वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी अधिकृतरित्या सुरू झाली असून साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीने २००९ ते २०२५ या १७ वर्षांतील सर्व आर्थिक ताळेबंद, लेखा अहवाल आणि अनुदान विनियोगाशी संबंधित कागदपत्रे संस्थेकडून मागवली आहेत.
राज्य सरकारकडून संस्थेला मिळालेल्या अनुदानाचा खर्च योग्य पद्धतीने झाला आहे का, आणि आर्थिक व्यवहारात काही अनियमितता आहे का, याची सविस्तर तपासणी केली जाणार आहे. पुढील ६० दिवसांत ही समिती राज्य सरकारकडे अंतिम अहवाल सादर करणार आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार असल्यामुळे या चौकशीला राजकीय कलाटणी मिळाली आहे. अलीकडेच मुख्यमंत्री मदत निधीवरील कर आकारणीच्या निर्णयावर पवार यांनी सरकारला प्रश्न विचारले होते. त्यानंतर लगेचच चौकशी प्रक्रिया सुरू झाल्याने विरोधकांनी सरकारवर ‘राजकीय सूड’ घेण्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, सरकारची भूमिका मात्र भिन्न आहे. सार्वजनिक निधीचा योग्य विनियोग झाला आहे का हे तपासणे ही नियमित आणि आवश्यक प्रक्रिया असल्याचा सरकारचा पुनरुच्चार आहे. अनियमितता आढळल्यास आवश्यक ती कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही राज्यातील साखर उद्योगात महत्त्वाची भूमिका बजावणारी संशोधनसंस्था आहे. त्यामुळे चौकशीच्या निष्कर्षांकडे उद्योगात तसेच राजकीय वर्तुळात मोठ्या उत्सुकतेने पाहिले जात आहे.
—


Leave a Reply