ज्येष्ठ समाजसेवक आणि समाजवादी नेता डॉ. बाबा आढाव यांचे ८ डिसेंबर रोजी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. परिवर्तनाच्या चळवळीला जीवन समर्पित करणाऱ्या या ९५ वर्षीय नेत्यांवर आज (९ डिसेंबर) सायंकाळी ५.३० वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यापूर्वी त्यांचे पार्थिव गुलटेकडी मार्केट यार्ड येथील हमाल भवन येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
डॉ. आढाव यांनी स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, आणीबाणीविरोधी चळवळ, ‘एक गाव एक पाणवठा’, मनू पुतळा हटाव मोहीम अशा अनेक सामाजिक संघर्षांचे नेतृत्व केले. असंघटित कामगारांच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी काढलेला पुणे–दिल्ली सायकल मोर्चा विशेष गाजला. वैद्यकीय क्षेत्रात चमकदार कारकीर्द सुरू करूनही त्यांनी पूर्णवेळ सामाजिक कार्याचा ध्यास घेतला. हडपसर व नाना पेठ भागात दवाखाना चालवत असताना हमालांच्या समस्या समजून घेत त्यांनी जवळपास सत्तर वर्षांपूर्वी ‘हमाल पंचायत’ची स्थापना केली. कष्टाची भाकर, हमाल नगर, हमाल भवन, हमाल पतसंस्था आणि कष्टकरी विद्यालय यांसारखे उपक्रम उभे करून त्यांनी कष्टकऱ्यांच्या पुनर्वसनाचे आदर्श मॉडेल तयार केले.
त्यांच्या निधनानंतर सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने अंत्यदर्शनासाठी येण्याची शक्यता असल्याने पुणे शहर वाहतूक पोलिसांनी विशेष सूचना दिल्या आहेत. मार्केट यार्ड परिसरात वाहनांची मोठी गर्दी होऊ शकते, त्यामुळे शक्यतो शिवनेरी रस्ता आणि मार्केट यार्ड रस्ता टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पर्यायी मार्ग :
1. गंगाधाम चौक – नेहरू रोड – ७ लव्ह चौक मार्गे आवश्यक स्थळी
2. गंगाधाम चौक – चंद्रलोक चौक – सातारा रोड मार्गे प्रवास
पोलिसांनी वाहतूक अनुशासनाचे पालन करण्याचे तसेच अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे.


Leave a Reply