राज्यातील मोठ्या भागात पारा झपाट्याने घसरत असून विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र याठिकाणी थंडीची लाट अधिक तीव्र झाली आहे. भारतीय हवामान विभागाच्या ताज्या माहितीनुसार पुढील दोन ते तीन दिवस थंडीचा जोर कायम राहणार असून किमान तापमान आणखी २ ते ३ अंशांनी घसरण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर तापमानात पुन्हा २ ते ३ अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे.
पुण्यात यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. शहरातील शिवाजीनगरात पारा ८.९ अंशांवर आला असून पाषाणमध्ये तो ८.४ अंशांपर्यंत घसरला. काही भागात तापमान ७.९ अंशांवर स्थिर राहिल्याने पुण्यात थंडीची तीव्रता वाढलेली दिसत आहे. नाशिक आणि निफाडमध्येही जबरदस्त थंडी पडत असून निफाड येथे तापमान ६.१ अंश सेल्सिअस तर नाशिकमध्ये ८.२ अंश नोंदले गेले. उत्तर महाराष्ट्रासाठी हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
विदर्भात नागपूरमध्ये आज मोसमातील दुसऱ्या निचांकी तापमानाची नोंद झाली असून पारा ८.१ अंशांवर स्थिर होता. गोंदियात ८.४ अंश, भंडाऱ्यात १२ अंश तर बुलढाण्यात १२.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. परभणीमध्ये थंडीचा जोर अधिक असून तापमान केवळ ५.५ अंशांवर आले आहे.
कोकणातील मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोलीतही तापमान ७ अंशांवर घसरले आहे. चिपळूण, गुहागर आणि खेड परिसरातही नागरिकांना गारठ्याचा सामना करावा लागत असून अनेक ठिकाणी शेकोटीचा आधार घेण्याचे प्रमाण वाढले आहे. अहिल्यानगरमध्ये तापमान ७.५ अंशांपर्यंत खाली आले आहे.
राज्यातील प्रमुख शहरांचे तापमान — रत्नागिरी १७.६, संभाजीनगर १०.८, कोल्हापूर १४.४, सोलापूर १३.२, बारामती ७.५, महाबळेश्वर ११.१, मुंबई कुलाबा २०.९, सातारा १०, सांगली १२.३, नांदेड ८.८, उदगीर ११, धाराशिव १०.२ आणि जेऊर येथे सर्वात कमी ५.५ अंश सेल्सिअस नोंदले गेले. राज्यातील बहुतेक भागात पुढील काही दिवस थंडीची तीव्रता कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा इशारा आहे.


Leave a Reply