राज्यातील धडाडीचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या विरोधात भाजप आमदार कृष्णा खोपडे हिवाळी अधिवेशनात निलंबनाची मागणी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत असताना मुंढे यांनी शासनाकडून कोणतीही अधिकृत नियुक्ती नसताना स्मार्ट सिटी प्रकल्पाचा प्रभार स्वतःकडे घेतल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार खोपडे यांनी केला आहे. नियमबाह्य पद्धतीने हा प्रभार घेतल्यामुळे प्रशासनिक अनुशासनाचा भंग झाल्याचे त्यांचे मत आहे.
यानंतर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना मुंढे यांनी काही निवडक कंत्राटदारांना कोट्यवधी रुपयांची पेमेंट मंजूर केल्याच्या तक्रारी पुढे आल्या होत्या. तसेच काही महिला अधिकाऱ्यांना दमदाटी केल्याचेही आरोप नोंदवले गेले. या दोन्ही प्रकरणांबाबत तेव्हा पोलिसांत एफआयआर दाखल झाले होते. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात कारवाई न झाल्याचा आरोप आता भाजप करत आहे. या पार्श्वभूमीवर कृष्णा खोपडे हे दोन्ही प्रकरणे पुन्हा अधिवेशनात मांडून मुंढे यांच्या निलंबनाची मागणी करणार आहेत.
तुकाराम मुंढे हे नियम आणि स्वच्छ प्रशासनासाठी ओळखले जातात. त्यामुळे राजकीय नेतृत्वाशी त्यांच्या अनेकदा ठिणग्या उडतात. गेल्या २० वर्षांत त्यांची तब्बल २४ वेळा बदली झाली असून, ऑगस्ट २०२५ मध्ये त्यांची पुन्हा बदली करून त्यांची दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. दरम्यान, आजपासून सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहांचे कामकाज प्रथमच विरोधी पक्षनेते नसताना पार पडत आहे. पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या, शासकीय कामकाज आणि शोकप्रस्ताव होणार असून, स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुरवणी मागण्यांमध्ये काही नवीन घोषणा होतात का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.


Leave a Reply