गेली ६६ वर्षं भारतीय राजकारणात सतत कार्यरत असणाऱ्या, राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या
मा.शरद पवार यांचा आज ८५ वा वाढदिवस. असंख्य उन्हाळे – पावसाळे अंगावर झेलणार्या या “वृध्देश्वरास” वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
सलग अर्धशतकाहून अधिक काळ राजकारणाच्या केंद्रभागी राहणं, ते वेगवान सत्ताकारण स्वतः भोवती फिरवत ठेवणं ही अशक्यप्राय गोष्ट. पण शरद पवार यांनी ती अशक्य बाब एका जन्मात शक्य करून दाखवली आहे, अचूक दूरदृष्टी, अखंड मेहनत, व्यापक जनसंपर्क आणि लोकाभिमुख ध्येयधोरणांच्या बळावर .
आजही या वयात पवार सदैव सक्रीय असतात. सर्व प्रकारच्या, घरातील, घराबाहेरील विरोधकांचा सामना करत ते पहाटेपासून कामाला लागतात. प्रकृतीची विचारपूस करणं त्यांना आवडत नाही. थव्याने अंगावर आलेल्या आजारांनी देखील त्यांच्या या कार्यमग्न वृत्तीवर जीव लावला असावा. म्हणूनच कदाचित एरवी जीवघेण्या वाटणाऱ्या आजारांचा अजिबात इश्यू न करता पवार, स्वतःसोबत सगळ्यांना कामाला लावताना दिसतात.
एक तरूण विद्यार्थी म्हणून त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ पाहिली. आणीबाणी दरम्यान त्यांनी इंदिरा गांधी आणि त्यांचे एकछत्री नेतृत्व पाहिले, अनुभवले. आणीबाणीनंतरच्या काळात तेच सर्वसाक्षी ‘ इंदिरा छत्र’ तोडून पवारांनी वयाच्या अडतिसाव्या वर्षी काँग्रेस विरोधात बंड पुकारले. लोकनेते वसंत दादा पाटील यांच्या “पाठीत खंजीर खुपसून” (हा खुद्द दादांनी प्रचलित केलेला शब्द) “पुलोद”चा राजकीय प्रयोग केला… आणि सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले. “गाॅडफादर” यशवंतराव चव्हाण यांच्या पावलावर पाऊल ठेवून समाजातील उच्चवर्णीय, अभिजनांना अपील करणारी भूमिका कायम जपली. समाजवादी, कम्युनिस्ट अगदी संघ परिवारातील नेत्यांशीही सलगी राखण्याचा… सर्व सामाजिक, शैक्षणिक, वैचारिक, आर्थिक, वा सहकारी क्षेत्रात आपली माणसे वाढवण्याचा हा अफलातून “पवार पॅटर्न”, राज्यात कुणा नेत्याला जमलेला दिसत नाही.
मला ठाऊक आहे, कुणाला कदाचित हे विधान अतिशयोक्तीपूर्ण वाटेल. की हा सर्वत्र माणसं पेरण्याचा, जोपासण्याचा, मोठी करण्याचा, त्यांना महत्त्व देण्याचा “पवार पॅटर्न” मला कृष्णाच्या गोवर्धन पर्वत उचलण्याच्या कृतीसारखा वाटतो… पौराणिक कथा सांगतात की,भगवान श्रीकृष्ण एकटा गोवर्धन उचलण्यास समर्थ होता. पण तरीदेखील त्याने गोपाळांस त्यांच्या काठ्यांचा आधार देण्यास सांगितले… चांगल्या गोपाळांना महत्त्व देणे आणि “काडीबाज” लोकांनाही कामात व्यस्त ठेवणे, हाही त्याचा उद्देश असेल.
पटत नसेल तरी, तुम्हीच विचार करून पहा. ‘पवारनिती” ही जर अशी परिणामकारक नसती, तर देशातील सगळ्याच महत्त्वपूर्ण टप्प्यांवर त्यांना मोठ्या भूमिका मिळाल्याच नसत्या. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीने निर्माण केलेले वादळ असो, राम मंदिराचा तिढा असो, डंकेल प्रस्तावाचे पडसाद असो वा खाजगीकरण- जागतिकीकरणाचे परिणाम, नैसर्गिक आपत्ती असो वा आपत्कालीन परिस्थिती , देशातील नेतृत्वाने शरद पवार यांचा सल्ला घेतला नाही, असे कधीच झाले नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सुध्दा “शरदराव मेरे गुरू है”, असे उगाचच बोलत असतात का ?
अडाणी – अंबानी प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर पवारांना का भेटतात?
असे माध्यमातून चर्चेत येणारे प्रश्न स्वतःलाच विचारा. मग आपल्याला पवार यांच्या राजकीय अस्तित्वाच्या ‘अमरत्वा’ मागील कारण कळेल. त्यांची कार्यपद्धती एखाद्या ‘जिम्नॅस्ट’ सारखी लवचिक आहे, म्हणूनच ते उध्दव ठाकरेंसाठी सोनिया गांधी यांचा पाठिंबा मिळवून देतात.
एका महाप्रचंड ‘स्पंज’ प्रमाणे पवार नवनवीन ज्ञान-तंत्रज्ञान शोषून घेतात. आणि भाषणात, संभाषणात हळूच ते ज्ञान शिंपडून तज्ज्ञांना चकीत करतात. अर्थात आपला चेहरा कोरा ठेवून.
क्रिकेट सारखा खेळ असो वा सिनेमा नाटकासारखे मनोरंजन क्षेत्र, पवार “यत्र तत्र सर्वत्र” दिसतात, कारण ते पवार असतात.
सार्वजनिक जीवनात पवारांएवढी टीका- टिंगल सहन करणारा आणि परत , परत उभा राहणारा, त्यांच्याशिवाय दुसरा माणूस मला महाराष्ट्रात दिसत नाही. ते घरातील बंड पचवू शकतात, मग पक्षातील फंदफितूरीने ते कसे अस्वस्थ होतील … कडवट अपमान गिळणे, वर चेहरा नाॅर्मल ठेवणे, ही सुध्दा एक कला आहे. ‘सकळ कलावंत’ पवार त्यातही तरबेज दिसतात. हल्ली सोशल मीडियावर तर त्यांच्या नातवंडा एवढी पोरं “बारा, बारामती” च्या ठराविक पोस्ट टाकत असतात. पुण्या- नागपुरातील काही सुसंस्कृत अभिजन तर बेफामपणे त्यांच्या मरणाची चर्चा करतात. ते पाहून नेहमी वाटतं, त्या सगळ्या अवमानकारक टीका-टिंगलीकडे खिलाडू वृत्तीने पाहणं किती अवघड काम असेल. पण हलाहल पिणाऱ्या शंकरासारखे पवार ते करतात. नाही म्हणायचं तरी, गेल्या आठ- दहा वर्षात ते पत्रकारांशी बोलताना चिडचिड करताना दिसतात. तो वयाचा परिणाम असू शकतो. पण इतर वेळी मात्र ते नेहमीच सजग आणि सतर्क असतात. आपल्या ठेवणीतील शब्दांनी राज्ययंत्र गरगरा फिरवत, फिरतात… मी बत्तीस वर्षाच्या पत्रकारितेत पवारांना विविध भूमिकेत पाहिलेय… सोबत दौरे केलेत, मुलाखती घेतल्यात. त्यांच्यासमवेत काम करणाऱ्या अनेक लोकांकडून “पवार फॅक्टर ” समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या बरोबर तिस- चाळीस वर्षांपासून काम करणाऱ्या अनेकांचे पवारांबद्दल एका विषयावर एक मत झाले, ते म्हणजे, “पवारांचा थांग लागत नाही”. ते कधी कोणती भूमिका घेतील, काय बोलतील अन काय करतील याचा अंदाज येत नाही. त्यांचे अवघे व्यक्तिमत्त्व अथांग आहे, आकलना पलिकडचे आहे.
पुराणातील एक कथा आईच्या तोंडून ऐकली होती. एकदा ब्रम्हा, विष्णु आणि महेश या तिन्ही देवांमध्ये आपल्या ताकदी संदर्भात गप्पा सुरू होत्या. ब्रम्हा आणि विष्णु जरा जास्तच जोषात होते. भगवान भोलेनाथ गप्प होते. आपलं सामर्थ्य दाखविण्यास काय करावे, यावर ब्रम्हा, विष्णु तावातावात बोलत होते. इकडे त्या स्पर्धेत नसलेले महादेव हळूच समाधीत निमग्न झाले. ते पाहून ब्रम्ह देव म्हणाले, बघा भोलेनाथ समाधीत गुंग झालेत. त्याचा फायदा घेऊन आपण दोघे या शिवतत्वाचे आदी-अंत, वरचे आणि खालचे टोक शोधून काढू… आणि त्या क्षणापासून आजवर ब्रम्हा, विष्णु शिवतत्व नेमके काय आहे, याचा शोध घेत बसलेत. आपले सामर्थ्य दाखविण्याच्या नादात ते लोकांपासून दूर गेले. त्यामुळेच त्या दोघांची पृथ्वीवर फारशी मंदिरे नाहीत. ज्याच्या सामर्थ्याचा थांग लागत नाही , तो वृध्देश्वर शंकर मात्र गावोगावी पुजला जातो… कारण तो लोकांच्यात राहणारा, लोकांसारखं जगणारा, लोकांसाठी लढणारा लोकांचा देव, लोकनाथ आहे…
शरद पवार यांच्या विषयी लिहता, लिहता ही पुराण कथा आठवली, कुणाला ती समर्पक वाटली तर तो निव्वळ योगायोग समजावा.
पुन्हा एकदा हार्दिक शुभचिंतन !
जीवेत शरद: शतम !!!
महेश म्हात्रे
संपादक- संचालक
महाराष्ट्र रिसर्च सेंटर


Leave a Reply