साई संस्थानच्या प्रसादालयाच्या अन्नदानात जे पैसे जातात ते आमच्या मुलांच्या मुलींच्या भविष्यासाठी, शिक्षणासाठी खर्च करा अशी मागणी सुजय विखे यांनी केली आहे शिर्डीत कोट्यवधी रुपये खर्च करून शैक्षणिक संकुल उभारण्यात आले, मात्र तेथे चांगले शिक्षक नाहीत, इंग्लिश विषय शिकवणाऱ्यालाच इंग्रजी येत नाही, याविषयावर बोलताना, विखे यांनी , “मोफतचे अन्नदान मिळते म्हणून सबंध महाराष्ट्रातले भिकारी शिर्डीत जमा झाले आहेत”, असा आरोप केला, ते तिथेच थांबले नाहीत, तर अन्नदान बंद करण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली तर आम्ही आंदोलन देखील करू, असा इशारा त्यांनी दिला.
सुजय विखे यांच्या खळबळजनक वक्तव्यानंतर वाद होण्याची शक्यता दिसताच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले. सुजय विखे यांच्या शब्दाचा विपर्यास केला केल्याचे सांगत भिक्षेकऱ्यांच्या अवमान करण्याचा त्यांचा हेतू नव्हता. शिर्डीत मध्यंतरी भिक्षेकऱ्यांचा प्रश्न फार गंभीर झाला होता, यासाठी स्थानिक ग्रामस्थांना आंदोलन करावे लागल्याचे त्यांनी सांगितले.
एकूणच काय तर, सुजय विखे यांच्या विधानामुळे राज्यातील, देशातील लक्षावधी साई भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. पण मुख्य म्हणजे , त्यांनी साईबाबा, जे फकीर, अवलिया होते. ज्यांचे संपूर्ण जीवन भिक्षेवर अवलंबून होते. याचाच विखे पुत्रास विसर पडलेला दिसतोय. दुसरी गोष्ट म्हणजे, जेव्हा साईबाबांकडे बाहेरच्या गावाहून भक्तलोक येऊ लागले, तेव्हा बाबांच्या मशिदीत, ज्याला ते द्वारकामाई म्हणत, तेथे ते आपल्या हाताने भक्तानां जेऊ घालत असत. आता हा इतिहास विखेना कोणी सांगायचा?
आपला समाज हल्ली या असल्याच विषयांवर जास्त संवेदनशील बनलाय. त्यामुळे राज्यातील साईभक्त, श्रद्धाळू लोकांची तीव्र प्रतिक्रिया पाहता, हा मुद्दा जास्त चिघळला जाऊ नये यासाठी तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे. अजूनही विखे पिता- पुत्र या विषयावर माफी मागायला तयार नाहीत. त्यांनी आधी साईबाबांची बिनशर्त माफी मागायला हवी.
मग लोकांची.
६-७ वर्षांपूर्वी शिर्डीचे श्रीसाईबाबा हे देव नाहीत, म्हणून हिंदूंनी त्यांची पूजा करू नये, असे भन्नाट विधान करून द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी एका नवीन वादाला तोंड फोडले होते. त्याच सुमारास, “हिंदू धर्म संसदे”ने तर त्यापुढे जाऊन ‘‘१९व्या शतकातील साईबाबा हे देव तर नाहीत, पण संत किंवा गुरूही नाहीत. त्यांची देवता म्हणून पूजा करता येणार नाही,’’ असा थेट निर्णयच दिला होता. त्यामुळे काही काशी आणि अन्य मोठ्या तीर्थक्षेत्रात असलेल्या मंदिरातून साईबाबा यांच्या मूर्ती बाहेर काढायला लावल्या होत्या.
वस्तुतः साईबाबा, जे स्वतः प्रेमाचे, त्यागाचे, आध्यात्मिक ज्ञानाचे, सामाजिक सौख्याचे आणि धार्मिक एकात्मतेचे प्रतीक म्हणून ओळखले जातात, त्यांच्या समाधीस्थ होण्यास नुकतीच शंभर वर्षे पुर्ण झाली आहेत. साईबाबांनी त्यांच्या हयातीत नेहमीच सर्व धर्मातील भंपकबाजींची चिकित्सा केली होती. सामान्य लोकांनी “श्रद्धा आणि सबुरी ” या दोन गोष्टी केल्या तर जगणे सोपे होते. “सबका मलिक एक है ” या सर्व धर्म समभाव सांगणाऱ्या तत्वाचा स्वीकार केला की मनातील द्वैत नष्ट होते. असं साईबाबा सांगायचे. त्यांच्या या सहजसोप्या शब्दांनी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील साधक – मुमुक्षू शिर्डीकडे आकर्षित झाले होते.
मुंबई, नागपूर, अमरावती असे दूरदूरच्या भागातून लोक त्यांना भेटायला येत. आजही साईबाबांच्या दर्शनाला ज्या मंदिरात लाखो लोक येतात, तो नागपूरचे धनिक भक्त बुटी यांचा वाडा होता. एकूणच काय तर, साईबाबांच्या येण्याने शिर्डी सारख्या छोट्या गावाचे एका मोठ्या धार्मिक तीर्थक्षेत्रामध्ये रूपांतर झाले आहे. महाराष्ट्रात जे स्थान शंभर वर्षांपूर्वी पंढरपूरचे होते, ते आता शिर्डीचे आहे, म्हणून तेथील प्रत्येक घडामोडीकडे अवघ्या महाराष्ट्राचे नव्हे, देशाचे लक्ष लागलेलं असते. सुजय विखे यांच्या वादग्रस्त विधानामुळे शिर्डी संस्थान पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
आपल्या देशात काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बऱ्याच गावांमध्ये, शहरांमध्ये साईबाबांची मंदिरे आहेत. विदेशातही साई मंदिरे पाहायला मिळतात . अशा जवळपास दोन हजारहून अधिक मंदिरांमध्ये दररोज लक्षावधी भाविक साईंच्या दर्शनाला जात असतात. त्यांच्या या साईभक्तीमागे कोणते कारण असावे ? याचा विचार आपण केला पाहिजे. साईबाबांचे अवघे आयुष्य साधेपणा, सच्चेपणा आणि चांगुलपणाच्या प्रचार आणि प्रसारासाठी वाहिलेले दिसते. मुख्य म्हणजे साईबाबा ‘आधी केले आणि मग सांगितले’ या पठडीतले असल्यामुळे अल्पावधीत त्यांच्या शब्दांचा प्रभाव शिर्डीबाहेर पसरला. साधारणत: १८५८ मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी या आडवळणाच्या, छोट्याशा गावात साईबाबांचे आगमन झाले. एका लग्नाच्या वऱ्हाडासोबत शिर्डीत आलेल्या सोळा- अठरा वर्षाच्या तरुणाला खंडोबा मंदिरातील पुजारी म्हाळसापती यांनी ‘‘आओ साई’’ अशी साद घालून बोलावले, तेव्हापासून “साईबाबा” हे नाव शिर्डीच्या नावाशी एकरूप झाले. सुफी संप्रदायामध्ये पीर, फकिरांना साई नावाने संबोधण्याची परंपरा आहे. पण साईंच्या संपर्कात आलेल्या बहुतांश हिंदू भक्तांनी ‘साई’ या शब्दाची फोड ‘साक्षात ईश्वर’ अशी केली असावी, त्यामुळे साई तत्त्वज्ञानाचा महिमा साधारणत: दीडशे वर्षापासून देशात आणि देशाबाहेर पसरताना दिसतोय. साईबाबांनी आपल्या संपूर्ण हयातीत निधर्मी एकेश्वरवादाचा सातत्याने पुरस्कार केला. त्यांच्या भक्तगणांमध्ये हिंदू-मुस्लिमांसह, पारशी आणि ख्रिश्चनांचादेखील भरणा असे. प्रत्येक धर्मीयाला त्याच्या धर्मानुसार वर्तन करायला सांगताना, ते ‘सबका मालिक एक है’ ही बाब आवर्जून सांगत. आपल्या जीवनामध्ये यशस्वी वाटचाल करण्यासाठी ‘श्रद्धा आणि सबुरी’ या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, असे साईबाबांचे सांगणे असायचे. त्यांच्या या विचारांना माणुसकीची जोड होती. ते स्वत: आजारी माणसांना बरं करण्यासाठी झटायचे. आपल्याकडे आलेल्या लोकांना स्वत:च्या हाताने जेवण करून द्यायचे आणि सगळ्यांनी मानवतेला धरून वागावं, असा सहजसोपा माणुसकीचा धर्म सांगायचे. म्हणून आजही जगभरातल्या लोकांना साईबाबा आपले वाटत असावेत. त्याउलट कर्मठ रूढी-परंपरा दिवसेंदिवस कालबाह्य ठरताना दिसताहेत. लोकांच्या आचार-विचारावर पाश्चात्त्य जीवनशैलीचा प्रभाव वाढतोय. हे सगळं थांबवायचं सोडून जर शिर्डीतील अन्नदान यावरच वादंग होणार असेल तर त्यांच्या तत्वज्ञानाचा प्रचार कोण करणार ? वास्तविक पाहता शिर्डीतील सद्य:स्थिती हा खरा सामूहिक चिंतेचा, चिंतनाचा विषय असला पाहिजे. देशात तिरुपतीच्या बरोबर सर्वाधिक आर्थिक कमाई असणारे शिर्डी ‘संस्थान’ हे कधी तरी, कुणी तरी खालसा करण्याची आवश्यकता आहे. विविध राजकीय पक्षांनी लोकांच्या देणग्यांतून जमा होणा-या निधीवर आपले ‘पहारेकरी’ (ज्यात सुजयचे वडील राधाकृष्ण विखे पाटील यांचेही नाव आहे.) बसवण्याची परंपरा निर्माण केल्यामुळे देवाच्या चरणी वाहिलेला पैसा क्वचितच कारणी लागताना दिसतो.
आज जर तुम्ही शिर्डीत गेलात, तर तिथे तुम्हाला प्रचंड विरोधाभासच दिसेल. ज्या शिर्डी संस्थानाचे १९२२ साली वार्षिक उत्पन्न अवघे २०० रुपये होते, त्या शिर्डी संस्थानाचे फक्त गेल्या पाच-सहा महिन्यांचे उत्पन्न पाहिले तर आपले डोळे फिरतील. श्रद्धेने शिर्डीत येणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शनिवार-रविवारी दर्शनार्थीची संख्या एक लाखाहून अधिक असते. आणि सुट्टीच्या दिवसांत तर शिर्डी लाखो लोकांनी गजबजून गेलेले दिसते, पण तरीही या शहराच्या एकूण व्यवस्थेकडे कोणाचेच लक्ष नाही. दिवसेंदिवस शिर्डी बकाल आणि भकास होत चालली आहे. नगरविकासाच्या सा-या संकल्पना पायदळी तुडवल्या असल्यामुळे तेथील पायाभूत सुविधा पूर्ण कोलमडून गेलेल्या दिसतात. रस्ते जवळजवळ नसल्यासारखेच आहेत. सार्वजनिक स्वच्छतागृह किंवा शौचालयांची सर्वत्र दुरवस्था झालेली आहे. जगातील सगळ्या अनैतिक गोष्टींचा बाजार शिर्डीच्या रस्त्या-रस्त्यांवर मांडलेला असतो. दानपेटीवर नजर ठेवून बसलेल्या संस्थानाधिपतींना मात्र या मंदिराबाहेरील दुरवस्थेची चिंता नसते. ते सारे मग्न आहेत व्यावसायिकरणाच्या एककलमी कार्यक्रमात. जेवढे जास्त उत्पन्न मंदिराला मिळणार तेवढी पैसे खाण्याची संधी जास्त, अशा या विश्वस्त मंडळींचा विचार असेल, तर त्याला आवर घातला पाहिजे.
ज्या साईबाबांनी आयुष्यभर फकिरी बाणा अंगीकारला होता, ज्यांचे दररोजचे जेवण भिक्षा मागून होत असे, त्या साईबाबांच्या दरबारात येणाऱ्या भक्तांना कुणी विखे पाटील “भिकारी” म्हणून हिणवत असेल, तर ते योग्य ठरणार नाही . अन्नदान ही भारतीय संस्कृतीतील एक उज्वल परंपरा आहे. भुकेचा परिचय नसणाऱ्या सुजय विखेंसारख्या नेत्याला ते कसे कळणार?
धनाढ्य , बलाढ्य अशा विखे, थोरात, काळे, कोल्हे आदी राजकारण्यांच्या वर्चस्वाखाली असलेला, हा नगर जिल्हा पाणीटंचाईसाठी ओळखला जातो. विशेषत: ग्रामीण भागांतील महिलांना पाण्यासाठी मैलोन् मैल भ्रमंती करावी लागते. ते थांबवण्यासाठी आजवर शिर्डी संस्थानाने ठोस पाऊल उचललेले दिसत नाही. मग जर विश्वस्तांनाच साईबाबांच्या विचारांचा विसर पडला असेल, तर शिर्डीतील काळे धंदे करणाऱ्या लोकांना दोष देण्यात काही अर्थ नाही. आज साईबाबांनी सांगितलेली भूतदया सगळ्यांनी अंगीकारण्याची गरज आहे. आमच्या सर्वच संतांनी गरिबांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा असल्याचे सांगितले. साईबाबाही आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला तसाच उपदेश करीत. वारकरी संप्रदायाच्या मानवतावादी मुशीत घडलेल्या महाराष्ट्राला म्हणूनच साईबाबांचे हे विचार पटले असावेत. महाराष्ट्राने पंढरीच्या पांडुरंगाएवढाच विश्वास साईबाबांवर दाखवला. परिणामी शिर्डीसारख्या खेडयात अवतरलेला एक फकीर अल्पावधीत कोटय़वधी मराठी घरांत, देवघरात आसनस्थ झाला. आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत कोणते, तर पांडुरंगाबरोबर साईबाबांचेही नाव घ्यावे लागेल. साईबाबांचे चरित्र लिहिणाऱ्या प्रख्यात संतकवी दासगणू महाराज यांनी एका अभंगात शिर्डीची तुलना पंढरपूरशी केलेली दिसते. ते म्हणतात – “शिर्डी माझे पंढरपूर, साईबाबा रमावर। शुद्धभक्ती चंद्रभागा, भाव पुंडलिक जागा।।
पण काळानुरूप बदललेल्या शिर्डीतील सध्याची स्थिती आता वेगळी आहे. येथे पुंडलिकाचा भाव असलेला भक्त येताना दिसत नाही आणि बाजारूपणाच्या भाऊगर्दीत शिर्डीतील शुद्ध भक्तीची गंगा साफ आटून गेलेली दिसते. ती पुन्हा भावभक्तीने आणि माणुसकीच्या शक्तीने खळाळून वाहती व्हावी. तिच्या साहाय्याने शिर्डीच्या आसपासच्या तालुक्यांतील लोकांचे जगणे जरी सुलभ आणि सुखमय झाले पाहिजे. मगच आपल्याला साईबाबांच्या माणुसकी जपणाऱ्या विचारसरणीचा विजय झाला, असे म्हणता येईल…
“इंग्लिश मिडीयम”च्या सुजय विखे पाटील यांना हे सगळं कसं कळणार?
महेश म्हात्रे
संपादक
महाराष्ट्र रिसर्च सेंटर
Leave a Reply