गेल्या रविवारची गोष्ट आहे. आम्ही पेणहून परत येताना, मुंबई -गोवा महामार्गावरील पॅन ट्री नामक रेस्तराँमध्ये जेवायला गेलो होतो. सुट्टीचा दिवस असल्याने हॉटेल माणसांनी खच्चून भरले होते. त्या तेव्हड्या गर्दी-गडबडीत एक तरुण त्या हॉटेलच्या मॅनेजर सोबत हुज्जत घालत होता. आमचे नाव वेटिंग लिस्ट देण्यासाठी मी थांबलो असल्याने, त्या दोघांचा वाद ऐकायला मिळाला. विषय अगदी छोटा होता . प्रचंड गर्दी असल्याने बारा लोकांना सलग एका टेबलवर बसण्याची व्यवस्था होऊ शकत नव्हती . चार लोकांना एक टेबल सोडून बसायला जागा उपलब्ध होती. पण त्या तरुणाला ते मान्यच नव्हते . मॅनेजर त्याला शेवटी म्हणाला की आता तुमच्या हा हट्टापायी मी जेवायला बसलेल्या लोकांना उठवू शकत नाही . आणि हा तरुण आवाज चढवून त्याला दटावत होता . त्याचे दोन समजदार भाऊ त्याला गुजरातीत , समजावत होते . पण हा मात्र हे असे का होऊ शकत नाही . “અમે બાર લોકો છીએ, અમને ખાસ ટ્રીટમેન્ટ મળવી જોઈએ.” (आपण बारा लोक आहोत आपल्याला स्पेशल ट्रीटमेंट मिळाली पाहिजे) असा हेका धरून बसला होता . शेवटी मॅनेजरने अंतिम अस्त्र काढले, “तुम्ही लौकर निर्णय घ्या अन्यथा मला या रिकाम्या जागा पुढील लोकांना द्याव्या लागतील ” त्याचे ते वाक्य ऐकताच तो भांडखोर गुजराती तरुण नरमला आणि त्याच्या सोबतचे नातेवाईक जागा पटकावण्याची आत पळाले … ते पाहताच माझ्या शेजारचा तरुण म्हणाला , “पाहिलं ना किती दादागिरी करत होता तो , पैशाची मस्ती आलेय उपऱ्यांना”, मी नुसताच हसलो …
काल हा प्रसंग पुन्हा आठवला . निमित्त ठरले सर्वच जात , धर्म , भाषेची अस्मिता मानणाऱ्या लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारा ख्यातनाम लेखक, विडंबनकार उर्वीश कोठारी यांचा जळजळीत लेख. शेखर गुप्ता संपादित “द प्रिंट” मध्ये प्रसिद्ध झालेल्या उर्वीश कोठारी यांच्या लेखाने एका चांगल्या विषयाला वाचा फोडली आहे. कायम व्यंगात्मक, सडेतोड लिखाणासाठी प्रसिद्ध असलेल्या उर्वीश भाईच्या या लेखाचा खरा विषय गरबा, गुजराती खाद्यपदार्थ किंवा गुजराती पर्यटकांचा मोठा आवाज हा नाही. तर राजकीय सत्ता लाभल्यामुळे गुजराती
सांस्कृतिक अभिमानाचे रूपांतर, सामूहिक आक्रमकतेत कसे झाले आहे, हा त्यांच्या लेखाचा केंद्रबिंदू आहे… कायम इतिहासात रमलेला मराठी समाज सुद्धा त्यास अपवाद नाही. म्हणुनच, तो इथे मुद्दाम चर्चेला घेतला आहे.
उर्वीश भाई लिहितात की, गुजरातने देशाला गांधी, सरदार पटेल, कन्हैयालाल मुन्शी, उमाशंकर जोशी, झवेरचंद मेघाणी आणि असंख्य साहित्यिक, समाजसुधारक व विचारवंत दिले. त्या बळावर गुजराती अस्मिता, भाषा, साहित्य, व्यापारकौशल्य, समाजसेवा आणि सार्वजनिक कर्तृत्वातून घडलेली होती. तिच्यासाठी दिल्लीतील सत्ता आवश्यक नव्हती. २०१४ मधील मोदी-शहा यांच्या राष्ट्रीय उदयानंतर मात्र गुजरातची अस्मिता आणि दोन नेत्यांची राजकीय सत्ता यांचे जाणीवपूर्वक एकत्रीकरण करण्यात आले. या दोन नेत्यावर टीका म्हणजे गुजरातचा अपमान आणि सरकारला प्रश्न विचारणे, म्हणजे गुजरातींच्या कर्तृत्वाचा द्वेष, अशी राजकीय व्याख्या निर्माण केली गेली.
अस्मितेच्या राजकीय अपहरणाची ही परिचित पद्धत आहे. नेता, प्रदेश आणि समाज यांना एकरूप केले की नेत्याला वैयक्तिक उत्तरदायित्वा पासून संरक्षण मिळते. मात्र हा प्रकार केवळ गुजरातपुरता मर्यादित नाही. मराठी अस्मिता, बंगाली अभिमान, तमिळ स्वाभिमान किंवा इतर प्रादेशिक ओळखींचाही राजकीय सत्तेसाठी अशाच प्रकारे वापर झाला आहे. त्यामुळे या प्रवृत्तीला गुजराती समाजाचा जन्मजात दोष ठरवणे चुकीचे ठरेल, असे वाटते.
कोठारी यांच्या मांडणीतील सर्वांत मोठी उणीव म्हणजे काही व्हायरल व्हिडिओं वरून एका मोठ्या समाजाच्या वर्तनाचा निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न केला आहे. विमानात खाद्यपदार्थ वाटणे, परदेशातील बसमध्ये गाणी म्हणणे किंवा पर्यटनस्थळी गरबा करणे, ही वर्तने त्रासदायक असू शकतात. पण ती मोदी राजवटीतच जन्माला आली किंवा याच काळात ती गुजराती पर्यटकांमध्ये आढळतात, हे सिद्ध करणारी तुलनात्मक आकडेवारी लेखात नाही.
आणि खरं सांगायचं तर, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत लावणे, रस्त्यावर नाचणे आणि ‘पैसा दिला म्हणजे मनमानी करण्याचा अधिकार मिळाला’ असं मानणं हा भारतातील नवश्रीमंत पर्यटन संस्कृतीचा व्यापक प्रश्न आहे. हे मान्यच करावे लागेल. जागतिक स्तरावर पर्यटन करता करता , आपल्या विचित्र वागण्याने “देशाची बदनामी करण्याच्या या विशाल कार्यात भारताच्या सर्व प्रांतातील श्रीमंतांचे भरपूर योगदान आहे” . गुजराती, जैन हे जास्त आरडा ओरडा करण्यामुळे जास्त नजरेत येतात, हे मात्र खरं.
उर्वीश भाई यांच्या या आक्रमक लेखातील इंग्रजीसंबंधीचा युक्तिवादही काहीसा अभिजनवादी आहे. इंग्रजी उत्तम बोलता न येणे म्हणजे असंस्कृतपणा नव्हे आणि इंग्रजीवरील प्रभुत्व म्हणजे आपोआप सभ्यता चिकटली असेही नव्हे. गुजरातींच्या इंग्रजीची पूर्वी खिल्ली उडवली गेली आणि म्हणून आता त्यांच्यात आक्रमक आत्मविश्वास निर्माण झाला, हा मानसशास्त्रीय अंदाज असू शकतो. पण त्याला पुराव्याचा आधार दिला नसल्याने उर्वीश भाई यांची मांडणी परिपूर्ण होत नाही. रास-गरबा लोकप्रिय असल्यामुळे गुजराती साहित्य मागे पडले, ही मांडणीही अर्धवट आहे. गरबा ही दुय्यम किंवा कृत्रिम संस्कृती आणि साहित्य हीच श्रेष्ठ संस्कृती, असा सांस्कृतिक वर्गभेद त्यातून निर्माण होऊ शकतो. प्रश्न गरबा करण्याचा नाही. तो कुठे, कधी आणि इतरांची संमती न घेता केला जातो, याचा आहे. विमानतळावरील नियम मोडून गरबा करणे चुकीचे असेल, तर त्याचे योग्य परीक्षण झाले पाहिजे. आणि संबंधितांना समज दिली पाहिजे .
अस्मितेच्या प्रवासाबद्दल लिहिताना लेखक इतिहासातील दाखले देतात. “१९५६ मध्ये तत्कालीन मुंबई राज्याचे विभाजन करून मुंबईसह स्वतंत्र गुजरात निर्माण करण्याच्या मागणीसाठी महागुजरात आंदोलन सुरू झाले, तेव्हा ‘गुजरातनी अस्मिता’चे मूळ ध्वजवाहक असलेल्या कन्हैयालाल मुन्शींनी या कल्पनेला विरोध केला. त्यांच्या मते “विश्वनगरी” असलेली मुंबई गुजरातच्या चौकटीत बसणारी नव्हती.
गुजरातची स्वतंत्र राज्य म्हणून निर्मिती होण्याआधीच ‘गुजरातनी अस्मिता’चे आकुंचन सुरू झाले होते. गुजराती साहित्यातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व उमाशंकर जोशी यांनी कृत्रिम रास-गरब्याला गुजरातच्या संस्कृतीचे एकमेव प्रतीक म्हणून पुढे करण्याविरुद्ध इशारा दिला होता. (समयरंग, जानेवारी १९५८, पृष्ठ २३७).
लेखक गुजरातींबद्दलच्या ‘पैशावाले पण अभिरुचीहीन’ या पूर्वग्रहावर टीका करतात. पण तोच पूर्वग्रह विस्ताराने पुन्हा सांगताना नकळत अधिक बळकटही करतात… असो .
पण, गुजरातमधील शहरी-ग्रामीण, हिंदू-मुस्लिम-जैन, दलित-आदिवासी, पाटीदार-ओबीसी आणि विविध आर्थिक वर्गांतील प्रचंड भिन्नता ‘एक गुजराती मानस’ या सोयीस्कर चौकटीत बसत नाही, याचा विचार करून त्यांनी पुन्हा नव्याने हा विषय लिहिला पाहिजे असे वाटते .
अर्थात तरीही लेखाचा मूलभूत इशारा महत्त्वाचा आहे. राजकीय सत्ता आपल्या समाजातील व्यक्तींकडे आहे, म्हणून सार्वजनिक नियमांवरही आपलाच वरचष्मा आहे, अशी भावना निर्माण होणे धोकादायक असते. कारण , “जेव्हा अस्मिता स्वतःच्या संस्कृतीविषयी प्रेम निर्माण करते, तेव्हा ती स्वाभिमान असते. जेव्हा ती दुसऱ्यांच्या हक्कांकडे दुर्लक्ष करण्याचा परवाना देते, तेव्हा ती अहंकार बनते. आणि जेव्हा हिंसेबद्दलची लाज नाहीशी करून तिचा अभिमान बाळगायला शिकवते, तेव्हा ती अस्मिता न राहता सामूहिक उन्माद बनते”. हे तत्त्व प्रत्येक समाजाने लक्षात घेऊन व्यक्त झाले पाहिजे, असे मनापासून वाटते.
सध्या जागतिक मीडियावर भारतीय धर्म संकल्पना ज्यामुळे प्रचंड अडचणीत आल्या आहेत ती ताजी घटना यानिमित्ताने आपण समजून घेतली पाहिजे .
पॅरिसच्या आयफेल टॉवरवर घडलेले हे प्रकरण आता केवळ एका धार्मिक शिष्टमंडळाच्या भेटीपुरते मर्यादित राहिलेले नाही. त्या घटनेमुळे जागतिक पातळीवर , धर्मस्वातंत्र्य, स्त्री-पुरुष समानता आणि सार्वजनिक संस्थांची स्वायत्तता यांच्यातील सीमा कुठे आखायची, हा मूलभूत प्रश्न निर्माण झाला आहे.
गुजरातमधील बोचासणवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था खूप प्रसिद्ध आहे . त्यांच्याशी संबंधित सुमारे शंभर जणांच्या शिष्टमंडळाने आयफेल टॉवरला खासगी भेट दिली. या वेळी महिला कर्मचाऱ्यांनी शिष्टमंडळाच्या नजरेसमोर येऊ नये अशा प्रकारचे निर्देश देण्यात आल्याचा कर्मचारी संघटनांचा आरोप आहे. या प्रकाराविरोधात कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्याने जगातील सर्वाधिक प्रसिद्ध पर्यटनस्थळांपैकी एक असलेला आयफेल टॉवर काही काळ बंद ठेवावा लागला. आणि आता पॅरिस प्रशासनानेही या प्रकरणाच्या चौकशीची घोषणा केली आहे.
बोचासणवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संप्रदायावर मराठीत पहिल्यांदा मीच, साधारणपणे १९९८ च्या लोकप्रभा दिवाळी अंकात सविस्तरपणे लिहिले आहे. त्यावेळचे संप्रदाय अर्ध्वयू श्री प्रमुख स्वामी महाराज यांची मी मुलाखत सुद्धा घेतली होती . त्यामुळे मला या संप्रदायातील साधूंच्या जीवनशैलीविषयी माहिती आहे . कठोर ब्रह्मचर्य आणि कडक अध्यात्मिक शिस्त, हे या साधूंच्या जीवनाचे वैशिट्य असले तरी , गुजरातमध्ये स्वामीनारायण संप्रदायाच्या संन्यासी जीवनाविषयीची एक गमतीशीर म्हण बरेच काही सांगून जाते … ती म्हण आहे , ” નોકરી કરવી હોય તો સરકારી અને સાધુ બનવું હોય તો સ્વામિનારાયણનો.” (नोकरीच करायची असेल तर सरकारी नोकरी पकडा आणि साधू, संन्याशी व्हायचे असेल तर स्वामीनारायणचे साधू व्हा )
तर या स्वामीनारायण संप्रदायातील साधू ,आपले ब्रह्मचर्य व्रत सांभाळण्यासाठी महिलांचे तोंडही पाहत नाही . त्यामुळेच त्यांच्या भेटीच्या वेळेस महिला कर्मचाऱ्यांना आयफेल टॉवर वरील ड्युटीवरून काढून त्यांच्याजागी पुरुष कर्मचारी नेमले असावेत , हे मी खात्रीने सांगू शकतो . पण हे एकूण प्रकरण अंगावर आल्याने , स्वामीनारायण संस्थेने जाहीर खुलासा केला आहे .त्यात “जाणीवपूर्वक महिलांना वगळण्याचा हेतू नव्हता असे म्हटले असून या घटनेमुळे कुणाला दुःख किंवा गैरसोय झाली असल्यास खेद व्यक्त केला आहे”. दुसरीकडे आयफेल टॉवर व्यवस्थापनाशी संबंधित माहितीनुसार, शिष्टमंडळाशी महिलांचा संपर्क कमीत कमी ठेवण्याची विनंती स्वीकारली गेली होती आणि अशी विनंती स्वीकारणे योग्य नव्हते, अशी भूमिकाही पुढे आली आहे. आणि आता तर या प्रकरणाने राजकीय वळण घेतले आहे. जगाला स्वातंत्र्य समता आणि बंधुता हा मूलमंत्र देणार्या फ्रान्समधील राजकीय नेते या भेदभाव प्रकरणाने चिडले आहेत.
राष्ट्राध्यक्षपदाचे संभाव्य उमेदवार गॅब्रिएल अत्ताल यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, “फ्रान्समध्ये महिलांना त्यांचे स्थान कुठे असावे, त्यांनी कुठे राहावे किंवा कसे वागावे, हे सांगण्याचा अथवा आदेश देण्याचा अधिकार कोणत्याही संस्कृतीला, प्रथेला, धार्मिक श्रद्धेला किंवा व्यक्तीला नाही.”
फ्रान्समध्ये या घटनेकडे स्त्री-पुरुष भेदभावाचे प्रकरण म्हणून पाहिले जात आहे. पॅरिसचे उपमहापौर इमॅन्युएल ग्रेगोआर यांनीही ही घटना अस्वीकार्य असल्याचे म्हटले. “ऐतिहासिक वास्तूंमध्येही स्त्री-पुरुष समानतेच्या तत्त्वाला बाजूला सारता येणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
फ्रान्सच्या समानता मंत्री ( हो, असाही विभाग आहे तिथे ) ऑरोर बर्जे यांनीही ठाम भूमिका घेत म्हटले, “फ्रान्समध्ये आम्ही महिलांना लपायला किंवा स्वतःचे अस्तित्व पुसून टाकायला सांगत नाही. प्रजासत्ताकाच्या कायद्यांपेक्षा कोणताही धर्म किंवा विचारसरणी श्रेष्ठ नाही.”
एकूणच काय तर, गुजरातमधील धनाढ्य पटेल समाजाच्या उदार आर्थिक आश्रयावर जगभर पसरलेल्या या स्वामीनारायण संप्रदायाच्या या एका हटवादी कृतीने संपूर्ण हिंदू धर्म आणि भारतीय समाज अकारण बदनाम होत आहे . आणि म्हणून उर्वीश कोठारी यांनी केलेली चिकित्सा महत्वाची ठरते .
उर्वीश भाई एके ठिकाणी लिहितात, आपले गुजराती नेते दिल्लीच्या सत्तेवर आहेत म्हणून जगातील प्रत्येक विमान, रस्ता किंवा पर्यटनस्थळ गुजरातचा गरबा-मंडप होत नाही. पण काही पर्यटकांच्या उर्मटपणावरून संपूर्ण गुजराती समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणेही तितकेच अनुचित वाटते . मोदींवरील टीका म्हणजे गुजरातचा द्वेष नाही. आणि काही गुजरातींच्या वर्तनावरील टीका म्हणजे संपूर्ण समाजाचा अपमानही नाही. हे समजून घेण्याची वैचारिक परिपकवता वाढली पाहिजे हे मात्र खरे .
खरे सांगायचे तर, कोणत्याही अस्मितेची खरी कसोटी, तिच्या आवाजाच्या डेसिबलमध्ये नसते. ती दुसऱ्याच्या अस्तित्वाला, हक्कांना आणि शांततेला आपण किती प्राधान्य देतो यात असते… आणि म्हणूनच उर्वीश भाई यांची मांडणी लक्षवेधी वाटली… ज्याकडे उत्सवप्रिय , अस्मिताप्रेमी मराठी लोकांनी दुर्लक्ष करून चालणार नाही.
महेश म्हात्रे
संपादक – संचालक
महाराष्ट्र रिसर्च सेंटर


Leave a Reply