महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू

महाराष्ट्र विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन आज नागपुरात सुरू होत असून यंदाचे अधिवेशन अनेक कारणांनी विशेष ठरणार आहे. प्रथमच दोन्ही सभागृहांचे कामकाज विरोधी पक्षनेत्यांशिवाय पार पडणार आहे. विधिमंडळाच्या कामकाज पत्रिकेत विरोधी पक्षनेता निवडीचा कोणताही उल्लेख नसल्याने विरोधकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून सतेज पाटील यांचे, तर विधानसभेसाठी शिवसेना (ठाकरे गट) कडून भास्कर जाधव यांचे नाव सुचवण्यात आले असले तरी निर्णय प्रलंबितच आहे.

सात दिवस चालणाऱ्या या अधिवेशनाकडून शेतकरी, विदर्भातील जनता आणि विविध क्षेत्रांतील नागरिकांना मोठ्या अपेक्षा आहेत. पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या मांडल्या जाणार असून त्यानंतर शासकीय कामकाज पार पडेल. त्यानंतर शोकप्रस्ताव मांडून कामकाज स्थगित केले जाईल. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असल्याने पुरवणी मागण्यांमध्ये नवीन घोषणा होतील का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या सरकारच्या चहापान कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर राहिले. या कार्यक्रमावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बहिष्कार टाकला. विरोधी पक्षनेतेपद रिक्त ठेवण्याच्या निर्णयावरून विजय वडेट्टीवार आणि भास्कर जाधव यांनी सरकारवर कडाडून टीका केली. हा संविधानाचा अपमान असून सरकारला विरोधकांचा आवाज दाबायचा आहे, असा आरोप त्यांनी केला. हिवाळी अधिवेशनात महत्त्वाचे निर्णय, शेतकरी प्रश्न, विदर्भातील दीर्घकालीन मागण्या आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य राजकारणात काय घडामोडी होतील, याकडे आता लक्ष लागले आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *