‘शोध मराठी मनाचा’चा २१ वा जागतिक मराठी संमेलन सोहळा यंदा गोव्यात

मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा जागतिक स्तरावर गौरव करणारे ‘शोध मराठी मनाचा’ हे २१ वे जागतिक मराठी संमेलन येत्या ९ ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत चंदा गोळ्याच्या पवित्र भूमीत मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या भव्य संमेलनाचे अध्यक्षपद प्रख्यात अणुभौतिक शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकडकर भूषवणार असून, संमेलनाचे उद्घाटन ९ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.

१९८९ साली शरद पवार, मनोहर जोशी, भा. कृ. देसाई आणि माधव गडकरी यांनी रोवलेल्या बीजातून उभा राहिलेला ‘जागतिक मराठी अकादमी’चा हा वैचारिक प्रवास आज २१ व्या संमेलनापर्यंत येऊन पोहोचला आहे. वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेली ही परंपरा आज नव्या पिढीसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे संमेलन मराठी अस्मितेचा जागतिक उत्सव ठरणार आहे.

संमेलनात जगभरातील मराठीप्रेमी, साहित्यिक, विचारवंत, वैज्ञानिक, उद्योजक आणि कलाकार सहभागी होणार आहेत. यावेळी अनिल खंवटे यांना ‘जागतिक मराठी भूषण’, तर महेश मांजरेकर यांना ‘कला जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र व गोवा सरकारमधील मंत्री, सांस्कतिक क्षेत्रातील मान्यवर आणि देश-विदेशातील मराठी प्रतिनिधी
या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात काव्यसंमेलन, कथाकथन, नाट्यप्रयोग चित्रपटविषयक चर्चा, कृत्रिम बुद्धिमत्ता व मराठी भाषा, माध्यमे व समाजमाध्यमे, पर्यटन व सांस्कृतिक बदल, तसेच जागतिक अर्थव्यवस्थेत भारत व मराठी माणूस यांसारख्या विषयांवर सखोल मंथन केले जाणार आहे. समारोपप्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती कार्यकारिणी सदस्य महेश म्हात्रे यांनी दिली.

मराठी अस्मिता, आधुनिकता आणि जागतिक स्तरावरील मराठी माणसाचे स्थान अधोरेखित करणारे हे संमेलन मराठी भाषेच्या वैचारिक प्रवासाला नवी दिशा देणारे ठरणार असल्याचे उदय तानपाठक यांनी सांगितले.

 

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *