विम्याच्या पैशांसाठी दुसऱ्याचा जीव; आत्महत्येचा थरारक बनाव उघड

लातूर जिल्ह्यात एक कोटी रुपयांच्या टर्म इन्शुरन्सच्या रकमेसाठी दुसऱ्या व्यक्तीचा निर्घृण खून करून स्वतः मृत असल्याचा बनाव करणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. औसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेचा छडा लावण्यात लातूर पोलिसांना अवघ्या २४ तासांत यश आले असून आरोपी गणेश गोपीनाथ चव्हाण याला अटक करण्यात आली आहे.

दि. १४ डिसेंबर २०२५ रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास डायल ११२ वरून वानवडा पाटी ते वानवडा जाणाऱ्या रस्त्यावर एका कारला आग लागल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे औसा पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आणल्यानंतर कारच्या आत अर्धवट जळालेला मानवी सांगाडा आढळून आला. सुरुवातीला हा अपघात अथवा आत्महत्येचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.

तपासादरम्यान जळालेल्या वाहनाचा क्रमांक एम.एच. ४३ ए.बी. ४२०० असल्याचे निष्पन्न झाले. वाहनाचा वापर गणेश चव्हाण करत असल्याची माहिती पुढे आली. चव्हाण हा आर्थिक अडचणीत असल्याचे तसेच त्याने एक कोटी रुपयांचा टर्म इन्शुरन्स काढलेला असून त्यावर मोठे कर्ज असल्याचे तपासात समोर आले. त्यामुळे मृतदेह हा गणेश चव्हाणचाच असल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आणि नातेवाइकांनीही तशी ओळख पटवली.

मात्र, स्थानिक गुन्हे शाखा व औसा पोलिसांच्या संयुक्त तपासात संशयाची सूई फिरली. तांत्रिक विश्लेषण आणि कॉल डिटेल्सच्या आधारे गणेश चव्हाण जिवंत असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी पाठलाग करून त्याला विजापूर जिल्ह्यातून ताब्यात घेतले. चौकशीत चव्हाणने धक्कादायक कबुली दिली.

आर्थिक संकटातून सुटका मिळवण्यासाठी आणि कुटुंबाला विम्याची रक्कम मिळावी यासाठी त्याने हा कट रचल्याचे त्याने सांगितले. दारूच्या नशेत असलेल्या गोविंद किशन यादव (वय ५०) या व्यक्तीला लिफ्ट देऊन निर्जनस्थळी नेण्यात आले. तेथे त्याचा खून करून त्याचा मृतदेह कारमध्ये ठेवून वाहनाला आग लावण्यात आली, जेणेकरून स्वतः मृत असल्याचा बनाव करता येईल.

घटनेनंतर आरोपीने विविध ठिकाणी प्रवास करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, लातूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि वेगवान तपासामुळे हा थरारक गुन्हा अवघ्या २४ तासांत उघडकीस आला. आरोपीविरुद्ध खून व पुरावे नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *