सध्या सोशल मीडियावर पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या नावाने दोन बनावट (AI-निर्मित) व्हिडिओ फिरत आहेत आणि अनेक लोक या चुकीच्या माहितीला बळी पडत आहेत. मी स्वतः डॉ लहाने साहेबांशी या संदर्भात बोललो, त्यावेळी त्यांनी, न्यूज चॅनेल चा आभास निर्माण करून, डोळ्यांच्या आरोग्या संदर्भात बनावट, खोटी माहिती देणार्या या फेक व्हिडिओ विरोधात सायबर पोलिसांकडे तक्रार केली असल्याचे त्यांनी सांगितले. सायबर पोलिसांच्या तपासातून गुन्हेगार लौकर शोधले जातील, पण त्याआधी आपण सावध होणे गरजेचे आहे.
सर्रासपणे फॉरवर्ड होणारे असे व्हिडिओ खरे आहेत की बनावट, हे ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. *अशा प्रकारच्या व्हिडिओंचा मुख्य उद्देश लोकांना एखाद्या लिंकवर क्लिक करण्यास प्रवृत्त करणे हा असतो*. ही लिंक सहसा कमेंटमध्ये किंवा व्हिडिओच्या वर्णनात दिलेली असते. डॉ लहाने यांच्या सारखी, समाजात मानाचे स्थान असलेली व्यक्ती अशा पद्धतीने लोकांना लिंकवर क्लिक करण्यास सांगत नाही, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. अशा लिंकवर क्लिक केल्यास तुमची वैयक्तिक माहिती चोरीला जाऊ शकते. तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो. हे लक्षात घेतले पाहिजे.
AI द्वारे तयार केलेला आवाज बहुतेक वेळा एकसुरी आणि कृत्रिम वाटतो. खऱ्या व्यक्तीच्या बोलण्यात असलेली नैसर्गिक चढ-उतार, भावना आणि लय अशा आवाजात दिसत नाहीत. त्याचप्रमाणे, अशा व्हिडिओंमध्ये वापरली जाणारी भाषा खूपच औपचारिक किंवा पुस्तकासारखी वाटू शकते. व्यक्तीच्या नेहमीच्या बोलण्याच्या शैलीत, उच्चारात आणि वाक्यरचनेत स्पष्ट फरक जाणवतो.
व्हिडिओमध्ये तोंडाभोवती काही गडबड किंवा विचित्र हालचाली दिसणे हा देखील एक महत्त्वाचा संकेत असू शकतो. AI तंत्रज्ञान ओठांच्या हालचाली जुळवण्यासाठी अतिरिक्त संपादन करते, त्यामुळे कधी कधी ब्लर, तुटक हालचाली किंवा विसंगती दिसू शकते.
*अशा व्हिडिओंमध्ये अनेकदा प्रेक्षकांवर लगेच लिंकवर क्लिक करण्यासाठी दबाव टाकला जातो, आणि हीच सर्वात मोठी धोक्याची खूण असते. अशा लिंक टाळणे अत्यावश्यक आहे, कारण त्या तुमची माहिती चोरण्यासाठी तयार केलेल्या असतात. तो एक सापळा असतो*.
म्हणूनच, कोणताही व्हिडिओ पाहताना सतर्क आणि विचारपूर्वक वागणे गरजेचे आहे. संशयास्पद लिंकवर क्लिक करणे टाळा आणि कोणतीही माहिती पुढे पाठवण्यापूर्वी तिची खात्री करून घ्या. सजग राहणे हेच अशा फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करणे होय…
महेश म्हात्रे
महाराष्ट्र रिसर्च सेंटर, मुंबई


Leave a Reply