महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाखालील महायुती सरकार , ५ डिसेंबर रोजी, आपला पहिल्या वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करत आहे. फडणवीस, शिंदे , पवार सरकारसाठी, हे वर्ष, एखाद्या विलक्षण वेगवान ‘रोलर कोस्टर राईड’, प्रमाणे प्रचंड चढउताराचे गेले. पण सरकारची ‘स्टीयरिंग’ वरील पकड कधी ढिली पडली नाही. गाडी कधीच रस्ता सोडून खाली उतरली नाही…
या त्रिपक्षीय सरकारच्या वर्षपूर्ती सोहळ्याच्या मुहूर्तावरच, “महिनाभरात मराठी माणूस, पंतप्रधान होण्याची शक्यता आहे,” असे सूचक विधान माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
त्यांच्या या विधानाने महाराष्ट्रासह देशाच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आणि खरंच, पंतप्रधान मोदी आपल्या पदाचा राजीनामा देणार का ?
पंतप्रधान होऊ शकणारा तो मराठी माणूस कोण असेल ?
अगदी महिन्याभरात हे कसे होईल ? असे असंख्य तर्कवितर्क लढवले जात आहेत.
पृथ्वीराज चव्हाण यांचे हे म्हणणे नेमके काय आहे, हे समजून घेण्यासाठी, त्यांनी वे विधान ज्याच्या आधारे केले, ते सगळं प्रकरण समजून घेतलं पाहिजे… अमेरिकेसह जागतिक राजकारण हादरवून सोडणाऱ्या, कुरापती उद्योगपती जेफ्री एपस्टीनच्या ईमेल्सचा
संदर्भ घेऊन वादग्रस्त भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी जी खळबळजनक मुलाखत दिली, त्याच माहितीच्या आधारे पृथ्वीराज चव्हाण यांनी, ‘मराठी माणूस’ पंतप्रधान होणार, हे भाष्य केले. म्हणून आपल्याला प्रथम जेफ्री एपस्टीनच्या जग हादरविणाऱ्या भानगडी समजून घेतल्या पाहिजेत.
२०२५ च्या सुरुवातीला जेफ्री एपस्टीनच्या नव्या ईमेल्सचा उलगडा झाला, तेव्हा त्यामधून पुन्हा एकदा लैंगिक गुन्ह्यांचा घाणेरडा दस्तऐवज बाहेर पडणार, असे सगळ्यांना वाटत होते. पण या वेळी चित्र वेगळं होतं. या ईमेल्समधून समोर आलं ते केवळ एका गुन्हेगाराच्या वैयक्तिक विकृतींचं वर्णन नव्हतं, तर एक जागतिक राजकीय उलथापालथ घडवण्याचं व्यवस्थित आखलेलं षडयंत्र होतं. आणि त्याच्या केंद्रस्थानी दोन नावे सतत डोकावत होती. स्टीव्ह बॅनन आणि जेफ्री एपस्टीन.
हे षडयंत्र कोणत्याही एका देशापुरतं मर्यादित नव्हतं. ते होतं एक आंतरराष्ट्रीय अति-उजव्या नेटवर्कचं जाळं, ज्याचा उद्देश उदारमतवादाला गिळंकृत करणे, राष्ट्रवादाच्या आक्रमक वृत्तीला राजकीय मुख्य प्रवाहात आणणे आणि बहुपक्षीय संस्थांची कंबर मोडणे हा होता.
बॅननने याची बीजे २०१७ नंतरच पेरली होती…“मी ग्लोबल राईट-रिव्होल्टचा सेनापती आहे” असे उघडपणे बोलणारा, स्टीफन केविन बॅनन हा या षडयंत्राचा आर्किटेक्ट. तो एक वादग्रस्त मीडियावाला , राजकीय रणनीतीकार, विश्लेषक आणि माजी इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून प्रसिद्ध . तो डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातील पहिल्या सात महिन्यांपर्यंत व्हाईट हाऊसचचा “मुख्य रणनीतीकार” म्हणून कार्यरत होता , त्यानंतर ट्रम्प यांनी त्याला पदावरून हटवले तो भाग वेगळा. त्याआधी तो ब्राइटबार्ट न्यूजचा माजी कार्यकारी अध्यक्ष म्हणून कार्यरत होता.
या अति महत्वाकांक्षी बॅननने “द मूव्हमेंट” मार्फत सल्विनी, ले पेन, ऑर्बन यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा त्यामागील कुटील हेतू तेव्हाच स्पष्ट झाला होता. त्याच काळात ब्राझीलपासून ब्रिटनपर्यंत उजव्या राष्ट्रवादाची लाट पसरत गेली आणि २०२४ नंतर अमेरिकेतही तिचे प्रतिध्वनी पुन्हा घुमू लागले.
या जाळ्याला ‘आर्थिक रक्तपुरवठा’ कुणाकडून होत होता, हा सर्वात संवेदनशील मुद्दा ठरतो. म्हणूनच, धनाढ्य एपस्टीनची या साखळीत नव्याने उघड झालेली भूमिका धक्कादायक आहे. तो आर्थिक पुरवठ्याचा सूत्रधार होता, विशेष म्हणजे, तो स्वतः या कडवट उजव्या विचारसरणीचा नव्हता.
त्याची वैचारिक भूमिका वेगळी होती. पण तो जुगाडू होता, “फिक्सर” होता. त्यामुळे तो “कनेक्शन” बनवून देत असे. अर्थात, त्यात “अंतिम लक्ष्य”, समोरच्या सामर्थ्यवान माणसाला “भक्ष्य” बनविणे हेच असे.
त्याने, आपले सारे कसब पणाला लावून अमेरिकन टेक अब्जाधीश, खाजगी फंड आणि क्रिप्टोमार्फत चालणारी PAC यंत्रणा या सर्वांच्या एकत्रित पैशातून उभी केली एक “भीतीदायक अर्थव्यवस्था.”
हा एपस्टीन मोठा ‘खिलाडी’ होता. त्याच्याकडे कडे होती,आपल्या माणसांना जगभरात गुप्तपणे नेणारी खाजगी जेट्स.अत्यंत श्रीमंत उद्योगपतींशी त्याने दोस्ताना जपला होता. संयुक्त राष्ट्रसंघ, जागतिक बँकेतील बडे लोक त्याच्या संपर्कात होते. अमेरिकेतील उच्चभ्रू वर्तुळात त्याला मुक्तप्रवेश असे. या सगळ्यांना वेळप्रसंगी ‘ब्लॅकमेल’ करण्याची ताकदही त्याने ‘कमावली’ होती. त्यानेच बॅननला फंडिंग, क्रिप्टो व्यवहारांची तंत्रे उपलब्ध करून दिली. जगभरातील मोठ्या “पॉवर-ब्रोकर” लोकांशी बॅननचा संपर्क करून देऊन तो थांबला नाही. एपस्टीनने त्याला, कोणते राजकीय नेते या गटाशी जुळवाजुळव करण्यास इच्छुक आहेत, ही माहिती पुरवली. त्यामुळे बॅननला आपली रणनीती आखणे सोपे गेले.
रणनीती होती, भीतीदायक नरेटिव्हस तयार करणारी एक व्यापक प्रचार योजना.
या मंडळींनी तयार केलेली नरेटिव्हस, अवघ्या जगाला घाबरवणारी होती. जरा वर्ष, सहा महिने मागे जा, आणि तुमच्या फेसबुक, इन्स्टा किंवा ‘व्हाट्स अप’ वर येणारे व्हिडीओ, फोटो आठवा. युरोप, इंग्लंड -अमेरिकेमध्ये घुसलेल्या स्थलांतरितांच्या कहाण्या आठवा… ‘ग्रेट रिप्लेसमेंट’, ‘सभ्यतेचा, संस्कृतीचा ऱ्हास’, ‘स्थलांतराचा पूर’, ही, या पोस्टच्या माध्यमातून लोकांच्या मनात धडकी भरवणारी ‘कथने’ बॅनन आणि कंपनीने तयार केली, तो केवळ प्रचार नव्हता; ती गुंतवणूक होती. ज्या जगात सीमारेषा लोखंडी भिंतींसारख्या उभारल्या जातील, तिथेच त्यांचा प्रभाव आणि नफा वाढणार होता… लोकांच्या मनात भीती निर्माण करून, आपले राजकीय साम्राज्य उभारण्याचा तो पद्धतशीर डाव आहे, हे समजायला युरोप, अमेरिकेतील जाणत्या लोकांनाही उशीर झाला. म्हणूनच आपल्या देशात, आता कुठे हळू हळू जाग येत आहे. कारण स्वतःला पुरोगामी समजणारे, ज्येष्ठ पत्रकार अजूनही, २०१४ च्या मोदी विजयाला सी आय ए आणि मोसाद जबादार असल्याचे ‘कुमार साहित्या’तील ‘फेक नरेटिव्ह’, चर्चेत आणण्याच्या धडपडीत गुंतलेले दिसत आहेत. दिल्लीच्या भगव्या धुक्याने केलेली त्यांची नजरबंदी जेव्हा उठेल तेव्हा, “रिअॅक्शनरी इंटरनॅशनल”, म्हणजे, जगातील लोकशाही समोर, जबडा पसरून उभा असलेला सर्वात मोठा धोका आहे, त्याची त्यांना जाणीव होईल. पण तोवर उशीर झाला असेल… हे सुसंघटित अति-उजवे नेटवर्क, ज्यात अत्यंत श्रीमंत आणि प्रभावी जागतिक व्यक्ती सहभागी झालेल्या आहेत. ते कदाचित आपल्या दारात पोहचले असेल.
या राजकीय-अर्थिक महाशक्तीला, “आंतरराष्ट्रीय सिंडीकेट” ला कोणत्याच गोष्टीचे सोवळं नाही. त्यांना जेव्हा एखाद्या देशातील राजकीय व्यवस्था मोडावीशी वाटली, तेव्हा त्यांना, रस्त्यावरची ताकद पुरवली Proud Boys, Oath Keepers सारख्या हिंसक गटांनी. QAnonने नको असलेल्या तथ्यांवर काल्पनिक धुकं पसरवलं आणि असंतोषाला कटकारस्थानाची जोड दिली. आज या सर्वांचा प्रभाव इतका वाढला आहे की अनेक देशांत अति-उजवे नेते निवडून येणं ही ‘सामान्य घटना’ बनली आहे.
युरोपमध्ये मेलोनी, ऑर्बन, फ्रान्स- जर्मनीतील कट्टर राष्ट्रवादी चळवळींची वाढ, हे सर्व या मोठ्या, न दिसणाऱ्या यंत्रणेच्या गतीमानतेची चिन्हे आहेत. हे जाळे आज “मुख्यालयविरहित”, decentralized, पद्धतीने चालत आहे. त्यांच्याकडे कार्यालय, कर्मचारी वैगेरे असे “फिजिकल स्ट्रक्चर” नाही, पण त्यांच्याकडे अधिक प्रभावी शस्त्रं आहेत: सोशल मीडिया मायक्रो-इकोसिस्टम, पॉडकास्ट, एन्क्रिप्टेड वॉलेट्स, खाजगी जेट्स आणि एक खास शत्रूंची यादी.
“आंतरराष्ट्रीय सिंडीकेट” च्या हिटलिस्टवर, पहिल्या क्रमांकावर आहेत, युरोपियन युनियन, युनायटेड नेशन्स, जागतिक बँक , आपल्या देशातून स्थलांतरित झालेली लोकं , विविध प्रदूषणांपासून जग वाचवा म्हणणारे, पर्यावरणवादी आणि उदारमतवादी लोकशाहीचे पुरस्कर्ते…
पण या सर्व गदारोळात महत्त्वाचा मुद्दा हा की, या सिंडीकेटचे आयुष्य कोणत्याही एकाच व्यक्तीवर अवलंबून नाही. एपस्टीन मृत झाला, बॅनन कोर्टात आहे, ट्रम्प पुन्हा व्हाइट हाऊसमध्ये आहे, पण हे जाळे आता स्वयंचलित आहे, “ऑटो-पायलट मोडवर.” हे किती धोकादायक आहे, याची कल्पनाही करवत नाही.
आश्चर्याची बाब म्हणजे, या सहा हजार कागदपत्रांमध्ये आजपर्यंत, तीन भारतीयांची नावे वाचायला मिळाली. त्यात पहिले नाव आहे, अनिल अंबानी, दुसरे स्पिरीट्युल गुरू, दीपक चोप्रा आणि हरदीप पुरी यांची. ताजी बातमी सचिन तेंडुलकर या नावाची आहे. आता त्यात दिल्लीतील सत्ताधारी वर्तुळातील काही मोठ्या नावांची भर पडेल, आणि जेव्हा या मान्यवर लोकांचा वाईट कामातील सहभाग सिद्ध करणारे फोटो, व्हिडीओ किंवा कागदपत्रे येतील त्यावेळी प्रचंड मोठा गोंधळ होईल, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. त्याचाच आधार घेऊन, सुब्रमण्यम स्वामी यांनी नजीकच्या काळात, देशात मोठे राजकीय फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. इतकेच नव्हे तर स्वामी यांनी मोदी यांना फारकाळ सत्तेत राहता येणार नाही, वर्षभरात त्यांचे पंतप्रधानपद जाईल, असे भाकीत केले आहे. स्वामी तिथेच थांबत नाहीत. अनेक लैंगिक प्रकरणांमुळे कुप्रसिद्ध बनलेल्या जेफ्री एपस्टीन सोबत पंतप्रधान मोदी यांच्या भेटीचे कारण काय होते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सुब्रमण्यम स्वामी यांच्या या विधानांचा आधार घेऊन,पृथ्वीराज चव्हाण यांनी, महिन्याभरात, “मराठी पंतप्रधान होणार”, अशी थिअरी मांडली आहे…
पृथ्वीराज चव्हाण, हे सुविद्य राजकारणी आहेत. ते माजी मुख्यमंत्री तर आहेतच, पण अमेरिकेत शिक्षण आणि यशस्वी व्यवसायाचा अनुभव असलेले नेते आहेत. दिल्लीत एकाच वेळी पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री आणि काँग्रेसचे सरचिटणीस या पदांची जबाबदारी सांभाळणारे पृथ्वीराज बाबा हे, तत्कालीन पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग आणि काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी यांच्यातील महत्वाचा दुवा होते. राष्ट्रीय पातळीवर पक्ष आणि प्रशासनाचा इतका मोठा अनुभव असणारा आणि राजकारणात सक्रिय असणारा दुसरा नेता, महाराष्ट्रात पाहायला मिळत नाही. आणि म्हणून जेव्हा, असा नेता कोणते तरी राजकीय विधान करतो, तेव्हा त्यात निश्चितच तथ्य असते. हे येथे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही.
एकूणच काय तर, एपस्टीनच्या ईमेल्सनी केवळ एक स्कँडल उघडकीस आणले नाही.
तर, जागतिक स्तरावरील एक गंभीर, व्यापक, अति-उजव्या आक्रमणाचा आराखडा समोर ठेवला आहे.
त्यामुळे जगभरात आणि पर्यायाने भारतातही प्रचंड वैचारिक ‘मंथन’ होणार आहे. या घुसळणीतून जसे हलाहल विष बाहेर पडेल, तसे कोटी कोटी मराठी मनांच्या स्वप्नातील पंतप्रधानपद , भाग्यवान मराठी नेत्याला लाभो ! त्याचे नाव कोणते असेल, देवेंद्र फडणवीस की नितीन गडकरी की आणखी काही, या चर्चेत मला तरी पडायचे नाही. संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाल्यापासून गेली पासष्ट वर्षे, ज्याची आपण डोळ्यात प्राण आणून वाट पाहिली… यशवंतराव चव्हाण ते शरद पवार, या प्रवासात ज्याने हुलकावणी दिली. ते पंतप्रधानपद, या जागतिक अराजकाच्या तोंडावर आमच्या मराठी माणसाला लाभो,
आणि ‘महाराष्ट्र आधार या भारता’चा हे वचन सिद्ध होवो…हीच अपेक्षा !
महेश म्हात्रे
संपादक
महाराष्ट्र रिसर्च सेंटर


Leave a Reply