राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने मुंबईसह राज्यातील एकूण २९ महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. मुदत संपलेल्या २७ महापालिका आणि नव्याने निर्माण झालेल्या इचलकरंजी व जालना या २ महापालिकांसह एकूण २९ महापालिकांमधील २,८६९ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. याबाबतची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होईल. मुंबई महापालिकेत वॉर्ड रचना असल्याने मतदारांना एकच मत द्यावे लागेल, तर इतर महापालिकांमध्ये प्रभाग पद्धत असल्याने तीन ते पाच मते द्यावी लागणार आहेत.
राज्यातील या निवडणुकांसाठी एकूण ३.४८ कोटी मतदार असून ३९,१४७ मतदान केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. मुंबईतच १०,१११ मतदान केंद्रे असतील. निवडणूक प्रक्रियेसाठी ११,३४९ कंट्रोल युनिट आणि २२,००० बॅलेट युनिट्स वापरण्यात येणार आहेत. १ जुलै २०२५ ची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार असून ती भारत निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाल्यामुळे त्यामध्ये बदल करण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाला नाही.
मुंबईत सुमारे ११ लाख संभाव्य दुबार मतदार आढळून आले असून ते एकूण मतदार यादीच्या सुमारे ७ टक्के आहेत. दुबार मतदारांची ओळख करून त्यांच्या नावासमोर दोन स्टार चिन्ह देण्यात आले आहे. ज्यांचा सर्वेक्षण पूर्ण झालेला नाही, त्यांच्याकडून मतदान केंद्रावर हमीपत्र घेतले जाईल.
निवडणुकांसाठी मुंबईत २९० तर संपूर्ण राज्यात ८७० निवडणूक अधिकारी आणि जवळपास १,९६,६०५ कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. मतदानाच्या ४८ तास आधी प्रचारावर निर्बंध येणार असून जाहिरातींवर बंदी राहील. या निवडणुकांमध्ये महिलांसाठी १,४४२, अनुसूचित जातींसाठी ३४१, अनुसूचित जमातींसाठी ७७ आणि इतर मागास प्रवर्गासाठी ७५९ जागा राखीव आहेत. काही महापालिकांमध्ये आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा अधिक असले तरी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणुका घेण्यात येणार आहेत.
महापालिका निवडणुकांचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे —
नामनिर्देशन पत्र स्वीकारणे: २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर
अर्जांची छाननी: ३१ डिसेंबर
उमेदवारी माघार: २ जानेवारी
अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप: ३ जानेवारी
मतदान: १५ जानेवारी
निकाल: १६ जानेवारी
या घोषणेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून अवघ्या २९ दिवसांच्या प्रचारकालावधीत सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू होणार आहे.


Leave a Reply