काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांची हत्या; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नेता आरोपी

अकोला | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायत पटेल यांची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या झाल्याने अकोला जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी (6 जानेवारी) अकोट तालुक्यातील मोहाळा गावात त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. गंभीर जखमी अवस्थेत त्यांच्यावर अकोल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज (7 जानेवारी) पहाटे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

घटनेच्या दिवशी दुपारी सुमारे दोनच्या सुमारास हिदायत पटेल हे मोहाळा गावातील मशिदीत नमाज अदा करून बाहेर पडत असताना उबेद पटेल या तरुणाने अचानक चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या पोटावर व मानेवर गंभीर वार करण्यात आले. रक्तस्राव होत असलेल्या अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले होते.

या प्रकरणात राजकीय आणि कौटुंबिक वादातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हल्ल्यानंतर आरोपी उबेद पटेल फरार झाला होता. मात्र रात्री अकोट तालुक्यातील पणज गावातील नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, या हल्ला प्रकरणात काही बड्या राजकीय नेत्यांची नावे तक्रारीतून समोर आल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.

अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बुद्रूजम्मा, अकोटचे माजी काँग्रेस नगराध्यक्ष संजय बोडखे, काँग्रेसचे नेते व जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती राजीव बोचे, हल्लेखोर उबेद पटेल आणि आणखी एका व्यक्तीचा समावेश आहे. हिदायत पटेल जिवंत असताना खुनाचा प्रयत्न आणि कट रचल्याचे आरोप ठेवण्यात आले होते. आता त्यांच्या मृत्यूनंतर या गुन्ह्यात खुनाची कलमे वाढवली जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हिदायत पटेल हे अकोला जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचा प्रमुख मुस्लिम चेहरा म्हणून ओळखले जात होते. त्यांनी 2014 आणि 2019 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. सहकार क्षेत्रातही त्यांचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या हत्येने अकोला जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक वातावरण तापले असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *