मुंबईत शिवसेनेचा महापौर असावा, ही मुंबईत राहणाऱ्या मराठी माणसांची केवळ राजकीय अपेक्षा नव्हती; ती एक सांस्कृतिक आणि भावनिक गरज होती. त्याला संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाची पार्श्वभूमी होती. त्यामुळेच, मराठी माणसाचं, शिवसेनेचं आणि मुंबईचं एक अतूट नातं आहे, अशी “सामूहिक धारणा” गेल्या अनेक दशकांत तयार झाली होती. ज्याला कॉँग्रेसने खतपाणी घालून, मुंबई आणि राज्यातील कम्युनिस्ट, समाजवादी आणि आंबेडकरी चळवळी मोडून काढल्या. त्यासाठी, शिवसेनेला मुंबई “आंदण” दिली. परिणामी,
मराठी माणूस आणि शिवसेनेचे घट्ट नाते बनले. ज्याचा नजीकच्या काळात, उद्धव आणि राज यांनी यथेच्छ फायदा उचलला. इतकंच नाही तर, आदित्य आणि अमित यांची पुढची पिढी सुद्धा, हा आयता “घरी” चालत आलेला लाभ घेण्यासाठी पुढे सरसावलेली दिसली. परिणामी, बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात, ज्या शिक्षण, रोजगार किंवा गृह निर्माण अशा विविध कारणांसाठी मराठी लोक शिवसेनेकडे आकर्षिले गेले होते. त्यांना १९९५ मध्ये राज्यात सत्तेवर आलेल्या, गेली पंचवीस वर्षे मुंबईत सत्ता उपभोगलेल्या शिवसेनेकडून ठोस फायदा झाला नाही. चाळी, मोडकळीला आलेल्या इमारतीं जशा तुटत गेल्या, तसा हा मराठी माणूस, मुंबईपासून तुटत गेला. अर्थात, तरीही, कोणत्याच क्षेत्रात फारसा उपयोग होत नसताना, देखील, मराठी माणसांच्या शुद्ध ‘ठाकरे भक्ती’ भावनेभोवती, गेल्या पंचवीस वर्षात मुंबईचं राजकारण फिरत आलं… हा एक विलक्षण चमत्कार म्हणावा लागेल.
मात्र नुकत्याच लागलेल्या महापालिका निकालांनी या पारंपरिक समजुतीचा “निकाल” लावलेला दिसला.
तसे पहायला गेल्यास, जेव्हा महायुतीमध्ये जागावाटप झाले होते, तेव्हाच मुंबई शिवसेनेच्या हातातून निसटून गेलेली दिसत होती. उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या जागा पाहता, मुंबई आणि शिवसेना, हे समीकरण बाद करायचा निर्णय भाजप आणि महायुतीने घेतला होता, हे मान्य करावंच लागेल.
महत्त्वाची बाब म्हणजे, एकनाथ शिंदे या जागावाटपात, स्वतः मुंबईसाठी कधीही आग्रही राहिलेले दिसले नाहीत. सुरुवातीला केलेली भली मोठ्ठी मागणी, त्यांनी सहजपणे मागे घेऊन, आपण “ठाणेदार” आहोत, कल्याणचे “सुभेदार” आहोत, जिथे नवी मुंबई आपल्या आवाक्यात नाही, तिथे
मुंबईचे महा स्वप्नं आपल्याला झेपणार नाही. हे वास्तव स्वीकारलेले दिसले. इतकेच नव्हे तर, आपले मुंबईतील उमेदवार निवडताना देखील, त्यांनी विशेष काळजी घेतली नाही. असे त्यांच्या जवळचे लोक सांगतात.
मुख्य म्हणजे, बर्यापैकी चांगल्या जागा मिळाल्यानंतर सुद्धा, शिंदे सेनेने “मुंबई आपल्या हातात असावी” असा दावा करण्याची अपेक्षित कृती देखील केली नाही.
हे खूप सूचक आहे. बोलके आहे.
२००४ नंतरच्या दोन विधानसभा निवडणुकीत, जास्त जागा मिळूनही राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येक टप्प्यावर काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिलं होतं. या बहुचर्चित उदाहरणाचा आधार घेऊन मुंबई महापौरपदासाठी शिंदे गटाने ठाम भूमिका घ्यावी, असे काही शिंदे समर्थक आग्रहपूर्वक सांगत असतानाही, शिंदे यांनी तशी भूमिका घेतली नाही. याचा aaj वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही; सगळ्यांनाच तो “अर्थ” सहजपणे समजतो.
महापौर निवड करताना, शिवसैनिकांमध्ये असलेले कोकणी माणसांचे प्राबल्य लक्षात घेऊन, भाजपने इथे अतिशय चाणाक्षपणे “मास्टरस्ट्रोक” मारला. २०१२ साली काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या रितू तावडे यांना महापौर बनवण्याचा निर्णय म्हणजे केवळ एक निवड नाही, तर एक संदेश आहे. काँग्रेसमधून आलेला चेहरा, त्यावर भाजपचा शिक्का आणि शिवसेनेच्या परंपरागत सत्तेवर दावा. असा हा सारा ‘प्रवास’ अचंबित करणारा आहे. याशिवाय, घाटकोपरच्या गुजरातीबहुल भागातून मराठी चेहरा देत भाजपने मुंबईतील भाषिक, सामाजिक आणि राजकीय संतुलन साधण्याचा जो प्रयत्न केला आहे, त्याचे परिणाम पुढील राजकारणात दिसतील त्यामुळेच, ही निवड केवळ आकड्यांवर आधारित नसून, सूक्ष्म सामाजिक गणित लक्षात घेऊन केलेली दिसते.
याच पार्श्वभूमीवर, महापौर निवडी संदर्भात, ठाकरे गटाने घेतलेली भूमिका ‘बोलकी’आहे. “अपशकून करणार नाही” अशी संयमित प्रतिक्रिया, आणि “आम्हाला आकड्यांचं गणित मान्य आहे” असं सांगत किशोरी पेडणेकर यांनी वास्तव स्वीकारलं आहे.
सत्ता नसली तरी सक्षम विरोधक म्हणून काम करण्याची तयारी त्यांनी स्पष्ट शब्दांत दाखवली आहे. हेही नसे थोडके.
रितू तावडे या मुंबईच्या भाजपच्या महिला महापौर ठरणार, हे निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. महिला आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ही निवड सामाजिकदृष्ट्याही महत्त्वाची ठरते. “मी स्वतःला मुंबईची सेवक मानते” असं त्यांचं विधान अपेक्षा निर्माण करतं, मात्र मुंबईसारख्या शहरात शब्दांपेक्षा कृतीच अधिक बोलकी असते. सभागृहाची गरिमा राखली जाईल, पक्षभेद विसरून काम केलं जाईल, या घोषणा प्रत्यक्षात उतरतात का, याची कसोटी पुढील सव्वा वर्षांत लागणार आहे. उपमहापौरपद शिंदे गटाकडे देत संजय घाडी यांची निवड करून सत्ताधारी युतीने आपली ताकदही दाखवून दिली आहे.
एकूणच मुंबईच्या राजकारणाची समीकरणं बदलायला सुरुवात झाली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं अस्तित्व आणि राजकीय महत्व हळूहळू कमी होत जाणार, अशी चिन्हं स्पष्ट दिसत आहेत. अजितदादा गेल्याने, काहीशी अनाथ झालेली, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असताना, एकनाथ शिंदे यांची गरज भाजपाला भविष्यात किती राहील, हा प्रश्नही उपस्थित होतो. महायुतीतील मित्रपक्षांनाही हळूहळू गळती लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या सर्व बदलत्या परिस्थितीत, येत्या पाच वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात अचानक काही नवे राजकीय प्रवाह निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण, आता राजकीय वातावरण सुद्धा वेगाने बदलताना दिसत असते. कारण, राजकारणात चेहर्या एव्हढीच त्यांची उपयुक्तता कमी होत असते आणि त्या बदलाची प्रक्रिया सुरू झालेली आहे.
जाता जाता एक महत्त्वाचा मुद्दा दुर्लक्ष करून चालणार नाही. या मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी अपेक्षित तशी लढत दिली नाही, अशी भावना अनेकांच्या मनात आहे. काही गुप्त समझोता होता का, असा संशय त्यांच्या एकूण रणनीतीकडे पाहताना निर्माण होतो. त्यामुळेच असेल कदाचित, मुंबईतील कट्टर शिवसैनिकांना आपल्या हातातून, मुंबई सारखे एक आंतरराष्ट्रीय शहर गेल्याचं फारसं दुःख किंवा विषाद झालेला दिसत नाही. ही केवळ त्यांची राजकीय हार नाही, तर बदलत्या भावनिक नात्याची एक नोंद आहे. मराठी माणूस, त्याची नवी पिढी बदलते आहे, मुंबई बदलते आहे आणि तिचं राजकारणही. प्रश्न इतकाच आहे की, या बदलाच्या प्रक्रियेत मुंबईकरांचा आवाज किती ऐकू येणार, आणि सत्तेच्या खेळात शहर पुन्हा एकदा केवळ एक “मोहरा” ठरणार का…?
हे शहर २०१७ च्या महापालिका निवडणुक निकालानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी, केवळ दोन जागा जास्त मिळवणार्या उद्धव ठाकरे यांच्या हाती सोपवले होते.
यावेळेस मात्र, मुंबईच्या लोकांनी, ही मुंबापुरी मोठ्या विश्वासाने महायुतीच्या हाती दिली आहे. जवळपास १८७५ वर्षांपूर्वी, इसवीसन १५० मध्ये ग्रीक-रोमन गणित आणि भूगोल तज्ज्ञ, टॉलमी याने सात बेटांच्या मुंबईची नोंद केलेली होती. तेव्हापासून ही मुंबई मौर्य, शिलाहार, सातवाहन, कलचूरी, पासुन, गुजराती सुलतान, पोर्तुगीज, इंग्रज अशा निरनिराळ्या शासकांच्या राजवटी पाहात, घडत, बिघडत… आली आहे. तिला आधुनिक युगात, अधिक सुंदर , सुरक्षित आणि सुखरूप करण्याची इतिहासदत्त जबाबदारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आली आहे… त्यात त्यांना भरपूर यश लाभो हीच एक मुंबैकर या नात्याने शुभेच्छा !

मुंबई कूस बदलत आहे…
•
महेश म्हात्रे
Please follow and like us:
•

Leave a Reply