काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार प्रज्ञा सातव यांचा उद्या 18 डिसेंबर रोजी भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आणि नाराजीमुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. त्यांच्या संभाव्य पक्षप्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसू शकतो, अशी चर्चा राजकीय विश्लेषकांमध्ये आहे.
दरम्यान, काँग्रेसकडून या वृत्तावर सावध प्रतिक्रिया देण्यात आली आहे. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. “काँग्रेसने त्यांना आमदारकी दिली आहे. प्रज्ञाताई असा निर्णय घेतील, असे मला वाटत नाही. ही बातमी निराधार आहे,” असे सतेज पाटील यांनी सांगितले. पक्ष म्हणून आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत आणि त्या काँग्रेस सोडतील असे मला वैयक्तिक वाटत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
स्वर्गीय राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर संधी दिली होती. 2021 साली शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर त्या बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर 2024 मध्ये त्या दुसऱ्यांदा विधान परिषदेवर निवडून आल्या असून 2030 पर्यंत त्यांचा कार्यकाळ आहे. सध्या त्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत.
राजीव सातव हे राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते. 2014 च्या मोदी लाटेतही ते महाराष्ट्रातून निवडून आलेल्या मोजक्या काँग्रेस खासदारांपैकी एक होते. त्यांच्या निधनानंतर हिंगोलीतील काँग्रेसची ताकद काहीशी कमी झाली आहे. अशातच प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेमुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, उद्याच्या घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Leave a Reply