काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे आज वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. लातूरच्या राजकारणातील एक प्रभावी व केंद्रस्थानी असलेले नेते म्हणून त्यांची ओळख होती. स्थानिक ते केंद्र अशा व्यापक पातळीवर त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळत भारतीय राजकारणावर मोठी छाप उमटवली.
चाकूरकर दिल्लीहून आपल्या परिवारातील विवाह सोहळ्यासाठी काही दिवसांपूर्वी लातूरला आले होते. मात्र अचानक अशक्तपणा जाणवल्याने त्यांची प्रकृती खालावली. त्यांच्यावर त्यांच्या देवघर येथील निवासस्थानीच फॅमिली डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. डॉक्टरांची टीम सातत्याने उपस्थित असूनही ५ डिसेंबरपासून त्यांची तब्येत आणखी बिघडू लागली. त्यांनी अन्नपाण्यालाही नकार देण्यास सुरुवात केली होती. प्रकृती चिंताजनक स्थितीत गेल्यानंतर एअर ॲम्ब्युलन्सद्वारे दिल्लीला हलवण्याची तयारी करण्यात आली होती. मात्र, अशा अवस्थेत हलवणे धोकादायक ठरेल असा सल्ला स्थानिक डॉक्टरांनी दिल्याने तो निर्णय स्थगित ठेवण्यात आला. अखेर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
शिवराज पाटील चाकूरकर यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९३५ रोजी झाला. लातूरचे नगराध्यक्ष म्हणून १९६६ ते १९७० या काळात त्यांनी काम पाहिले. त्यानंतर १९७२ ते १९८० या काळात ते आमदार म्हणून निवडून आले. विधानसभा उपाध्यक्ष (१९७७-७८) आणि नंतर विधानसभा अध्यक्ष (१९७८-७९) म्हणून त्यांच्या कार्यकाळाने राज्य राजकारणात महत्त्वपूर्ण ठसा उमटवला.
१९८० ते २००४ या सलग कालावधीत ते लातूरचे लोकसभा सदस्य राहिले. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री (१९८०-८२), वाणिज्य मंत्री (१९८२-८३) आणि विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री (१९८३-८४) म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण धोरणात्मक कार्य केले. केंद्रातही त्यांनी अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या. लोकसभा उपसभापती (१९९०-९१) आणि नंतर सभापती (१९९१-९६) म्हणून त्यांनी संसद संचालनात मोलाची भूमिका बजावली.
२००४ मध्ये ते देशाचे गृहमंत्री झाले आणि ३० नोव्हेंबर २००८ पर्यंत त्यांनी ही जबाबदारी सांभाळली. नंतर ते राज्यसभा सदस्य आणि पंजाबचे राज्यपाल (२०१०-२०१५) म्हणून कार्यरत होते.
त्यांच्या निधनाने राज्य आणि राष्ट्रीय राजकारणातील एक अनुभवी, शिस्तप्रिय आणि अभ्यासू नेता हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. उद्या सकाळी ११ वाजता बोरवटी येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार होणार आहेत.


Leave a Reply