नवी दिल्ली : गोव्यातील अरपोरा येथील ‘बिर्च बाय रोमियो लेन’ नाईटक्लबमध्ये झालेल्या भीषण आगीप्रकरणी फरार झालेले क्लबचे मालक गौरव लुथ्रा आणि सौरभ लुथ्रा यांना मंगळवारी भारतात परत आणण्यात आले. थायलंडमध्ये अटकेनंतर इंडिगोच्या विमानाने दोघांना दिल्लीला आणण्यात आले असून, त्यांना आता स्थानिक न्यायालयात हजर केले जाणार आहे. गोवा पोलिसांकडून त्यांच्या ट्रान्झिट रिमांडची मागणी करण्यात येणार आहे.
६ डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास उत्तर गोव्यातील अरपोरा भागातील या नाईटक्लबमध्ये भीषण आग लागली होती. डान्सदरम्यान वापरण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक फटाक्यांमुळे छताला आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. क्लबच्या बांधकामात बांबूसारख्या ज्वलनशील साहित्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आल्याने आग वेगाने पसरली.
या दुर्घटनेत २५ जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये २० कर्मचारी आणि पाच पर्यटकांचा समावेश आहे. प्रत्यक्षदर्शींनुसार, घटनेच्या वेळी नाईटक्लबमध्ये सुमारे १०० हून अधिक लोक उपस्थित होते. आगीपासून बचाव करण्यासाठी काही जण खालील मजल्यावरील स्वयंपाकघराकडे पळाले, मात्र तेथेच ते अडकून पडले.
दुर्घटनेनंतर काही तासांतच लुथ्रा बंधूंनी देश सोडून थायलंडच्या फुकेट येथे पलायन केले होते. त्यानंतर इंटरपोलची ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली. ११ डिसेंबर रोजी फुकेटमधील एका हॉटेलमधून बाहेर पडताना थायलंड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि नंतर बँकॉकला हलवण्यात आले.
गोवा पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात पाच जणांना अटक केली असून, नाईटक्लब सुरक्षितता नियमांचे उल्लंघन करून चालवला जात असल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


Leave a Reply