मनातले ओठांवर आले… जयंतराव तोंडघशी पडले !

गावगाड्यातील बारा बलुतेदार म्हणजे आपले गुलाम, त्यांना काहीही बोलले तरी चालते. अशी मानसिकता आजही कायम आहे. हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी दाखवून दिले आहे… त्या जातीयवादी वृत्तीची बिन पाण्याने करणारा, महेश म्हात्रे यांचा परखड लेख…

मनातले ओठांवर आले… जयंतराव तोंडघशी पडले !

हिवाळी अधिवेशनात विधानसभेत पोलिसांच्या निष्क्रियतेवर प्रश्न उपस्थित करताना ‘पोलीस काय हजामत करतात का?’ या शब्दप्रयोगावरून निर्माण झालेल्या वादळानंतर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज तातडीने दिलगिरी व्यक्त केली. हजामत हा शब्द बोलण्याच्या ओघात माझ्याकडून गेला. माझी चूक झाली असून, मी संपूर्ण नाभिक समाजाची जाहीर माफी मागतो,” अशा शब्दांत पाटील यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, त्यांच्या या नाभिक समाजाची हेटाळणी करणार्‍या विधानाचा निषेध करण्याची लाट उसळली आहे. अनेक ठिकाणी आंदोलनं सुरू झाली आहेत.
विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना, जयंत पाटलांनी गृहखात्यावर जोरदार टीका केली होती. बीड जिल्ह्यातील राम खाडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भाने सभागृहात आक्रमकपणे बोलताना, “पोलीस काय हजामत करतात का?” असा शब्दप्रयोग जयंत पाटील यांनी केला. त्यावरुन, सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी “हजामत” शब्दाला आक्षेप घेतल्याने खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. आता, जयंत पाटील यांनी हजामत शब्दावरुन नाभिक समाजाची माफी मागितली आहे. “बोलण्याच्या ओघात मी बोलून गेलो. मी संपूर्ण नाभिक समाजाची दिलगिरी व्यक्त करतो, अशी चूक व्हायला नको होती, ती झाली. त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो,” असे जयंत पाटील पत्रकार परिषदेत म्हटले…
मला स्वतःला मात्र जयंतराव यांची काही चूक झाली आहे असे अजिबात वाटत नाही. ग्रामीण महाराष्ट्रात, गावगाड्यामध्ये पारंपरिक सत्ताधारी पाटलांच्या, मस्तवाल पोरांना, इतर जातींविषयी जे वाटतं. तेच या वाक्यात आहे. फक्त मोठ्या पदांवर बसल्यामुळे, सार्वजनिक ठिकाणी, असे बोलायचे नाही. ही घरातील वडीलधार्‍या माणसांनी दिलेली शिकवण विसरले. मनातले ओठांवर आले, म्हणुन जयंतराव तोंडघशी पडले !

जयंतरावाच्या या बोलण्यामुळे मला नव्वदच्या दशकातील विधानसभा सभागृहातील “अशांत टापू” आठवला. हा अशांत टापू, म्हणजे, सत्तारूढ कॉंग्रेस पक्षाच्या ‘खानदानी’ नेत्यांच्या पुढच्या पिढीचा गट होता. यात बार्शीचे दिलीप सोपल, तासगावचे आर आर पाटील, दौंडचे सुभाष अण्णा कूल हे हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच आमदार सर्वसामान्य घरातून आलेले होते. उर्वरित अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील आदी मंडळी तालेवार राजकीय घराण्यामधून आमदार झालेले होते. कॉलेजमध्ये जसे पाठीमागच्या बाकांवर बसलेली मुले, मागून ‘कमेन्ट’ करत राहतात. अगदी तसाच ‘पोरखेळ’ या मंडळींचा चालू राही. फारतर शरद पवार सभागृहात असले तर हा “टापू” शांत राहत असे. इतर वेळी ते कुणालाही जुमानत नसत…
अशाच एका चर्चेच्या वेळी, पाच वेळा आमदार राहिलेले, विधानसभा अध्यक्षपद भूषविलेले शंकरराव जगताप बोलायला उभे होते. त्यावेळेस, दिलीप सोपल किंवा अन्य कोणी तरी त्यांची खोड काढली. त्यामुळे ज्येष्ठ सदस्य शंकरराव जगताप भडकले.
पत्रकार दालनात बसलेल्या आम्हा सगळ्यांना नेमके काय झाले ते कळलेच नाही. जगताप रागावले असताना, विरोधी पक्षातील दत्ता पाटील, केशवराव धोंडगे आदी ज्येष्ठ आमदार त्यांच्या बाजूने उभे राहिले. परिणामी सत्ताधारी पक्ष एकदम बचावात्मक पवित्रा घेऊ लागला. काही वेळाने त्या वादावर पडदा पडला.
पण आम्हाला, सर्व पत्रकारांना कळले नव्हते की, असे काय झाले, ज्यामुळे शंकरराव जगताप चिडले होते. दुसर्‍या दिवशी सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी मी आर आर पाटील यांना गाठले. आणि विचारले, “काल नेमके काय झाले होते, ते मला सांगा”. आपला मिस्कील चेहरा जास्तीतजास्त भोळा करत आबा म्हणाले, ” कोणी काहीच बोलले नव्हते, तरी ते चिडले… पण त्यांचे चिडणे योग्य होते. कारण, शंकरराव जेव्हा बोलायला उभे राहतात, तेव्हा आमच्यातील काही जण बोटाने वस्तरा चालवण्याची ‘अ‍ॅक्टींग’ करतात.
मला या कृती मागील “संदर्भ” ठाऊक नव्हता… त्यामुळे, माझ्या चेहर्‍यावर एक भले मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. ते ओळखून आर आर आबा म्हणाले, ” शंकरराव न्हावी आहेत ना ”
आणि त्यांच्या त्या वाक्यांनी, माझ्या डोळ्यासमोर महाराष्ट्रीय राजकारणातील जातींच्या प्रभावाचे एक भयाण वास्तव उभे केले होते…
मी तडक निघालो आणि शंकरराव जगताप कुठे असतील ते शोधायला लागलो. ते मला भेटले, एका मंत्र्यांच्या दालनात. त्यांना मी चिडायचे कारण विचारले. तसे ते हसत, तिरकसपणे उद्गारले. अहो, पुरोगामी महाराष्ट्रात, साध्या सुध्या नाही, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात हे व्हायचेच… तेव्हढ्यात, अशांत टापू मधील दोन आमदार तिथे आले… मग ती चर्चा आणखीन वाढली. त्यावेळी शंकरराव जगताप यांनी, एक मजेदार किस्सा सांगितला… शंकरराव म्हणाले, “मी विधानसभा अध्यक्ष होतो, त्यावेळची ही घटना आहे. एका राजघराण्यातील नेत्याच्या घरी लग्न होते. त्यामुळे राज्यातील सगळे खानदानी नेते यायची सुरुवात झाली होती. मी थोडा आधी पोहोचलो होतो. विधानसभा अध्यक्ष म्हणुन मला पुढे बसवले होते… पण जसजसे मातब्बर, मान्यवर यायला लागले, तसतशी अस्वस्थता वाढू लागली… मला काही समजत नव्हते. जरी मान्यवर मंडळींची गर्दी झाली होती. तरी माझ्या शेजारच्या खुर्च्या रिकाम्या होत्या… तेव्हढ्यात एक बिगर मराठा माजी मुख्यमंत्री आले, त्यांना माझ्या शेजारी मोठ्या सन्मानाने बसविण्यात आले… ते सहजपणे बोलून गेले, “ही आपली रांग आहे वाटते… सातारा जिल्ह्य़ातील “खानदानी” घराण्यांची रग आणि मानसिकता अनुभवलेला
मी, फक्त कसनुसं हसलो…” हे सांगताना शंकरराव जगताप यांचा चेहरा गंभीर झाला होता…
माझ्या डोळ्यासमोर शाहीर राम नगरकर यांच्या आत्मकथनातील पाहिल्या पानावरील, अगदी सुरुवातीचा प्रसंग येत होता… आज, तीन दशके उलटून गेली तरी, आपल्या समाज व्यवस्थेतील, गाव गाड्यातील जात वास्तव तसेच ‘शाबूत’ आहे, हे शरद पवार यांच्या पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी दाखवून दिले आहे… तरीही, त्यांना, त्यांच्या साहेबांना, महाराष्ट्राला पुरोगामी म्हणण्याचा… फुले, आंबेडकर आणि शाहू महाराज यांचे नाव घेण्याचा अधिकार आहे.
भाजप सत्तेवर आल्यानंतर राजघराण्यातील व्यक्ती खासदार होताच, पवार उघडपणे म्हणु शकतात, “पूर्वी छत्रपती पेशव्यांची नेमणूक करत, आता हे पेशवे, छत्रपतींना नेमतात” कारण, गावगाड्यामधील कोणत्याही जातीला हिणवायचे, वापरायचे, तुडवायचे ‘लायसन्स’ घेऊनच पाटलांची पोरं जन्माला येतात…
त्यांचा नाद करायचा नाय…
कारण, त्यांना सर्व गुन्हे माफ… जयंत पाटील यांच्या सारखी भाषा जर भाजप किंवा सेनेच्या प्रदेश अध्यक्षांनी केली असती, तर एव्हाना शरद पवार यांनी, नाभिक समाजाला उकसवणारे स्टेटमेंट काढून, पुरोगामी महाराष्ट्राची, संत सेना महाराजांची आठवण करून दिली असती… पण, तोंड आपल्या जयंतराव यांनीच वाजवून घेतलं असल्याने… पवार साहेब गप्प आहेत…
याक्षणी, माझ्या कानात मात्र संत सेना महाराज यांचा प्रसिद्ध अभंग घुमतोय…
आम्ही वारीक वारीक।
करूं हजामत बारीक ॥ १॥
विवेक दर्पण आयना दाऊं।
वैराग्य चिमटा हालऊं ॥२॥

येत्या महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत, एकट्या नाभिक समाजाने ठरवले तरी, आधीच उजाड झालेल्या पवारांच्या पक्षाची बिन पाण्याने होऊन जाईल…

महेश म्हात्रे
संपादक- संचालक
महाराष्ट्र रिसर्च सेंटर

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *