माणिकराव कोकाटे अडचणीत; राजीनाम्याची शक्यता, धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाची चर्चा

सदनिका घोटाळा प्रकरणात माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. मंगळवारी न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवल्यानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या निकालानंतर याचिकाकर्त्या अंजली दिघोळ राठोड यांनी माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यासाठी नाशिक जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोकाटे यांना हायकोर्टाकडून दिलासा मिळाला नाही, तर त्यांचा राजीनामा देणे अटळ ठरण्याची शक्यता आहे. नियमानुसार दोन दिवस अटकेत राहिल्यानंतर मंत्रिपदाचा राजीनामा देणे बंधनकारक ठरते. त्यामुळे आगामी काही दिवस कोकाटे यांच्यासाठी निर्णायक ठरणार आहेत.

दरम्यान, कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट निघाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच महायुतीतील दोन्ही मित्र पक्ष कोकाटे यांच्या राजीनाम्यावर आग्रही असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे राजकीय दबाव अधिक वाढला असून कोकाटे यांच्या अडचणी आणखी तीव्र झाल्या आहेत.

या सगळ्या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा झाल्यास रिक्त होणाऱ्या मंत्रिपदासाठी कोणाची वर्णी लागणार, यावर तर्कवितर्क सुरू झाले आहेत. विशेषतः धनंजय मुंडे यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. निकाल लागल्यानंतर मुंडेंनी थेट दिल्ली गाठल्याची माहिती असून, ते पक्षांतर्गत आणि केंद्रीय पातळीवर फिल्डिंग लावण्यासाठी गेले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पुढील राजकीय हालचाली याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *