प्रकाश बाळ जोशी यांना आंतरराष्ट्रीय फाईन आर्ट्स फेस्टिव्हलमध्ये गेस्ट ऑफ ऑनर म्हणून निमंत्रण

मुंबई : मुंबईतील प्रख्यात चित्रकार, लेखक आणि पत्रकार प्रकाश बाळ जोशी यांना यंदाच्या आंतरराष्ट्रीय फाईन आर्ट्स फेस्टिव्हलमध्ये गेस्ट ऑफ ऑनर म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. मोरोक्को येथे ९ ते १२ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या या प्रतिष्ठित कला महोत्सवाच्या सातव्या आवृत्तीत जगभरातील नामांकित कलाकार सहभागी होणार आहेत. कला, संस्कृती आणि नवकल्पनांचा विविधतेने भरलेला हा आंतरराष्ट्रीय सोहळा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

या वर्षीच्या फेस्टिव्हलची थीम ‘कचऱ्यातून जन्मलेल्या कलाकृतींना नवे कथानक आणि अमरत्व देणे’ अशी ठेवण्यात आली आहे. पर्यावरणाबद्दल वाढत्या जागरुकतेच्या पार्श्वभूमीवर अपसायकल्ड आर्ट या संकल्पनेला जागतिक पातळीवर मोठे महत्त्व मिळत आहे. कचऱ्यातून नवी कलाकृती घडवून समाजाला पर्यावरणपूरक संदेश देण्याची ताकद कलाकारांमध्ये आहे, हे या थीमनिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित होणार आहे.

प्रकाश बाळ जोशी यांची कला, साहित्य आणि पर्यावरणविषयक संवेदनशील दृष्टी या फेस्टिव्हलच्या प्रमुख हेतूंशी उत्तम प्रकारे सुसंगत असल्याने त्यांना विशेष आमंत्रण देण्यात आल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे. जागतिक स्तरावर कला क्षेत्रातील त्यांचा अभ्यास, त्यांची स्वतंत्र रंगदृष्टी आणि भारतातील समकालीन कलाचळवळींवरील त्यांचे विचार या महोत्सवात सहभागी कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरणार आहेत.

मोरोक्कोमधील या चार दिवसीय कला महोत्सवात कार्यशाळा, चर्चासत्रे, कला प्रदर्शने आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांची परस्पर संवाद सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. भारतातील सुप्रसिद्ध कलाकार म्हणून प्रकाश जोशी यांची उपस्थिती या सोहळ्याची शोभा वाढवणार असून भारतीय कलाक्षेत्रासाठी हे आणखी एक अभिमानाचे पाऊल मानले जात आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *