खरेतर हि कहाणी आहे, भारताच्या घडामोडींच्या काळातील अस्वस्थ अर्धशतकाची… पण बॉलीवूडच्या प्रेमकथांची भुरळ असणाऱ्या आपल्या देशात, जशी कोणतीही कथा , देखणा राजपुत्र, सर्वसाधारण घरातील चुणचुणीत मुलगी आणि त्यांची प्रेमकहाणी…
कहाणीत ‘ट्विस्ट’, अनपेक्षित चढउतार…
अशाच पद्धतीने सादर केली जाते. सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र सुद्धा त्याला अपवाद नाही. पहिल्या पानावरील पहिल्या ओळीपासून , “पहली नजरमें पहला प्यार हो गया” पॅटर्नमध्ये सुरु होणारे हे पुस्तक, मुले मोठी होताना ‘कौटुंबिक जिव्हाळ्याच्या चित्रपट कथेचे’ रूप घेताना दिसते…
पुढे पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जेव्हा शीख अंगरक्षकांकडून निर्घृण हत्या होते तेव्हा आणि उमदे पंतप्रधान राजीव गांधी यांची तामिळ अतिरेक्यांकडून हत्या होते तेव्हा, या पुस्तकातील भावनिक ताणेबाणे आपल्या मनाला अस्वस्थ करतात … आजी आणि बाप गमावलेल्या धाकट्या राहुल आणि प्रियांकाची स्थिती, पुस्तकाचा राजकीय संदर्भ विसरायला लावते …आणि आपण, ‘नेटफ्लिक्स’वर एखादी डॉक्युमेंट्री पाहतोय असे वाटायला लागते… पण थोडाच वेळ.
वाचक जसजसा पुढे जातो, तसतसे त्याला एक सत्य जाणवत राहते,
ते म्हणजे , राष्ट्रीय राजकारणाच्या मध्यभागी असणाऱ्या या, अशा ‘मसाला’ स्टोऱ्यांना जेव्हा राष्ट्रीय घटनांपेक्षा मोठे स्थान मिळते . तेव्हा अनेक राजकीय आणि सामाजिक प्रश्न अनुत्तरित राहतात. पुस्तकाच्या जोडीला , हे आपल्याला ज्येष्ठ पत्रकार एन.राम यांनी घेतलेल्या सोनियाजी यांच्या मुलाखतीत सुद्धा तसेच वाचायला, पाहायला मिळते …!
असो.
राजीव आणि सोनिया यांची ही ‘गोष्ट’ सुरु होते, इंग्लंड मधील केम्ब्रिज विद्यापीठात. पुढे, कहाणी सरकत जाते… आपले जिवलग राजीव गांधी यांच्यासाठी आणि त्यांच्यासोबत भारतात येताना, सोनिया गांधींच्या वडिलांनी त्यांना ‘रिटर्न तिकीट’ काढून दिलं होतं…
१९९१ मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींच्या हत्येनंतर सोनियाजींच्या बहिणीने त्यांना इटलीला परत बोलावलं होतं.
पण…सोनियांनी भारतातच राहणं पसंत केलं. आपल्या मुलांमुलीसह !
म्हणुनच असेल कदाचित , परवा, १० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या Belonging: A Journey of Love या आत्मकथनाकडे देशातील पत्रकार, लेखक आणि बुद्धिजीवी वर्गाचे लक्ष लागून राहिले होते. खूप कमी बोलण्यासाठी प्रसिद्ध असणार्या सोनिया जी या पुस्तकाद्वारे काय काय सांगतील, हीच सर्वांची उत्कंठा होती…
त्यांच्या आयुष्याला आणि कॉंग्रेसच्या राजकारणाला कलाटणी देणार्या, परदेशी वंशावरून झालेल्या प्रचंड विरोधाला, सोनियांनी दिलेलं सर्वांत महत्त्वाचं आणि थेट उत्तर याच पुस्तकातील एका पानावर आहे…!
आपल्या महाराष्ट्राला ‘त्या’ वादाची चांगलीच आठवण आहे. १९९९ मध्ये, पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणारे नेते शरद पवार आणि पी ए संगमा, तारीक अन्वर या त्यांच्या सहकाऱ्यांनी, सोनियांच्या परदेशी जन्माचा मुद्दा उपस्थित केला होता. ज्यामुळे खळबळ माजून कॉंग्रेस फुटली. त्यातून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. त्याच वर्षी महाराष्ट्रात दोन्ही कॉंग्रेस पक्ष स्वतंत्रपणे लढले आणि गम्मत म्हणजे , निकालानंतर एकत्र सत्तेत आले. पुढे २००४ मध्ये सोनियांनी पवारांसह सर्व प्रादेशिक नेत्यांना सोबत घेतलं. स्वतः पंतप्रधानपद नाकारलं आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग यांचं नाव पुढे केलं… ज्यामुळे पुढील दहा वर्षे कॉंग्रेसकडे देशाची सूत्रे राहिली. अर्थात सत्तेचा ‘रिमोट कंट्रोल’ सोनिया जी यांच्या हाती होता. एकाच वेळी कॉँग्रेस अध्यक्षपद आणि केंद्रीय सत्तेचे मुख्य केंद्र, या दोन महत्त्वाच्या भूमिकेत, कोणताही गाजावाजा न करता सोनियाजी काम करत होत्या. त्यावेळी, सारे आलबेल होते असे नाही. सोनिया जी आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यामध्ये अनेक मुद्दयांवर संघर्ष होत होते… आणि त्याकाळात, पक्ष आणि सरकार पातळीवर, कॉंग्रेस अध्यक्षा आणि पंतप्रधान यांच्यातील “संवाद” कायम राखण्याची “कठीण कामगिरी’ पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे होती.
ज्यांच्याकडे पंतप्रधान कार्यालयाचे मंत्रिपद आणि कॉंग्रेस सरचिटणीसपद, या दोन्ही जबाबदार्या होत्या. अनेकदा अनौपचारिकपणे बोलताना, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या तोंडून ऐकलेल्या, त्या काळातील ‘ठराविक’ राष्ट्रीय विषयांना आणि कॉंग्रेस पक्षातील वादळी वादांना या पुस्तकात बगल दिलेली दिसतेय … साधारणपणे, संपूर्ण आयुष्यभर सार्वजनिकरीत्या मोजकं बोलणाऱ्या सोनिया, या पुस्तकात, इंदिरा आणि राजीव यांच्या काळातलं सत्तेचं राजकारण घरातून कसं दिसलं, हे प्रथमच इतक्या विस्ताराने सांगतात, त्याचे आश्चर्य वाटते… हे मान्य केले पाहिजे. इंग्रजी वृत्तपत्र आणि पत्रकारांच्या या पुस्तकाबाबतच्या उत्सुकतेचं, हे एक कारण असावे, असे वाटते. “हिंदू” दैनिकाचे सर्वेसर्वा आणि ‘बोफोर्स’ची “भ्रष्टाचार तोफ” राजीव गांधी यांच्या विरोधात डागणारे एन.राम यांनी तर, पुस्तक प्रसिद्ध होण्याच्या तीन दिवस आधी, ७ नोव्हेंबर रोजी पहिल्या पानावर सोनिया जी यांची गुडीगुडी मुलाखत घेतली. ज्यात, शेवटच्या परिच्छेदात सोनिया जी धडधडीत खोटं ठोकून देतात, ते म्हणजे, “पंतप्रधान मनमोहनसिंग आणि पक्षाध्यक्ष म्हणुन मी, एक टीम म्हणुन काम करत होतो. ते सरकार चालवत होते, तर माझी जबाबदारी पक्ष चालवण्याची होती.” ते खरं नाही, हे जाणणारे एकच व्यक्तिमत्त्व आहेत. पृथ्वीराज बाबा. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर, दोन वर्षानी येऊ घातलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या बहुप्रतीक्षित पुस्तकात, सोनिया जी यांचा हा “मानभावीपणा” नक्कीच उघडकीस येईल अशी अपेक्षा आहे .
सोनियाजींच्या या पुस्तकात जसे शरद पवार यांच्या पंतप्रधान होण्याच्या आकांक्षेविषयी लिहिले आहे, तद्वत प्रणव मुखर्जी यांच्या महत्त्वाकांक्षी विचारांचे प्रतिबिंब सुद्धा पाहायला मिळते. “पंतप्रधानपदासाठी प्रणव मुखर्जी आपल्यापेक्षा अधिक पात्र होते”, असं विधान मनमोहन सिंग यांनी २०१७ मध्ये केले होते. याचा साधा उल्लेख सुद्धा न करता, सोनिया गांधीं यूपीएच्या काळातली एक आठवण सांगतात. त्या लिहितात, साधारणतः २०१० मध्ये मुखर्जींनी मला ‘वरच्या पातळीवर बदल’ करायला हवा असे सुचवले होते…”, तेव्हा सोनियांना धक्का बसला होता. त्यामागे पंतप्रधान होण्याची मुखर्जींची जुनी आकांक्षा असल्याचा अर्थ त्यांनी घेतला. प्रणवदांनी चर्चेच्या ओघात नेतृत्वबदल सुचवला, तेव्हा आपण विषय अलगद बदलला, असं सोनिया लिहितात. एकदा नव्हे अनेकदा, सरकार सावरण्यासाठी, टिकवण्यासाठी प्रणवदांवर विसंबणाऱ्या काँग्रेसमध्ये , “पंतप्रधान कोणी व्हावं” याचा निर्णय कुणाच्या हाती होता, हे त्या छोट्याशा प्रसंगात दिसतं…
पंतप्रधानपदासाठी प्रणव मुखर्जी यांच्या महत्त्वाकांक्षा अगदी उघड होत्या. त्याला एका घटनेची पार्श्वभूमी होती …. ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधींची हत्या झाली तेव्हा, राजीव गांधी आणि मुखर्जी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर होते. कोलकात्याहून दिल्लीला परतताना विमानात मुखर्जींनी ‘हंगामी पंतप्रधान’, असणे किती आवश्यक आहे, हे सांगितले आणि गुलझारीलाल नंदा यांच्या नियुक्तीचा दाखला दिला. राजकारणाचा विशेष अनुभव नसलेल्या राजीव जी यांचा त्यामुळे गैरसमज झाला . परिणामी , विमानातच मुखर्जींनी स्वतः पदावर दावा केला, अशी कथा पुढे पसरली. The Turbulent Years या आत्मचरित्रात मुखर्जींनी ती फेटाळली आहे . आपण , राजीव यांनाच पद स्वीकारण्याची विनंती केली, असं त्यांनी लिहिलं आहे . राजीव दिल्लीत उतरताच आधी एम्स रुग्णालयात गेले. संध्याकाळी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांनी त्यांना पंतप्रधानपदाची शपथ दिली. पुढचा सारा इतिहास आपण जाणतोच …
तर असे हे सोनिया जी यांच्या शब्दातील पुस्तक बऱ्याचदा वरवर माहिती देत पुढे जाते. त्यात अर्थपूर्ण किंवा खळबळजनक असे फार कमी हाताला लागते . मात्र हे पुस्तक , देशाच्या राजकारणाला कलाटणी देऊ शकते, अशी “विशफुल विचारसरणी” असणार्या लोकांची आमच्या मीडियात कमतरता नाही. त्यातही राष्ट्रीय वृत्तपत्रात आयुष्यभर काम करणार्या आणि अनेक सन्मान मिळवणार्या एन राम यांच्या हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस मधील बडे संपादक, राजकीय निरीक्षकांना, या पुस्तकात खूप काही दिसतंय. काहींना या पुस्तकात भाजप-संघाच्या राष्ट्रकल्पनेला उत्तर देणारी बहुरंगी भारताची कहाणी दिसते. तर काहींना सोनिया जी, या पुस्तकाद्वारे समस्त भाजप विरोधी पक्षांना एकत्र आणण्याची शक्यता दिसते. आपल्या ‘इंडिया टुडे’च्या लेखामध्ये राजदीप सरदेसाईंनी सोनियांच्या याच भारतीयत्वावर भर दिला आणि पेंग्विनचा प्रकाशन करार फिसकटल्याच्या घटनेचा उल्लेख करून, आवर्जून लेखिकेच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित केला. ‘एनडीटीव्ही’ने सावध पवित्रा घेत, संघाच्या स्थापनेच्या वर्षासह पुस्तकातल्या तथ्यात्मक चुका दाखवल्या आहेत.
एरवी, सत्य मांडण्याचा प्रयत्न करणार्या सोनिया जी, अनेक प्रश्न सहजपणे टाळतात. आणि, जणू काही घडलेच नाही, असा आव आणत, त्या आणीबाणीतील सक्तीची नसबंदी आणि १९८४च्या शीखविरोधी हिंसाचारात काही काँग्रेसजनांवर दाखल झालेले खटले, जाता जाता नोंदवतात. मुख्य म्हणजे, शीख दंगली संदर्भातील राजीव गांधींच्या ‘हेतूंचा’ बचाव करणाऱ्या पानांवर तत्कालीन सरकारच्या जबाबदारीची चर्चा अगदीच अपुरी दिसते. त्यामुळे, त्या मुद्द्यांचा उहापोह करत, भाजपने आणीबाणी आणि १९८४ या दोन्ही मुद्द्यांवरून पुस्तकावर टीका करणे अपेक्षित होते. पण भाजपापेक्षा हा मुद्दा, कॉंग्रेसचा कधीकाळी साथीदार राहिलेल्या ‘आप’ साठी एक मोठे हत्यार बनणं अनिवार्य आहे. हे कॉंग्रेसच्या थिंक टॅन्कच्या नजरेतून कसं सुटलं याचं आश्चर्य वाटते. कारण, पंजाबच्या आगामी विधानसभा निवडणुकीत १९८४ च्या शीख विरोधी दंगलीचा, हत्याकांडाचा मुद्दा काँग्रेससाठी पुन्हा गैरसोयीचा , तर आम आदमी पक्षासाठी लाभदायक ठरू शकतो, यात शंकाच नाही.
आता राहता राहिला मुद्दा, गेल्या तीन लोकसभा निवडणुकांचा .
२०१४, २०१९ आणि २०२४च्या लोकसभा निवडणुकांत काँग्रेसला अनुक्रमे ४४, ५२ आणि ९९ जागा मिळाल्या. २०२४ मध्ये २४० जागांवर थांबलेल्या भाजपने मित्रपक्षांच्या पाठिंब्याने केंद्रातील सत्ता राखली. त्यावर टिप्पणी करताना, काँग्रेसच्या वाढलेल्या जागांचा संबंध, सोनिया जी विरोधकांची एकजूट आणि संविधान रक्षणाचा मुद्दा यांच्याशी जोडतात. आणि त्या काळातील घडामोडींचा प्रांजळ आढावा घेतात. त्यामुळेच, आज देशात काँग्रेसने, खासकरून राहुल गांधी यांनी पुढाकार घेऊन, मतदारयाद्यांवरून चालवलेल्या देशव्यापी मोहिमेला, ही वैचारिक मांडणी काही प्रमाणात उपयोगी पडू शकते…
अर्थातच,
त्यासाठी हे पुस्तक, लेख, पॉडकास्ट, भाषणे, रील्स, इत्यादी माध्यमातून आम लोकांपर्यंत, किमान कॉंग्रेस कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचायला हवे आहे. कारण, तसाही कॉंग्रेसचा वैचारिक पाया, ज्यावर स्वातंत्र्य चळवळीपासून अनेक सामाजिक आंदोलने उभी राहिली होती. तो ढासळला आहे. पिढ्यानपिढ्या कॉंग्रेसला सत्ता देणारी लोकहिताची वैचारिक बैठक खूप भुसभुशीत झालेली दिसतेय. परिणामी, पक्षाला दिशादिग्दर्शन करणारी, कॉंग्रेसची वैचारिक आघाडी, आज आयात केलेल्या, संधीसाधू समाजवादी आणि बेरकी कम्युनिस्ट यांच्या हातात गेलेली दिसते… जिथून, हे ‘स्वयंघोषित विचारवंत’ आपला समाजवादी किंवा कम्युनिस्ट अजेंडा, काँग्रेसचा म्हणुन, लोकांच्या माथी मारतात… यावर या पुस्तकात काही तरी असेल असे वाटत होते. मात्र, प्रत्यक्षात त्यात दर आठ, दहा पानांवर ‘गॉसिप’, गावगप्पा वाचायला मिळतात… त्यामुळे, या पुस्तकातून, काहीतरी वेगळं वाचायला मिळेल. त्याद्वारे देशात काहीतरी वैचारिक अभिसरण होईल, ही आशा मावळते… त्याचवेळी , ज्यांना आजवर कॉंग्रेसने मोठ्या उत्साहात आपल्यात सामावून घेतले होते… ते बुद्धिजीवी, विचारवंत हतोत्साहित का झाले असावेत, हे मात्र लक्षात येत नाही…
अगदी उदाहरणच द्यायचं तर महाराष्ट्रात ज्यांना कॉंग्रेसने राज्यसभेत ‘खासदार’ म्हणून पाठवले, अशी नजीकच्या काळातील तीन ठळक उदाहरणे देता येतील. पहिले, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर, जे दलित चळवळीतून आलेले अर्थशास्त्राचे अभ्यासक म्हणुन प्रसिद्ध आहेत. २०१० मध्ये त्यांना कॉँग्रेसने राज्यसभेत पाठवले. त्यापाठोपाठ, नरेंद्र मोदी यांच्या नावाचा गवगवा सुरू होताच, प्रसिद्ध मुस्लिम धर्मसुधारक हमीद दलवाई यांचे भाऊ, समाजवादी पक्षात अबू असीम आझमी यांच्या जोडीला भरपूर काम केलेले, हुसेन दलवाई यांना कॉँग्रेसने २०१४ साली राज्यसभेत धाडले. त्यापाठोपाठ २०१८ मध्ये कॉंग्रेसने ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर जे आधी कम्युनिस्ट विचारसरणीचे पुरस्कर्ते होते, त्यांना राज्यसभेत धाडले होते. केतकर यांनी मोठ्या निष्ठेने , एकांगी पत्रकारितेचा शिक्का सहन करत , प्रदीर्घ काळ कॉंग्रेसची पाठराखण केली होती. ‘महाराष्ट्र टाईम्स’च्या संपादकपदी बसल्यावर ते कॉँग्रेसचे, खरेतर सोनिया गांधी यांचे कट्टर शिलेदार बनले होते. त्यामुळेच असेल कदाचित, त्यांच्या संपादकीय कार्यकाळात ‘महाराष्ट्र टाईम्स’, ‘म टा’ ला , सर्वत्र उपरोधिक शब्दात , ‘सो टा’, म्हणजेच ‘सोनिया टाईम्स’ म्हणुन चिडवलं जात असे.
त्यामुळेच, त्यांची आज ना उद्या, राज्यसभेवर वर्णी लागणार हे निश्चित होते.
मोदी सरकार स्थिरस्थावर होत असतानाच, त्यांच्या शासन नीतीला वैचारिक विरोध करण्यासाठी कॉँग्रेसची भिस्त या तीन पुरोगामी विचारांच्या शिलेदारांवर होती. “वैचारिक फळी” सांभाळण्यासाठी त्यांना थेट राज्यसभेचे व्यासपीठ दिले होते. पण आंबेडकरी, मुस्लिम, समाजवादी, साम्यवादी आणि सर्वच पुरोगामी चळवळींशी नाते सांगणार्या, या तिन्ही राज्यसभा खासदारांनी दिल्लीत आणि गल्लीतही कायम सूचक मौन बाळगले. परिणामी, ते काँग्रेसच्या व्यासपीठावरून बाजूला फेकले गेले . त्यानंतर , गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत, कॉंग्रेसच्या प्रचारासाठी असीम सरोदे, विश्वंभर चौधरी, निखिल वागळे आणि श्याम मानव आदी कॉंग्रेस पक्षाबाहेरील “निर्भय विचारवंत” नव्याने आयात करावे लागले. आणि आता त्यांचे विचार अनेकदा कॉंग्रेसचे म्हणुन खपवले जातात…
असो,
पण, हे मात्र खरं की, सोनिया गांधी यांच्या या पुस्तकासंदर्भात, अजून महाराष्ट्र कॉंग्रेसच्या वैचारिक आघाडीकडून काही लिहिलेले किंवा बोललेले वाचण्यात, ऐकण्यात आलं नाही.
अर्थात, तसाही सर्वच राजकीय पक्षांमध्ये ‘वैचारिक दुष्काळ’ प्रकर्षाने जाणवत असताना ,
हे असे होणे क्रमप्राप्त आहे . हे शब्द लिहिताना आवर्जून आठवण येते , रत्नाकर महाजन यांची . आज ते हयात असते तर त्यांनी हे पुस्तक अगदी सोप्या भाषेत लोकांसमोर ठेवले असते. काँग्रेस कार्यकर्त्यांना त्यातील सार काढून दाखवले असते … पण आता तसे होणे नाही…
काळ बदलतोय , नेत्यांसह राजकारण देखील बदलतेय , मग वैचारिक अधिष्ठान राखायची , देशाचे भवितव्य घडविण्याची जबाबदारी कोण कशाला घेईल … मोठे नेते, त्यांच्या कहाण्या मोठ्या …आपण, सर्वसामान्य लोकांनी , त्यांचा ‘प्रेमप्रवास’ वाचता वाचता , देशाच्या इतिहासातील काही तुकडे हाती लाभले तर पाहायचे …. !


Leave a Reply