतो आहोत याचंही भान या महाभागांना नाही.. अर्थात अशा कारस्थानांचा परिषदेवर फरक पडत नाही.. संघर्ष हा परिषदेसाठी नवा नाही.. अनेक संकटांवर मात करून परिषद अभिमानानं, केवळ पत्रकारांचं हित जपत मजबुतीनं उभी आहे.. कारण महाराष्ट्रातील सामांन्य पत्रकार परिषदेशी घट्टपणे जोडलेला आहे.. परिषदेची ही ताकद आहे..कोणी कितीही प्रयत्न करू देत, परिषदेची ही चळवळ कोणाला थांबविता येणार नाही हे नक्की.. पत्रकारांच्या या पाठबळावरच आणखी 13 वर्षांनी आम्ही दिमाखात
शंभर वर्षांचे होत आहोत.. आम्ही परिषदेशी जोडलेलो आहोत याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे.. असं मला आणि माझ्या सहकारयांना कायम वाटत असतं.. 3 डिसेंबर हा परिषदेचा स्थापना दिवस.. आज परिषद 87 व्या वर्षात पदार्पण करीत आहे..
परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील तमाम पत्रकारांना हार्दिक शुभेच्छा..
एस.एम.देशमुख
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद


Leave a Reply