जगाचा इतिहास चाळताना, विविध घटनांमध्ये अनेकदा धक्कादायक साधर्म्य आढळतात. आणि मन आश्चर्याने स्तिमित होते. अशीच परिस्थिती आहे, १४ एप्रिल या तारखे संदर्भातील…. जगाच्या दोन मोठ्या लोकशाही प्रधान राष्ट्रांमध्ये, लोकशाही अस्तित्वात येण्याआधी , सव्वीस वर्षांच्या अंतराने, १४ एप्रिल या तारखेला घडलेल्या या घटना, दोन महामानवांच्या जीवन प्रवासाशी निगडित आहेत. एकाचा १८६५ ला अंत झाला, तर दुसऱ्याचा १८९१ ला प्रारंभ. एकीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती; तर याच तारखेला अमेरिकेचे सोळावे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांची पुण्यतिथी . वेगवेगळे देश, भिन्न संदर्भ, पण अन्यायाविरुद्धची लढाई अगदी एक समान.
डॉ आंबेडकरांनी माणुसकी नाकारणाऱ्या जातिव्यवस्थेला आव्हान दिले; लिंकन यांनी वर्णभेद आणि गुलामगिरीविरोधात निर्णायक भूमिका घेतली. त्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली.
दोघांनीही ‘स्वाभाविक’ मानल्या गेलेल्या, परंपरेने डोईजड झालेल्या अन्यायाला संविधानिक मार्गाने छेद दिला. आंबेडकरांनी आपल्या प्रखर ज्ञाननिष्ठेच्या बळावर, करुणेने प्रेरित होऊन आपल्या बांधवांना, अस्पृश्यतेच्या जाचक साखळदंडातून मुक्त केले. आणि त्याच उदात्त हेतूने, भारतीय राज्यघटनेत समतेची, स्वातंत्र्याची तत्त्वे रुजवली; लिंकन यांनी “एमॅन्सिपेशन प्रोक्लमेशन” चा नारा देत, गुलामांच्या मुक्तीला घटनात्मक अधिष्ठान दिले. आणि अमेरिकेला वर्णभेद टाळून समानतेच्या दिशेने नेले.
इथे आपण या दोन महत्त्वपूर्ण सामाजिक लढ्यातील एक मोठा फरक लक्षात घेतला पाहिजे. तो म्हणजे, अब्राहम लिंकन यांच्या लढ्याचे स्वरुप वेगळे होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अमेरिकेत गुलामी आणि वर्णभेदविरोधी संघर्ष, यादवी युद्धात परिवर्तित झाला आणि त्याचा शेवट लिंकन यांच्या हत्येत झाला. भारतातही अस्पृश्यते विरोधातील संघर्ष तीव्र होता, पण तो प्रामुख्याने वैचारिक आणि घटनात्मक मार्गाने, शांततेत लढला गेला. काही ठिकाणी संघर्ष झाला पण तो तुलनेने कमी राहिला. हे आपल्याला डॉ आंबेडकर यांच्या काळाराम मंदिर प्रवेश किंवा महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह पाहिल्यावर लक्षात येते.
दुसरीकडे, प्रस्थापित उच्चवर्णीय वर्गाने आंबेडकरांच्या धर्म चिकित्सेला प्रखर विरोध असूनही, त्यांना साथ दिली होती, हे लक्षात घेतले पाहिजे. धर्ममार्तंड विरोधकांनी देखील बाबासाहेबांचे कठोर धर्म चिकित्सक प्रयत्न संपवण्याचा मार्ग स्वीकारला नव्हता, ही वस्तुस्थिती आहे.
वारकरी संप्रदायातील संतानी रुजवलेली ही, समन्वयाची, सामंजस्याची परंपरा महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, ‘सुधारक’कार आगरकर यांसारख्या सुधारकांच्या काळातही थोडीबहुत दिसते, टोकाचे मतभेद असूनही भारतीय समाजात तेव्हा हिंसक संघर्ष नव्हता, तो आज दिसतो.
खासकरून सोशल मीडियावर ते उग्र रूप पाहायला मिळते. ते “ऑनलाईन” विष “सलाईन” लावल्या सारखे आपल्या रक्तात भिनत आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण, तो आपला स्वभाव नाही.
प्रत्यक्षात सर्वसामान्य लोकांमध्ये उदार विचारांना सामावून घेण्याची प्रवृत्ती दिसते. कारण, भारतीय मातीत “वादे वादे जायते तत्वबोध: ” ज्याचा शब्दश: अर्थ, संवाद हवा, तर्क हवा, विचारांची देवाणघेवाणही हवी. यातून जे विचारमंथन होते, त्यातूनच सत्याची खरी जाणीव होते… असा अर्थ मानला जातो… त्या पद्धतीने, सामान्य जनांत तात्विक वादविवादातून एका चांगल्या निष्कर्षाप्रत पोहचण्याची सहज भावना रुजलेली आहे.
ही भावना हृदयात होती, वारकरी संप्रदायातील संतांच्या साहित्याची जवळून ओळख होती, पाश्चात्यांच्या विवेकी अभिव्यक्तीचा परिचय होता, म्हणुनच कदाचित, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी, जाती प्रथा आणि अस्पृश्यते विरोधातील आपल्या आक्रमक भूमिका, मोठ्या संयमाने विचारांच्या परिघात बंदिस्त ठेवल्या. अगदी धर्म बदलताना देखील, मोठमोठ्या आमिषाना दूर ढकलून, भारतीय मातीमध्ये जन्मलेला, रुजलेला आणि जगभर फोफावलेला, शांती आणि करुणेचा मार्ग दाखवणारा, विवेकी बुद्ध धर्म मार्ग स्वीकारला.
यातून महत्त्वाचा धडा मिळतो, तो म्हणजे, “जिवंत” समाजात मतभेद अपरिहार्य असतात, पण त्यांचे स्वरूप शाब्दिक किंवा प्रत्यक्ष हिंसेत न होता, संवाद, चळवळी आणि सनदशीर मार्गाने परिवर्तनात व्हावे. भारताची सुधारक परंपरा पिढ्यानपिढ्या याच दिशेने काम करत आली आहे आणि म्हणूनच आंबेडकरांनी मांडलेली समता, न्याय आणि अधिकारांची तत्त्वे भारतीय समाजाने तुलनेने लवकर स्वीकारली. आजही हा प्रवास थांबलेला नाही, पण, एकमेकांचे गळे नधरता, कोणतेही वादंग नकरता, वैचारिक घुसळण अविरत सुरु आहे … सुरू राहिली पाहिजे.
मला नेहमी वाटतं की जर धर्मांतर करण्याचा निर्णय घेण्यात, प्रज्ञावान बाबासाहेबांच्या हातून, थोडा जरी वेगळा निर्णय घेतला गेला असता, मुस्लिम, ख्रिश्चन किंवा गेला बाजार शीख धर्म जरी त्यांनी स्वीकारला असता तर आज, देशात, महाराष्ट्रात काय स्थिती असती…?
विचार करून पाहिले तर, अनेक शक्यता समोर येऊन, डोक्याला झिणझिण्या येतात. पण, आज देशात, उत्तर भारतात आणि आपल्या महाराष्ट्रात, शांतता आणि सुव्यवस्था अबाधित आहे…
त्याचे खरे श्रेय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यापक ज्ञानदृष्टीला दिले पाहिजे, असे वाटते.
आज त्यांच्या जन्म दिवसाच्या निमित्ताने, आदरणीय बाबासाहेबांविषयीची हीच कृतज्ञतेची भावना व्यक्त करावीशी वाटली…
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यस्मृतींना विनम्र अभिवादन !
महेश म्हात्रे
संपादक
महाराष्ट्र रिसर्च सेंटर


Leave a Reply