निसर्ग रक्षणाची गुढी उभारू या

गुढीपाडवा, मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देताना, एका वेगळ्या विषयावर बोलायचे आहे.
हा विषय आहे मराठी अस्मितेचा, सामाजिक जाणिवेचा आणि सांस्कृतिक अभिमानाचा… हा विषय आहे राजा सातवाहनाचा, हा विषय आहे, निसर्ग, जल, जंगल, जमीन रक्षणाचा.
गोदावरीच्या काठावर येऊ घातलेल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर , इतिहासाच्या पानात दडलेल्या एका विलक्षण पराक्रमी आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाचा नव्याने शोध घेण्याची एक चांगली संधी निर्माण झाली आहे. मुख्य म्हणजे, त्यासाठी फार दूर जाण्याची आवश्यकता नाही. मराठीचे “अभिजात” लेणे सांभाळणाऱ्या ‘गाथा सप्तशती’मध्ये या पराक्रमी सातवाहन हाळ राजाचे, त्याच्या काळातील लोकजीवनाचे अतिशय उत्कट दर्शन होते… ते दर्शन मनोभावे घेण्याची आणि आमच्या वर्तनात बदल करण्याची आज गरज आहे.
आज भारतात जे स्थान गंगा नदीचे आहे, दोन हजार वर्षांपूर्वी, ते स्थान गोदावरी नदीचे होते. खासकरून सातवाहन किंवा शालिवाहन राजांसाठी गोदावरी नदी ही आस्थेचा आणि अभिमानाचा विषय होती. श्रद्धेचा नाही. कारण, श्रद्धेच्या नावावर एखादा समाज निसर्गाचे किती नुकसान करू शकतो, हे तुम्ही आम्ही चांगलेच जाणतो.
तर, या अशा जीवनदायिनी गोदावरी नदीचे आजचे स्वरूप पाहता, खासकरून नाशिक परिसरात , ज्याप्रकारे आम्ही या लोकनदीला गटारगंगेत परावर्तित केले आहे. ते पाहून जीव हळहळतो. कारण आम्ही नदीच्या जैवविविधतेशी क्रूरपणे “खेळतो”. शहरानजीकच्या , मंदिराजवळच्या या नदी पात्रात सिमेंटचा थर देणारे, नदीत सांडपाणी, घातक रसायने सोडणारे, आमचे लोक, त्यांना सामील असलेले, सरकारी अधिकारी किती मूर्ख असतील, याची कल्पनाच करवत नाही. आणि म्हणून आता कुंभ मेळ्याच्या निमित्ताने, जर सरकारने लोक सहभागातून या ऐतिहासिक नदीचे पात्र निर्मल आणि निरामय करण्याचा प्रयत्न केले, तर १४६५ किलोमीटर लांबीच्या या महा नदीला जीवदान मिळेल. गोदावरी, जी उगम पावते नाशिक जवळच्या त्रंबकेश्वर येथील डोंगरात आणि पार दूरवरच्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते, त्या नदीच्या आरोग्याला बळकटी मिळेल. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि ओरिसाला आपल्या पाण्याने “जीवन” देणारी ही नदी वाटते तेव्हढी साधी नाही. तिचे पाणी प्यालेल्या राजांनी, शेकडो वर्षे आपल्या कार्यकर्तृत्वाने अवघा भारत देश गाजवला होता. म्हणून, महाराष्ट्राने, गंगा मिशनच्या धर्तीवर गोदावरी संरक्षण, संवर्धनाची चांगली योजना आखावी. मग त्यातील यशाचे स्वरुप लक्षात घेऊन, या पाठोपाठ मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा, वैतरणा आणि महाराष्ट्राची “भक्तीगंगा” इंद्रायणी नदीच्या सफाईची, संरक्षणाची आणि संवर्धनाची मोहीम हाती घेतली पाहिजे, असे वाटते….
त्यासाठी, आधी आम्हाला
गोदावरी नदी , तिच्या काठावर वसलेल्या फक्त कवी, लेखकांना, तत्वचिंतकांना , नाही, तर राजा महाराजांना कशी वाटायची , हे आपल्यासारख्या लोकांनी आणि आमच्या वैचारिक आणि राजकीय नेतृत्वाने समजून घेतले पाहिजे.

“सच्चं भण गोदावरी…” ही काव्यमय गाथा, सातवाहन साम्राज्याच्या सार्थ अभिमानाचा आणि प्राचीन दख्खनच्या वैभवाचा रांगडा हुंकार मानला जातो.
प्राचीन महाराष्ट्राचा आणि दख्खनच्या पठाराचा इतिहास समजून घेताना, केवळ लढाया, किल्ले आणि राजांच्या वंशावळी अभ्यासून चालत नाही, तर त्या काळातील साहित्याच्या आणि भाषेच्या अंतरंगातही डोकावून पाहावे लागते. असे या सातवाहन राजवंशाच्या इतिहासाला वाहिलेल्या एका फेसबुक पेजवर वाचले. ती माहिती येथे साभार घेतली आहे… ही प्राचीन साहित्याची मुशाफिरी मराठी मन प्रसन्न करणारी आहे.
कारण, हे खरे आहे की, कोणत्याही महान साम्राज्याची खरी ओळख आणि त्यांची सामाजिक-सांस्कृतिक जाणीव, त्यांच्या साहित्यातून आणि लोकभाषेतूनच सर्वाधिक स्पष्टपणे प्रतिबिंबित होते. “सच्चं भण गोदावरी, पुव्वसमुद्देण सहिआ?” ही केवळ एक प्राकृत काव्यपंक्ती नाही, तर ती इसवी सनाच्या सुरुवातीच्या शतकांमध्ये संपूर्ण भारतावर आपला दबदबा निर्माण करणाऱ्या सातवाहन (शालिवाहन) साम्राज्याच्या वैभवशाली अभिमानाची एक जिवंत आणि धगधगती साक्ष आहे.
ही गाथा म्हणजे प्राचीन महाराष्ट्राची लोकभाषा असलेल्या ‘महाराष्ट्री प्राकृत’ भाषेतील एक अत्यंत तेजस्वी आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण अशी रचना आहे, जिचा थेट संबंध सातवाहन राजांच्या प्रबळ महत्त्वाकांक्षेशी आणि त्यांच्या अढळ आत्मविश्वासाशी जोडलेला आहे… जो, मराठी नव वर्षाच्या, गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण पाहणे, अनुभवणे आवश्यक आहे.
“सच्चं भण गोदावरि ! पुव्वसमुद्देण साहिआ संती ।
सालाहणकुलसरिसं जइ ते कूले कुलं अस्थि ? ॥”
या महाराष्ट्री प्राकृत गाथेचा आधुनिक मराठीतील अर्थ आपल्या अंगावर रोमांच आणणारा आहे. या गाथेत सातवाहन राजा अत्यंत अभिमानाने गोदावरी नदीला उद्देशून म्हणतो, “हे गोदावरी ! तू ज्या पूर्व समुद्राला जाऊन मिळतेस, त्या पूर्व समुद्राची शपथ घेऊन मला आज अगदी खरे सांग, की तुझ्या या विस्तीर्ण तीरावर आमच्या सातवाहन (शालिवाहन) कुळासारखे महान, पराक्रमी आणि वैभवशाली दुसरे एखादे कुळ आजपर्यंत अस्तित्वात आले आहे का?” या काव्यपंक्ती म्हणजे, केवळ एका कवीचा कल्पनाविलास नाही, तर एका चक्रवर्ती सम्राटाने निसर्गाला दिलेले हे एक खुले आणि अत्यंत प्रबळ असे आव्हान आहे.
ही ऐतिहासिक गाथा शब्दांशी खेळणाऱ्या कुण्या कवीने लिहिलेली नसून, ती स्वतः एका सातवाहन राजाच्या, संभवतः राजा हाल किंवा त्याच्या वंशातील एखादा प्रबळ राजा यांच्या मुखातून बाहेर पडलेली आहे, अशी आख्यायिका सांगितली जाते.
या गाथेमध्ये गोदावरी नदीलाच हा प्रश्न का विचारला आहे , हा प्रश्न आपल्याला पडू शकतो. पण याचे कारण सरळ आणि स्पष्ट आहे, तत्कालीन समाज आणि संस्कृतीचा विकास नद्यांच्या आश्रयाने झाला होता. त्यामुळे, नदीला वेगळे महत्व मिळणं अपरिहार्य ठरतं. प्राचीन महाराष्ट्राच्या भूगोलात आणि अर्थव्यवस्थेत एक प्रकारचे परस्परावलंबित्व होते.
त्यामुळेच, गोदावरी नदी ही केवळ पाण्याचा प्रवाह नसून ती दख्खनच्या पठाराची आणि विशेषतः प्राचीन सातवाहन साम्राज्याची मुख्य जीवनदायिनी आहे. सातवाहनांची राजधानी असलेले प्रतिष्ठाननगर, आजचे पैठण, याच गोदावरीच्या तीरावर वसलेले होते. त्र्यंबकेश्वरच्या सह्याद्रीच्या रांगांपासून उगम पावून थेट बंगालच्या उपसागराला (पूर्व समुद्राला) मिळेपर्यंतचा गोदावरीचा संपूर्ण विस्तीर्ण प्रवास हा सातवाहन साम्राज्याच्या सोनेरी पट्ट्यातूनच होत होता. गोदावरीने, या राज्याचा उगम, त्यांचा संघर्ष, त्यांचा व्यापार आणि त्यांचे जागतिक स्तरावरील वैभव अत्यंत जवळून पाहिले होते. त्यामुळेच, राजाने कोणत्याही देवाला किंवा मानवाला न विचारात घेता, थेट गोदावरीलाच साक्ष मानले आणि तिला ‘पूर्व समुद्राची शपथ’ देऊन विचारले की, या संपूर्ण भूभागात आमच्याइतके प्रबळ कुळ तू कधी पाहिले आहेस का? हा प्रश्न म्हणजे एका अर्थाने सातवाहनांनी आपल्या साम्राज्याच्या भौगोलिक आणि राजकीय सीमेवर मारलेली एक अत्यंत ठळक आणि अढळ अशी राजमुद्रा आहे.
सध्याचा काळ पाहता आपण शालिवाहन राजा कोण होता? प्रचलित काळात त्याचा पराक्रम आठवणे का गरजेचे आहे, याचा विचार करु या. त्या पराक्रमी राजाचे कार्य समजून घेण्याची आणि कायम स्मरणात ठेवण्याची आता खरे तर वेळ आली आहे. गौतमीपुत्र सातकर्ण हे या शालिवाहन राजाचे नाव. *”असुरांचा नि:पात करणारा, देवेंद्रासम पराक्रमी”* असे बिरुद मिरवणारा हा राजा महापराक्रमी होता. अगदी आजपासून १९४८ वर्षांपूर्वीचे जणू पहिले छत्रपती शिवाजी महाराजच. महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक आणि मध्य भारतात गौतमीपुत्र राजाने साम्राज्य विस्तार केला होता. साम्राज्यासोबत आपली भाषा आणि संस्कृतीही देशभर पसरवली. आज मराठी म्हणून प्रचलित असलेल्या प्राकृतचा या सार्‍या सातवाहन राजांना खूप अभिमान. ख्रिस्तपूर्व दुसर्‍या शतकात पुष्पमित्र शुंग आणि पहिला सातकर्ण सातवाहन राजा यांनी एकत्रितपणे ग्रीक आक्रमक मीनँडर, ऊर्फ मिलिंद राजाला देशाबाहेर हुसकावले होते. ( हा राजा मीनँडर बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर , राजा मिलिंद बनला होता. त्याने विचारलेले धर्म विषयक प्रश्न, “मिलिंद प्रश्न” म्हणून प्रसिद्ध आहेत. )
दुसर्‍या सातकर्णनेही माळव्यात घुसून शकांचा पाडाव केला होता. ज्यांच्या नावाने आपण भारतीय अधिकृतपणे आपली कालगणना करतो, ते गौतमीपुत्र सातकर्ण महाराज तर सगळ्यात प्रभावशाली होते. त्यांच्या काळात राजधानी प्रतिष्ठान म्हणजे आजची पैठण नगरी युरोप, आखाती देशांशी जोडलेली होती. भारतीय कपडे, दागिने, कलाकुसरीच्या वस्तू, मसाल्याचे पदार्थ जगभर पोहोचले, ते याच काळामध्ये. इतिहासकार रा. श्री. मोरवंचीकर, ज्यांनी गौतमीपुत्र आणि संपूर्ण सातवाहन घराण्याचा अभ्यास केला आहे. त्यांच्या मते, शालिवाहन हे महाराष्ट्राच्या सलग इतिहासातील पहिले पराक्रमी घराणे आणि गौतमीपुत्र हा त्या घराण्यातील सगळ्यात शूर राजा. त्यांच्याच काळात संस्कृतपेक्षा प्राकृत, म्हणजे मराठीला पहिल्यांदा राजाश्रय मिळाला होता.
गौतमीपुत्र महाराजांच्या संदर्भात अनेक दंतकथा प्रचलित आहेत. त्यातील एक दंतकथा खूप सूचक आहे. या राजाने गुजरातमध्ये जाऊन सौराष्ट्रातील शहरात घुसून तेथील राजांचा उच्छेद केला होता. एकदा त्याच्यावर शत्रू सैन्याने आकस्मिकपणे हल्ला केला. तेव्हा या राजाने मातीचे घोडदळ आणि सैनिक तयार केले आणि त्या सैनिकांमध्ये प्राण फुंकून त्यांना जिवंत केले आणि आक्रमकांच्या सैन्याचा नि:पात केला. प्रत्येक दंतकथेत सत्याचा थोडाफार अंश असतो, असे इतिहासतज्ज्ञ म्हणतात. गौतमीपुत्र सातकर्ण महाराजांच्या या दंतकथेत मला त्याने मातीच्या गोळ्याप्रमाणे अचेतन असलेल्या, थंड पडलेल्या तत्कालीन मराठी समाजाला लढण्यास प्रवृत्त केले असावे, असा अर्थ लागतो. सामान्य माणसाला त्याने तलवार हाती घेऊन पराक्रम करण्याची शिकवण दिली, म्हणून ही दंतकथा लोकांमध्ये पसरली असावी. विशेष म्हणजे आज जवळपास एकोणीसशे वर्षांनंतरही आपण तिची चर्चा करत आहोत, कारण त्यात वर्तमानाला इतिहासाशी जोडणारा भरीव अर्थ भरलेला आहे.
त्या कथेतील मतितार्थ लक्षात घेऊन. आज गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सारे आपल्या लोकशाहीत, नागरिकांमध्ये आणि पर्यायाने समग्र राज्य व्यवस्थेत प्राण फुंकण्याची प्रतिज्ञा करू या. माणसाचे “जगणे” ज्या जमिनीवर आधारित आहे. पाणी हे “जीवन” देणारे आहे आणि जंगल हे “सर्वमंगल” करणारे आहे… म्हणुन भौतिक प्रगतीच्या या वेगवान युगात , त्याचे सर्वप्रथम संरक्षण आणि संवर्धन करू या…तसे सगळ्यांनी केले तर आपल्या भारताभूमीत सुवर्णयुग येणे अशक्य नाही.
तेराव्या शतकात, महाराष्ट्र देशी जेव्हा असाच “वैचारिक दुष्काळ” पडला होता. तेव्हा आमच्या सतरा – अठरा वर्षांच्या ज्ञानोबा माऊलींनी, प्रेममय नामदेव महाराजांच्या साथीने एक कोवळा निर्धार केला होता.
माझे जीवीची आवडी l
पंढरपुरा नेईन गुढी ll
त्या एका विचार तरंगाने महाराष्ट्रात डोळस भक्तीचा महापूर निर्माण केला… तो आजही अक्षय आणि अभंग आहे, म्हणुन महाराष्ट्र… महा राष्ट्र आहे. देशात अन्य राज्य असतील, पण आपले “स्व राज्य” आहे… लोकराजे छत्रपतीं शिवरायांच्या स्वप्नातले, लोकमान्य टिळकांच्या गर्जनेतले…
हे लक्षात घेऊ या… चला, निसर्ग रक्षणाची गुढी उभारू या !

महेश म्हात्रे
महाराष्ट्र रिसर्च सेंटर

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *