मालेगाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरण: दुबईला पळण्याच्या तयारीत असलेले दोघे ईडीच्या जाळ्यात

मालेगाव येथील रहिवाशांच्या बँक खाती गैरवापर करून मनी लॉन्डरिंग केल्याच्या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आणखी दोन जणांना अटक केली आहे. मोहसिन अहमद खिलजी आणि शरीफ मिया शेख यांना गुरुवारी अटक करण्यात आली असून, शुक्रवारी त्यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना ८ जानेवारीपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवले आहे.
या प्रकरणात यापूर्वी तीन जणांना अटक करण्यात आली होती. ईडीच्या म्हणण्यानुसार, अटक करण्यात आलेल्या दोघांचा बनावट कंपन्यांशी संबंध असून, ते तपासातून पळ काढण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना अहमदाबाद विमानतळावर अटक करण्यात आली.
ईडीने सांगितले की, आरोपींनी ‘हार्दिक एंटरप्राइज’ आणि ‘हार्स ट्रेडिंग’ या नावाने दोन कंपन्या स्थापन केल्या होत्या. या कंपन्या कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) योजनेच्या नावाखाली तयार करण्यात आल्या होत्या आणि मालेगावमधील १९ बँक खात्यांमधून या कंपन्यांमध्ये निधी हस्तांतरित करण्यात आला होता.
ईडीने या कंपन्यांचे मालकांचे जबाब नोंदवले. त्यांच्या जबाबानुसार, ही खाती रितेश शाह आणि गौरांग परमार यांच्या सांगण्यावरून उघडण्यात आली होती. ईडीच्या म्हणण्यानुसार, अटक करण्यात आलेले आरोपी आणि हे दोन जण अब्दुल समद भगद उर्फ ‘चॅलेंजर किंग’ या मुख्य आरोपीच्या आदेशावर काम करत होते. कोट्यवधी रुपयांची रक्कम काढणे आणि ती लपवणे यामध्ये त्यांचा सहभाग होता.
तपास सुरु असल्याचे कळताच खिलजी आणि शेख यांनी शाह आणि परमार यांच्या फोन नष्ट केले आणि देशाबाहेर पळ काढला. ते बँकॉकला गेले होते, मात्र काही दिवसांतच परत आले. २ जानेवारीला ते पुन्हा दुबईला जाण्याच्या तयारीत असताना त्यांना अटक करण्यात आली. विशेष न्यायाधीश एससी डागा यांनी तपासासाठी त्यांना ८ जानेवारीपर्यंत ईडीच्या ताब्यात ठेवण्याचे आदेश दिले.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *