नवी दिल्ली – संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व भाजप खासदारांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. संसदीय कामकाजातील सहभाग, फ्लोअर मॅनेजमेंट तसेच काल लोकसभेत कोरम पूर्ण न झाल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीच्या संदर्भात ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. सकाळी १० वाजता केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या दालनात प्राथमिक चर्चा झाली. त्यानंतर सकाळी १० वाजून २५ मिनिटांनी सर्व खासदार पंतप्रधानांच्या दालनात दाखल झाले.
काल लोकसभेत गणपूर्ती न झाल्याने बेल वाजवावी लागली होती. शासन पक्षाच्या खासदारांची उपस्थिती कमी असल्यामुळे ही वेळ आली. सरकारी पक्षासाठी ही स्थिती प्रतिकूल मानली जाते. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांनी वरिष्ठ मंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सरकारच्या प्रतिमेवर याचा परिणाम होऊ नये यासाठी संसदीय उपस्थिती वाढवण्याची गरज असल्यावर पंतप्रधानांनी भर दिला.
बैठकीदरम्यान पंतप्रधानांनी खासदारांकडून सध्याच्या राजकीय परिस्थितीवरील त्यांची मते जाणून घेतली. मंत्रीमंडळ कामकाज, मतदारसंघातील प्रश्न, संसदेतील सक्रियता या मुद्द्यांवरही चर्चा झाली. संसदीय कामकाजात सातत्याने आणि शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग घेण्याचे मार्गदर्शन पंतप्रधानांनी केले. फ्लोअर मॅनेजमेंटमध्ये कोणती सुधारणा आवश्यक आहे, यावरही खासदारांशी संवाद साधण्यात आला.
महाराष्ट्रातील लोकसभा आणि राज्यसभेतील सर्व भाजप खासदार या बैठकीला उपस्थित होते. राज्यसभेतून धनंजय महाडीक, अनिल बोंडे, भागवत कराड, अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे, धैर्यशील पाटील आणि उज्ज्वल निकम तर लोकसभेतून नितीन गडकरी, नारायण राणे, मुरलीधर मोहोळ, हेमंत सावरा, अनुप धोत्रे, स्मिता वाघ आणि पियुष गोयल यांनी हजेरी लावली.
भविष्यात इतर राज्यांतील भाजप खासदारांशीही अशाच प्रकारे संवाद साधून संसदीय कामकाजात अधिक समन्वय साधण्याची पंतप्रधानांची योजना असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.


Leave a Reply