संत माउली ज्ञानेश्वर महाराज , गिरनार शिखर आणि गुरुदेव दत्त

पैल मेरूच्या शिखरी ।
एक योगी निराकारी ।
मुद्रा लावुनी खेचरी ।
प्राणायामी बैसला ।।१।।
तेणे सांडीयेली माया ।
त्यजियेली कंथा काया।
मन गेले विलया ।
ब्रंम्हानंदा माझारी ।।ध्रु।।
अनुहत ध्वनी नाद ।
तो पावला परमपद ।
उन्मनी तुर्या विनोद ।
छंदे छंदे डुल्लतसे ।।३।।
ज्ञान गोदावरीच्या तीरी ।
स्नान केले पांचाळेश्वरी ।
ज्ञानदेवाच्या अंतरी ।
दत्तात्रय योगिया ।।४।।

दत्त गुरुंच्या योगिक लीला आणि अपूर्व अध्यात्मिक स्थितीचे वर्णन करणारा, संत श्रेष्ठ, योगीराज ज्ञानोबा माउलींचा हा अभंग अप्रतिम आहे. त्यातील बरेचसे संदर्भ, अत्यंत सूक्ष्म आध्यात्मिक अवस्थांची उकल करतात. ते म्हणतात, ‘पैल मेरूच्या शिखरी’, म्हणजे साधकाच्या चित्ताने जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांना पार करून जी चौथी, अनिर्वचनीय तुर्या अवस्था गाठली आहे. त्या अगम्य पातळीवर एक परिपूर्ण, सर्वाधिकारसंपन्न योगीपुरुष समाधीस्थ आहे. ही अवस्था म्हणजे बाह्य-जगाचा अंश उरत नाही; केवळ शुद्ध चैतन्याचा, परमात्म्याशी एकरूप होण्याचा दरवाजा उघडतो. पण हेच वर्णन जर लौकिक पातळीवर पाहीले, तर, आपल्या डोळ्यासमोर गिरनार पर्वत येतो… सौराष्ट्रातील जुनागढजवळचे हे स्थान दत्तोपासनेचे अत्यंत प्राचीन केंद्र मानले जाते. नाथसंप्रदायाने भारतभर दत्तभक्तीचा जो प्रभाव निर्माण केला, त्याचे जिवंत आणि प्रभावी प्रत्यंतर गिरनार पर्वतावर आजही उभे आहे. गिरनारच्या उंच शिखरांपैकी एका शिखरावर वसलेले हे दत्तमंदिर केवळ धार्मिक स्थळ नाही, तर भारताच्या अध्यात्मपरंपरेचा एक मौलिक वारसा आहे. त्यामुळे असे वाटून जाते की,नाथसंप्रदायाची दीक्षा घेतलेले निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर महाराज हे त्यांच्या अध्यात्मिक प्रवासात गिरनार पर्वतावर गेले असतील का ? तसेही पाहीले तर , गुरुवार दि. २२ ऑगस्ट इ.स. १२७५ रोजी जन्मलेले ज्ञानेश्वर महाराज, जेव्हा पैठणला धर्मसभेसमोर गेले होते, त्यावेळी त्यांचे वय सहा होते. माझी मुंज करा, असे सांगणाऱ्या निवृत्तीनाथांचे वय अवघे आठ होते. त्यावेळी या प्रज्ञावान मुलांनी, अद्वैताचे दर्शन घडवून धर्मपीठाची बोलती बंद केली होती. तेव्हापासून, म्हणजे १२८१ ते १२९१ पर्यंत, म्हणजे नेवाश्याला निवृत्ती – ज्ञानदेव, ज्ञानेश्वरी सांगायला आले. त्या दहा वर्षाच्या कालावधीत या चारही बहीण – भावांचे शिक्षण कुठे झाले, ते कुठे फिरत होते, याचे संदर्भ कुठेच मिळत नाहीत. त्यामुळे, त्यांच्या या अभंगामधील गिरनारचे प्रत्ययकारी चित्रण वाचताना, निवृत्ती – ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई , त्यांच्या अध्यात्मिक वाटचालीत तिकडे गेले असावेत, असे लौकिकदृष्ट्या वाटून जाते. पण या अभंग ओळीतून प्रकट होणारे आध्यात्मिक अवस्थांचे टप्पे, ज्ञानेश्वरांच्या ज्ञानपूर्ण प्रतिभेचे सुंदर दर्शन घडवितात.
ज्ञानेश्वर माउली लिहितात, हा योगीपुरुष, म्हणजे दत्तात्रेय, खेचरी मुद्रा धारण करून, जिव्हेला तालुमध्ये स्थिर करीत, सर्व इंद्रिय-प्रवृत्तींना विराम देऊन, प्राणायामाने अंतर्मनाची सर्व दिशा परमेश्वराकडे वळवीत, त्या सर्वोच्च पदावर आरूढ बसलेला आहे. मायेचा परित्याग, संसाराचा अल्पसा मोह, अगदी अंगावरची कंथा आणि शरीराभिमान, हे सर्व त्याने आपोआप सोडून दिले आहेत. कारण त्याचे मन पूर्णपणे परमानंदात लीन झाले आहे; जिथे मी, तू, तो, इतरेपणा काहीही उरत नाही.
अंतर्बाह्य अव्याहत चालणारा अजपा जप, ‘सोऽहं’चा अनाहत नाद, तोही आता विलीन झाला आहे. नाद, शब्द, देह, श्वास, विचार…सर्व काही ज्या ठिकाणी शून्यरूप होतात, त्या परमात्मस्वरूपात हा नादही समरस झाला आहे. आणि या सर्वावर आरूढ आहे ती उन्मनी अवस्था, जी मनाच्या सर्व गतींना थांबवून, शुद्ध चेतनेत डुलणारी, साक्षात तुर्याची माधुर्यपूर्ण अनुभूती आहे.
ज्ञानदेव पुढे म्हणतात, हा दत्तात्रेय म्हणजे केवळ योगी नाही, तर ज्ञानगंगेत स्नान करून पवित्र झालेला पंचाळेश्वरातील आचार्य आहे; ज्याच्या ज्ञानाच्या प्रवाहासमोर सर्व वेद-शास्त्रेही मूक होतात. असा हा सर्वज्ञ, सर्वव्यापी, अतुलनीय योगीराज, दत्तात्रेय, माझ्या अंतर्यामी , माझ्याच चेतनेच्या मध्यभागी, सहज विहरत आहे, अशी माऊलींची अनुभूती या अभंगातून व्यक्त झाली आहे.
तर अशा या दत्तगुरु योगीराजांच्या संदर्भात, ज्येष्ठ पुरातत्वज्ज्ञ व इतिहास संशोधक डॉ. यशवंत रायकर
“अथातो धर्मजिज्ञासा” या पुस्तकात फार समर्पक शब्दात लिहिले आहे.
डॉ. यशवंत रायकर यांच्या मते, “बाराव्या शतकापासूनची इस्लामी आक्रमणे व सुफी संतांचे कुटिल उद्योग या पार्श्वभूमीवर दत्ताचे प्रतीकशास्त्र (सिम्बॉलिझम) विकसत गेले.
पहिले दत्तोपासक चांगदेव राऊळ (११५०-१२२०), जे महानुभाव संप्रदायाचे संस्थापकचक्रधरस्वामींच्या काळात होऊन गेले आणि त्यांना ‘पंचकृष्णावतारां’पैकी चौथे अवतार मानले जाते. या चांगदेव राऊळ यांनी जेव्हा, संपूर्ण उत्तर हिंदुस्थान आक्रमकांच्या घशात गेलेला पाहिला. आणि आता दक्षिण फार काळ सुरक्षित राहणार नाही हे ओळखले. लोक सुफींच्या तावडीत सापडू नयेत. स्वधर्म टिकवण्यासाठी त्यांना आंतरिक ताकद मिळावी म्हणून त्यांनी दत्तोपासना सुरू केलेली दिसते. नंतर दत्ताचे पहिले अवतार ‘श्रीपाद वल्लभ’ यांनी दक्षिणेतील सर्व हिंदू राज्ये नष्ट झालेली पाहिली. चौदाव्या शतकाने गाठलेला मूर्तिपूजकांच्या कत्तलींचा उच्चांक अनुभवला. त्यातच उत्तर हिंदुस्थानी यात्रा केल्या व स्वधर्मरक्षण साधले. तिसरे सत्पुरुष ‘नरसिंह सरस्वती’ दत्त संप्रदायाचे संस्थापक व दत्तात्रेयाचा दुसरा अवतार. त्यांनीही चौदाव्या शतकाअखेरीस उत्तरेची यात्रा करून नंतर चोवीस वर्षे मराठी समाजाच्या हिताचे कार्य केले. धर्मप्रसाराच्या बाबतीत सुलतान, उलेमा व सूफी संत एकाच माळेचे मणी होते हे ओळखले. चौथे महात्मा गंगाधर सरस्वती (सोळावे शतक) गुरुचरित्राचे कर्ते. त्यांनी वेदांत, क्रियाशून्य भक्ती, संसार तुच्छ लेखून मोक्षाच्या मागे लागणे योग्य नाही हे शिकवले. सत्वशील वर्तनावर भर दिला.

पुढे १८५७ च्या बंडानंतर नेटिवांच्या धार्मिक भावना न दुखवण्याचे धोरण इंग्रजांनी अवलंबिले. त्याचा लाभ मुसलमानांनी आक्रमक होण्यात उठवला. मुसलमानांच्या भावना ही देशाची संवेदनशील बाब होऊन बसली. या प्रतिकूल काळात दत्ताचे अवतार मानल्या गेलेल्या तीन सत्पुरुषांनी स्वधर्म रक्षणासाठी दत्तसंप्रदायाची आघाडी नव्याने सांभाळली. ते म्हणजे माणिक प्रभू, अक्कलकोटचे स्वामी व वासुदेवानंद सरस्वती होत. त्यांची परंपरा अजून टिकून आहे. मंदिरे पाडून त्यावर मशिदी उभारणे या पवित्र धर्मकार्यात झालेले अत्याचार क्षम्य होत, अशी शिकवण देणाऱ्या सूफी संतांच्या पार्श्वभूमीवर पाहिल्याखेरीज दत्तात्रेयाला ओळखणे शक्य नाही, असे कळून चुकल्यामुळे वेगळ्या पद्धतीने दत्तात्रेयाचा शोध घेतला.

दत्ताचे प्रतीकशास्त्र बरेच काही सांगते, पण ते मिथकाच्या भाषेत बोलते. ९०० वर्षाच्या खाणाखुणा जपते. इसवी सनाच्या सुरुवातीला शाक्त उपासनेतून दत्तात्रेयाची निर्मिती झाली असावी असे संशोधक मानतात. आदिमानवाला विश्वतत्त्व प्रतीत झाले ते योनीच्या रूपात. तिची ओबडधोबड नग्नमूर्ती हे विश्वाचे गर्भगृह, सर्जकतेचे प्रतीक. पुरुषतत्त्व म्हणून लिंगपूजा आली. लिंग हे शिवलिंग व योनी ही आदिशक्ती. अलौकिक शक्तींवर ताबा मिळवून देणारी यातुविद्या प्राप्त करता येते, ही श्रद्धा त्यामागे आहे. दत्तात्रेयाचा संबंध मंत्र-तंत्राशी होता. मद्य-मदिराक्षीत रमलेला दत्त त्रिपुरारहस्यात येतो. मार्कंडेय पुराणातही तांत्रिक शाक्त दत्त आढळतो. वामाचारांचा प्रभाव सर्वच पंथांवर पडला होता. बौद्धांचे महाचंडरोषण तंत्र हे एक उदाहरण. ते प्रसिद्ध झालेले उपलब्ध आहे. महाचंडरोषणाची तेराव्या शतकातील मूर्ती पन्हाळेकाजी येथे आढळते. मुळात दत्त मारक होता, त्याला तारक बनवण्यात आले. गोरखनाथांनी अकराव्या-बाराव्या शतकात धर्माचे शुद्धीकरण करण्याची मोहीम उघडली. अवधूत या वर्णाश्रमांची बंधने झुगारणाऱ्या बैराग्याला दत्तात्रेय बनवले. म्हणून अवधूत हे दत्ताचे पर्यायी नाव झाले.

दत्तोपासकांना दत्त हे सर्वात प्राचीन दैवत वाटते. कारण दत्त त्रिपुरा देवीचा उपासक मानला गेला. त्रिपुरा म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांच्या आधीची शक्ती. तिचे रहस्य जाणणारा तो अत्री (अ+त्री), अत्रीचा पुत्र दत्त. दत्त+अत्रेय म्हणून दत्ताचा दत्तात्रेय झाला. दत्त प्राचीनतम असे मानल्यानंतर अत्रीविषयक उल्लेख दत्तचरित्रात येऊ लागले. कोणत्याही पुराणात दत्ताचे सुसंगत साद्यंत चरित्र नाही. दत्ताने शंकरापासून ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतल्यामुळे (ब्रह्मपुराण) नाथसंप्रदायात दत्त आदिसिद्ध झाला. उत्तरकालीन उपनिषदात दत्त सन १००० नंतर येतो. आधीचा दत्त एकमुखी आहे. पुराणांच्या अंतिम संस्कारांच्या वेळीसुद्धा दत्त त्रिमुखी नाही. मराठी मनात त्रिमुखी दत्त वास करू लागला तो तेराव्या शतकापासून.

दत्त संप्रदायाने काळाची गरज ओळखून त्रिमुखी दत्त ही नवी संकल्पना मोठ्या अक्कलहुशारीने परंपरेत बसविली. दत्ताचे प्रतीकशास्त्र पाहा. तीन मुखे ही ब्रह्मा, विष्णु, महेश यांचे एकत्रीकरण, विष्णुप्रमाणे चार हातात शंख, चक्र, गदा, पद्म, पाचव्या हातात वैराग्याचे कमडलू. सहाव्या हातात शंकराच्याकणखर वृत्तीचे त्रिशूल. गाय म्हणजे पृथ्वी किंवा गायत्रीमाता. परंपरेला पूज्य. जटेतला शिवाचा चंद्र हा साधुत्वाचा उच्चांक. निसर्गरम्य परिसर हे शुद्ध आध्यात्मिक वातावरण भूगोल व पर्यावरण यांच्या प्रेमाचे द्योतक. शेवटी महत्त्वाची भर म्हणजे चार कुत्रे, चार वेदांचे प्रतीक ठरविण्याचे धाडस. मुळात अवधूतांचे कुत्रे शिकार व गोरक्षण यासाठी होते. ज्या घरात कुत्रा आहे तेथे देवदूत प्रवेश करीत नाही, असे शेख बुऱ्हाणोद्दीन गरीब हा सूफी सांगत असे. त्याला हा शह. गुरुकृपा, सिद्धी, चमत्कार उपलब्ध करून देऊन दत्त संप्रदायाने सुफींच्या शिडातली हवा काढून घेतली. सत्ता व संपत्ती यांची साथ नसताना श्रद्धेला प्रतिश्रद्धेने, दुराचाराला सदाचाराने, हिंसेला अहिंसेने दिलेल्या या धार्मिक लढ्यास तोड नाही.” असे डॉ यशवंत रायकर यांनी लिहिले आहे.
आज दत्तजयंतीच्या पोस्ट्स पाहिल्या आणि हे सारे लिहावेसे वाटले…
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
ज्ञानोबा माऊली… तुकाराम

महेश म्हात्रे
संपादक
महाराष्ट्र रिसर्च सेंटर

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *